डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ वेळीच दाद द्या ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(व्हाट्सअपवरून आलेल्या एका अतिशय चांगल्या मेसेजवरून सहज सुचलेलं.)

—–माणूस जिवंत असतानाच आपण त्याला का चांगले म्हणत नाही ?  दुर्दैवाने तो गेल्यावर, मग त्याचे चांगले गुण आपण गौरव करून सांगतो. आपले एवढे मोठे  मन  का बरं नसावं, की आपण एखाद्याला त्याच्यासमोरच कौतुकाचे शब्द ऐकवावे.

—–विशेषे करून आपण बायका,समोरच्या बाईंचे कौतुक जरा हात राखूनच करतो ना?

काय हरकत आहे हो लगेच असं म्हणायला , की  “ अग, किती सुंदर आहे ही तुझी साडी,

अगदी मस्त दिसतेय तुला.” 

—–का नाही पटकन आपण म्हणत,  “  किती ग मस्त केलेस तू वडे. अगदी अन्नपूर्णा आहेस बघ. “ 

—–पण सहसा हे लोकांच्या हातून होत नाही.—हे फक्त बायकांच्याच बाबतीत नाही मला म्हणायचे, तर पुरुष मंडळीही याला अपवाद नाहीत. ऑफिसमध्ये, कनिष्ठ पदावरच्या  माणसाला  प्रमोशन मिळालं , तर खुल्या दिलाने त्याचे कौतुक किती सहकारी करत असतील? फार कमीच.

—–ही वृत्ती लहान मुलांतही असतेच. पण पालकांनी त्याला खतपाणी घालता कामा नये. पहिल्या आलेल्या मुलाचे खुल्या दिलाने अभिनंदन करायला मुलांना आईवडिलांनी शिकवले पाहिजे.

 —– सुंदर दिसणाऱ्या मुलीचे आपण कित्तीतरी वेळा मनातल्या मनात कौतुक करतो. 

पण मग तिला तसे प्रत्यक्ष जाऊन सांगत का नाही ?–की, “ अग, किती छान दिसतेस तू.

तुझा चॉईस खूप छान आहे, तुला  कपड्यातले खूप छान कळते ग. माझ्या बरोबर येशील का खरेदीला? “ —बघा किती आनंद होईल तिला.

—–सुनेने एखादा पदार्थ खरोखरच सुंदर केला, तर द्यावी ना सासूबाईंनी दाद की “ किती चव आहे ग तुझ्या  हाताला. मस्त केलेस हो हे. ”

—–आनंद, हा कौतुक केल्याने  द्विगुणित होतो— आम्ही पुण्याच्या प्रख्यात हुजूरपागा शाळेत  शिकलो. मुख्याध्यापक बाईंच्या त्या ऑफिसमध्ये जायचीही भीती वाटायची तेव्हा, इतका त्या खुर्चीचा दरारा होता. पुढे फार वर्षांनी माझी मामेबहीण  हुजूरपागेची मुख्याध्यापिका  झाली. इतके कौतुक वाटले ना तिचे. तिला भेटायला आणि तिचे कौतुक करायला, तिला न कळवता आम्ही बहिणी शाळेच्या ऑफिसमध्ये गेलो. म्हटले, “ आमची बहीण कशी दिसते या खुर्चीत, ते बघायला आलोय आम्ही .”  त्यावेळी तिचे आनंदाने भरून आलेले डोळे आजही आठवतात.

—–पाठीवर दिलेली कौतुकाची थाप तर आपल्या कुत्र्यालाही आवडते. मग आपण तर माणसे—का नाही समोरच्याचे वेळीच कौतुक करू? चार चांगले शब्द काय जड होतात का हो उच्चारायला?

—–या वरून आपल्या लाडक्या सुधा मूर्ती आठवतात.–तळागाळातील बायकांशी मैत्री करून, त्यांची सुखदुःख्खे जाणून घेऊन, त्यावर उपाय शोधून, पुन्हा कुठेही मोठेपणाची हाव न धरणाऱ्या सुधाताईंचे किती कौतुक करावे—-समाजाने वाळीत टाकलेल्या बायकांनी केलेल्या सुबक गोधड्या बघून, त्यांचे मन भरून कौतुक करणाऱ्या सुधाताई नुसत्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांना त्या विकायला त्यांनी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. ,मान खाली घालायला लावणारा त्यांचा व्यवसाय त्यांना सोडायला लावून, नवीन दिशा दिली. आणि यातूनच, “ तीन हजार टाके ” हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक जन्माला आले.—–असे निरपेक्ष मोठे मन  आपण किती लोकांकडे बघतो?  फारच कमी. खरं  तर आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करत, आपणही खुल्या दिलाने इतरांचे कौतुक करायला शिकले पाहिजे.

—–मी मुलीकडे हॉंगकॉंग ला गेले होते. तिकडे फिरत असताना , आम्हाला बाबा गाडीत आरामात बसलेली  दोन इतकी गोड बाळे दिसली ना—–मला लहान मुले अतिशय आवडतात. त्यातून ही गुबगुबीत आणि गोंडस जुळी मुले तर मिचमिचे डोळे करून आमच्याकडे बघत होती. मी त्यांच्या आईला विचारले, “ मी बोलू का यांच्याशी? ” ती हसली आणि म्हणाली,” हो, बोला की. पण ती चावतात बर का. जपूनच बोला. ” मी गुढग्यावर बसले, आणि चक्क मराठीत बोलू लागले त्या गोड बाळांशी. ती दोघेही जोरजोरात दंगा करायला लागली, आणि हात पसरून माझ्याकडे झेप घेऊ लागली. त्यांच्या आईला खूप मजा वाटली. किती अभिमानाने ती आपल्या गोड बाळांकडे बघत होती —–

—–प्रेमाला भाषा नसते हो—फक्त तुम्ही ते व्यक्त करा, ते समोर पोचते लगेच.

—– माणूस जिवंत असतानाच दाद द्या,

—–चार शब्द कौतुकाचे बोला,

—–तो माणूस शहरातून बदलून गेल्यावर, किंवा दुर्दैवाने या जगातूनच निघून गेल्यावर, मग हळहळून काय उपयोग ?

—–आपल्या भावना लगेचच पोचवायला शिका.  वेळ आणि वाट नका बघत बसू. 

 कारण नंतर कितीही हळहळूनही , गेलेली वेळ परत येत नसते. मग आपल्या हातात, 

“ अरेरे।” असं म्हणत पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरत नाही.

—–मंडळी चला तर मग —करा सुरुवात दिलखुलास दाद द्यायला,—न कचरता.

आणि बघा,  समोरचाही किती खुश होतो,  आणि तुमचाही दिवस किती सुंदर जातो ते।।।

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments