मनमंजुषेतून
☆ स्टाॅप किपींग….. डाॅ.संजय सावंत ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆
Stop keeping
काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने , डॉक्टर दीपक ने एक मेसेज पाठविला ,
Stop keeping your cloths & shoes for special occasion , Wear them whenever you can ,,
Now a days being alive is a special occasion !!!
आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा ,,,
सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवून देऊ नका , आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे ,,,
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिट साठी गेलो होतो, दोघेही 80 च्या आसपास असावे , राहणीमान , कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे , फी देतानासुद्धा घासाघीस करायचे , औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे , कसली चैन नाही , कोणी नातेवाईकांचा येणं जाणं नाही , कधी चांगलंचुगल खाणं नाही कि कपडा नाही परंतु असते एखाद्याची परिस्थिती नाजूक असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमध्ये प्लास्टिक चा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता , बाबा मला म्हणाले डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ? मी लगेच त्यांना तो देऊन टाकला ,,, कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले पण बायको पटकन बोलून गेली , त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे , मी अचंबित निघताना पुन्हा म्हणाले , अजून एखादा असेल तरी पुढच्या वेळी द्या मला , यात बसणार नाहीत , त्यावेळी माझे व्हिजिट फी दहा रुपये होती ती देण्यास देखील ते नाखुश असायचे , विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो ,,,
दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होता ते आजोबा सकाळीच गेले ,,, पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला ,,, ना खुद खाऊंगा ना खाने दुंगा असं आयुष्य जगतच कसलाही उपभोग न घेता नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते , आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमानेच ते गेले ,
मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झालं तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या , मोठी बॅग भरली होती , काहींच्या तर घड्या देखील मोडल्या नव्हत्या , परंतु ती नेहमी साध्याच साड्या वापरायची , अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित परंतु या साड्यां मुळे नीता व तिचा नेहमी वाद व्हायचा ,, कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत ,,, कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालते वगैरे वगैरे ,, मला कोण बघणार आहे , तिचे नेहमीचे उत्तर , जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या , बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे !!
आपल्या वॉर्डरोब मध्ये अनेक नवीन साड्या , पॅन्ट शर्ट पडून असतात , एवढ्या भारी साड्या , शर्ट , पॅन्ट रोज वापरायला कशाला घालायचा म्हणून तशाच पडून असतात , कधीकधी त्या घालायच्या मुहूर्तही उजाडत नाही , आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउट डेटेड झालेली असते , त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता ,, कपड्यांच्या बाबतीतच नव्हे तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण नंतर वापरून असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात ,,,
आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते , बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र नातेवाईक कुटुंबातील सदस्य यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह , प्रेम , आपुलकी आपण आपल्या इगो किंवा संकुचित वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही , मग बरेचदा वेळ निघून जाते , कारण बोलण्यासाठी ती व्यक्ती उरलेली नसते , संचय वस्तूंचा असो वा मनातील विचारांचा , त्याचा योग्य विनियोग , वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते , तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो , त्याच्यावरच आपला अधिकार असतो , म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान ते वस्तू वा विचार आजच वापरून टाका त्या आउट डेटेड होण्याअगोदर !!!
डॉ संजय मंगेश सावंत
संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈