☆ मनमंजुषेतून ☆ सखी ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆

कॅन्सर हॉस्पिटल मधला एक वॉर्ड. सेमी स्पेशल रूम मध्ये एका बेडवर मी आणि दुसऱ्या बेडवर कॅन्सर झालेल्या एक वयस्क बाई.

डोक्याचा गोटा, कातडी करपलेली. अंगातला तरतरीतपणा निघून गेलेला. अंगभर थकवा.डोळ्यावर ग्लानी. पुढची इंजेक्शन मागवण्यासाठी मी मोबाईल शोधत होते. माझ्या जवळ कोणी नव्हते. तो मोबाईल सापडेना.

त्यावेळी एक तरुणी माझ्याजवळ येऊन विचारत होती,” काय पाहिजे?” ती एक चिठ्ठी तिच्या हातात देत मी म्हटलं हे प्रिस्क्रिप्शन जरा धरुन ठेवा, जाईल कुठेतरी मोबाईलच्या नादात. “काकू, मी धरून ठेवते तुमच्या हातातली चिठ्ठी. तुमची औषध आणायची आहेत  ? कारण आईची आणायची आहेत.” ती तरुणी म्हणाली.

ती तरुणी या बाईला आई म्हणत होती. दोघींमध्ये कसलं साम्य दिसत नव्हत. हा विचार माझ्या मनात घोळत होता. ती तरुणी गेली. नंतर त्या बाई जाग्या झाल्या आणि आजूबाजूला बघून रडायलाच लागल्या. मी त्यांना विचारलं,” काय झालं रडू नका” त्या म्हणाल्या ‘आमची सून पौर्णिमा कुठे गेली ?मला घाई लागली आहे संडासला आणि उठता येईना.’ एवढं बोलण्यानंच त्या खुप  दमल्या. .दोघींची औषध घेऊन पौर्णिमा परतली होती. यावेळी अंथरूण घाणीने भरलं होतं. ते बघून तिने नर्सला बोलवलं .मला रूम बाहेर बसवलं आणि नर्स च्या मदतीने सगळे स्वच्छ केलं .

आता रडत म्हणाली,” काकू सॉरी हा .आता तुम्ही आत येऊन बसा. पहिल्यांदाच झालं असं आईला”. त्या हुंदके देत होत्या. त्यांचे मन हलकं झालं होतं. गदगदत होत्या. “तुझ्यावर काय वेळ आली ग बाळा “असे म्हणून त्या पुन्हा पुन्हा डोळे पुसत होत्या .”आई ,तू जर चांगली असतीस तर मला करायला लागलं असतं का ? तुला होणारे त्रास जास्त आहेत . नाहीतर तू तरी माझ्याकडून कधी असं करून घेतलं असतं का? तू त्रास नको ना करून घेऊ ,असं म्हणत पौर्णिमा त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना धीर देत होती .धीर देऊन झाला .आता त्यांना गोळ्या द्या असे नर्स सांगून गेली.”मी आता तुझ्यासाठी जेवायला घेऊन येते पटकन “असं म्हणत गोळ्या च्या पाकीट मधल्या गोळ्या काढून बाहेर  पडत पूर्णीमा म्हणाली की “मी तुम्हाला काहीतरी खायला आणून देते.”

आईचा आवाज व्याकुळ झाला होता. “नको मला नको काही खायला.”

“आई कसं चालेल ?जेवणापूर्वी च्या दोन गोळ्या आहेत, जेवायला पाहिजे ,” पौर्णिमा म्हणाली.  “असं कर ,फार नको अर्धी किंवा चतकोर भाकरी खाऊन घे. त्यावर पोर्णिमा म्हणाली ,अर्धी भाकरी करणारी बाई कोण मिळते ते विचारून येते थांब.

पौर्णिमा खळखळून हसत म्हणाली .त्यावर आई हसत म्हणाली ,”हसू नकोस ग बाई. हसताना दम येतो बर का.  .नुसती निजून आहे ना मी. कमी खायला हवं ” त्या मुलीला आपलं किती करावे लागत हे जाणवल्याने आई त्यामुळे खरंतर तसं बोलत होती. सलाईन लावलेला हात सुजला होता आणि नात्याच्या ऋणातून गुरफटून जात मी त्यांच्यात अडकत होते. मघाच्या  नर्स आल्या .इंजेक्शन देऊन त्यांनी सलाईनचा स्पीड कमी केला, तेव्हा मात्र इतका वेळ कसाबसा धरून ठेवलेला त्यांचा धीर सुटला हात सुजला होता. त्या रडू लागल्या.

पूर्णिमाने त्यांचा हात सलाईन मधून सोडवायला लावला आणि सोडवलेल्या सलाईन काढलेल्या नळीला दाबून दाबून ती आईला हसवण्यासाठी विचारत होती “इथं दाबू. आता इथं दाबू ? ” सलाईन काढलेल्या आईच्या हातात घेऊन ती बसली होती..आता खरं तर ती आईची आई झाली होती. सासू-सुनेचं ते मैत्र बघून मला अपूर्वाई वाटत होती.

आताशा अहो जाहो सोडून अग जगं सासूला म्हटलं जातं. आपल्या  सासूची सखी झालेली ती सून मी कशी विसरेन? तिथल्या वास्तव्यात आमच्या खूप गप्पा झाल्या ते मैत्र मी आजवर जपून ठेवले आहे.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments