श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मनमंजुषेतून
☆ जातीअंतासाठी – भाग 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
जातीभेद हा समाजाला लागलेला एक कलंक आहे. ती विषारी अशी कीड आहे, तो समाजाला कुरतडून खाणारा कँन्सर आहे –अशी तळमळ व्यक्त करणारी वाक्य आपण नेहमी ऐकतो, वाचतो. सर्व समाज, समूह, धर्म ह्यात तो आहेच. तो पूर्ण नाहिसा व्हावा असं वाटतं,पण त्यासाठी आपण काय करायचं हे कळत नाही. प्रत्येक जात त्यांच्यापेक्षा तथाकथित ‘खालच्या’ जातीला कमी लेखते,आपल्या जातीचा टेंभा मिरवते आणि कडकपणे भेदाभेद पाळते, हे समाजात वावरताना नेहमीच दिसून येतं. ह्याबाबतीतले माझे काही अनुभव सांगावेसे वाटतात.
आमच्याकडे कामांना येणाऱ्या गोतावळ्यात वेगवेगळ्या जाती आहेत. प्लंबर, गवंडी, केअर टेकर- हे मुसलमान आहेत. सुतार उत्तर प्रदेशचा, माळी -लिंगायत, गेटं वगैरे करणारा बी.सी. आहे. इलेक्ट्रिशियन ब्राम्हण. आमची कामवाली तिच्या भाषेत ‘वर’च्या जातीची..ती आम्हाला म्हणते, “ ह्या समद्यास्नी कशाला बोलावता ? आमच्या जातीतले आनू काय ? त्या नर्शीला–नर्सला तुमच्या ट्येबलावर खायला बशिवता ह्ये बरं न्हाई.”
मी तिला म्हणते, “ चांगलं काम करणाऱ्याला आम्ही बोलावतो. जात नाही बघत. त्यांचे मोबाईल नंबर सेव् केलेत आम्ही. शबाना ह्यांचं किती प्रेमाने करते. स्वच्छ रहाते. तिला टेबलावर खायला दिलं तर तुझ्या का पोटात दुखतं ? तुला पण देतेच की “.
त्यावर तिचं म्हणणं- “ आम्ही हलक्या जातीला पंक्तीला घेत न्हाई. तसं क्येलं तर भावबंध वाळीत टाकतील आमास्नी. “ खूप वर्ष ती काम करतेय आमच्याकडे, पण तिचं मन बदलणं आम्हाला शक्य झालेलं नाही.
शाळा हे जातीभेद न पाळणारं एक चांगलं केंद्र असतं. मुलं निरागस असतात. वेगवेगळ्या जातीजमातीच्या मुलांची अगदी घट्ट मैत्री असू शकते. ती एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, एकमेकांच्या डब्यातलं खातात, भेदाभेद न पाळणारे हे ‘छान छोटे’ समाजात वावरायला लागले की मात्र ‘वाईट्ट मोठे’ होतात़. त्यांच्या डोक्यात जातीभेदाची कीड वळवळू लागते. मूल्यं कायमची ठसावीत म्हणून शिक्षकांनी काय करायला हवं ? पण लीला पाटीलबाईंची प्रिय विद्यार्थिनी म्हणून मला खरंच शिक्षकांबद्द्लच भरंवसा वाटतो. पुलंच्या चितळे मास्तरांइतके नाही, पण मोठेपणीही लक्षात रहातील अशी जातीअंताची मूल्यं ठसवणारे काही शिक्षक आहेत, ते करतील असं काम. ‘ लहूका रंग एक है ‘, किंवा, ‘ जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलांस त्यांचा रंग कोणता पुसु नका,’ किंवा, ‘ ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा ‘ अशी शाळेत शिकवलेली, आणि पोटतिडकीने म्हटलेली समूहगीतं आठवतीलच काही मुलांना तरी. म्हणजे शाळेतच जातीअंताचे संस्कार होऊ शकतात. लक्षपूर्वक करायला हवेत मात्र.
मी मुख्याध्यापक असतानाचे काही किस्से अजूनही आठवतात.— आमच्या त्या गावात मादनाईक गुरुजी म्हणून एक रिटायर्ड प्राथमिक शिक्षक होते. राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते होते ते. कधीतरी आमच्या शाळेत यायचे. एखादा तास मागून घ्यायचे. ते स्वतः जैन, पण जातीभेद त्यांनी कधीच पाळला नाही. सर्व जातीच्या, गरीब, भटके, ऊस तोडणाऱ्यांच्या, अशा मुलांना हाताला धरून ते आपल्या घरी न्ह्यायचे. आम्ही गुरुजीना ‘ विठु माझा लेकुरवाळा ‘ म्हणायचो. ते मुलांना खाऊपिऊ घालायचे. कधीतरी निरोप यायचा–‘ बाई, बायको माहेरी गेली आहे. चार जातीची चार पोरं शाळा सुटल्यावर माझ्याकडे पाठवा. त्यात एक ब्राह्मणही असू दे. पोरांना पाणी, स्वयंपाक असं करायला लावतो. श्रमसंस्कार होईल त्यांच्यावर. सगळी मिळून इथेच जेवतील ‘–जातीभेद न पाळण्याचा एक आदर्श त्यांच्या रूपाने गावाला मिळाला होता.
शिक्षकांच्या नेमणुका शालेय समिती किंवा स्कूल कमिटी करते. त्या कमिटीत मुख्याध्यापकही असतात. त्यावर्षी एक डी. एड. झालेला शिक्षक भरायचा होता. मुलाखती झाल्या. एका होतकरू तरुण शिक्षकाची मी शिफारस केली. कमिटीचे अध्यक्ष वरच्या जातीचे होते. उपाध्यक्ष त्यांच्यापेक्षा वेगळ्या जातीचे होते.
अध्यक्ष मला म्हणाले, ” गेल्या साली जागा रोष्टर परमाने भरली न्हवं ? मग आता आणि ह्ये कशाला ? आता आपल्यातले भरु या की. त्यो पाचवीला इंग्रजी शिकवनार ? म्हराटी तरी नीट बोलायला येतय का त्याला ?” मी उघड बोलू शकत नव्हते, कारण ते माझे वरिष्ठ होते. पण मनात म्हटलं, ‘ तुम्मी तरी कुटं शुद बोलताय? ‘ उपाध्यक्षाना वाटत होतं आपला भरावा. ‘ तो कुंभाराचाबी चांगला वाटला. पोरांची कच्ची मडकी पक्की करील ‘.एक सभासद म्हणाले. त्यांच्या मते त्यांनी एक चांगला विनोद केला होता—-
क्रमशः ……
लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈