डॉ अभिजीत सोनवणे
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆
@doctorforbeggars
(आपल्याकडे काहीही नसणं आणि एके दिवशी खूप काही असणं या दोन टोकांमधलं अंतर जिद्दीने काटणे म्हणजे भरभराट…. ) इथून पुढे —-
चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे….
रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास…. मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे…. नव्हे अनुभवलाय….
या सर्व प्रवासात तिने आणखी एका व्यक्तीला हात दिला होता…. याचंच मला अप्रूप !
स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना, आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती….!
ती शिकलेली नाही, तिची भाषा ओबड-धोबड आहे…. पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे…!
या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं….
भाऊबीजेच्यादिवशी तिने तिच्या घरासमोर, फुटपाथवरच एक चटई अंथरली….
तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले…मी तिला ओवाळणी दिली.
तिने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला….
“पेढ्याच्या बॉक्सवरच भागवते का म्हातारे… मला वाटलं जेवायला बोलवशील…”, मी हसत म्हणालो.
“म्हातारी म्हणू नगो “, तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत, हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली.
“दिसते तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण…” मुद्दाम मी तिला उचकवलं…. आता पुढं काय होणार हे मला माहित होतं…
“म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या… “बी असं म्हणत तिने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती….
एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलेपेक्षा आणखी जास्त काय हवं….?
माझ्या आईच्या वयाची ती बाई, आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो.
तिच्या पाया पडत म्हणालो, “ तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही, तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे…. पण खरं सांगू का, ताई पेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे….!”
तिच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं…
तिला म्हणालो, “ अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस. मात्र जेव्हा स्वतः सावरलीस, तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस. हे सारंकाही एक आईच करू शकते….”
आता तिच्या डोळ्यात पाणी होतं…. ती म्हणाली, “ पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय. रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उनात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय, हे सुदा मला म्हाईत हाय. मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस…. डोक्यावर छत टाकलंस…. पोटातली भूक भागवलीस…. तू माजा कुनीही नसताना माज्यासाटी तू हे केलंस… मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास….म्हणलं, चला बिन बाळंतपनाचं या वयात आपल्यालाबी पोरगं झालंय…. तर संबळु या अपंग पोराला…. आपुन बी या वयात आई हुन बगु…. मी आय झाले आन ह्यो बाप……” तिने नवऱ्याकडे बोट दाखवत म्हटले….!
आता डोळ्यात पाणी माझ्या होतं….!
म्हटलं, “ म्हातारे तू लय मोठी झालीस…. “
यावेळी ” म्हातारी ” म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली….
हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली… त्यातून एक शर्ट काढला…. एक साडी घेतली आणि मला म्हणाली, “ दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ? तू घिवून जा, नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे… तिला म्हणावं साडीतच ब्लाउज पीस पन हाय….”
हा भरजरी पोशाख मी घेतला….
गाडीला किक मारली आणि तिला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो, “ जातो मी माई…”.
ती म्हणाली, “ ए मुडद्या, जातो म्हणू न्हायी…. येतो म्हणावं…. आनी हो…. माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगंस. मला आपली म्हातारीच म्हन….मी तुजी म्हातारीच हाय….! “
मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो….
आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो…. !
समाप्त
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈