श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 2

(नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. ) इथून पुढे —–

नानाजी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. एका आंदोलनात इंग्रजांनी त्यांना घोड्याने तुडविले होते. त्याच्या खुणा त्यांच्या पाठीवर होत्या. शंकरला वाटायचे नानाजींनी स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारी पेन्शन मिळवावी.  पण नानाजींचा त्याला विरोध होता— “ मी स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले ते माझे कर्तव्य होते.  त्याचे पैसे मी का म्हणून घ्यावे ? जर पैसे घेतले तर हा व्यवहार झाला. माझ्या कार्याचा मला अभिमान आहे. माझ्या पाठीवरील व्रण हेच माझे सर्टिफिकेट आहे, नि त्याचा आनंद मला मिळतो. मी कधीही माझ्या देशप्रेमाची किंमत घेणार नाही. “  हे त्यांचे ठाम मत होते. नेमके तेच शंकरला आवडत नव्हते. जर सरकार देण्यास तयार आहे तर का घेऊ नये, हे त्याचे मत होते. पण नानाजी आपल्या मतावर ठाम असायचे. दुकानात अनेकदा आमच्या वडलांसमोर हा शाब्दिक संघर्ष व्हायचा.  दोघेही आपली बाजू वडलांसमोर मांडायचे.  वडील शंकरला समजवायचे की,

‘त्यांच्या संमतीशिवाय काही होणार नाही. तेव्हा नानाजींना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शंकरने त्यांना त्याबद्दल आग्रह करू नये. ‘ शंकरला वाटायचे गुरुजींचे नानाजी ऐकतात.  तेव्हा गुरुजींनी त्यांना पेन्शनसाठी तयार करावे. पण आमचे वडील पक्के आदर्शवादी.  ते नानाजींना कधीच पेन्शनसाठी समजवायचे नाहीत. परिणाम असा झाला की शंकर नानाजीसोबत आमच्या वडलांचाही  विरोध करू लागला. आम्हाला मात्र शंकरचे पटायचे. पैशाची गरज काय असते ते आम्ही अनुभवले होते.  केवळ वडलांच्या तुटपुंज्या पगारावर आमचा मोठा परिवार चालवितांना आईची महिन्याच्या शेवटी होणारी ओढाताण आम्ही अनुभवत होतो. घरी शिकवणीला येणाऱ्या पोरांकडून फी घ्यावी असा तिचा आग्रह असायचा.  पण विद्यादानाचे पैसे घ्यायचे नाही हा आमच्या वडलांचा आदर्श. अनेकदा यावरून घरी झालेला संघर्ष आम्ही अनुभवला होता. त्यामुळे शंकर- नानाजींच्या संघर्षात आम्ही मनाने शंकरच्या बाजूला असायचो. तसे आमच्या विचारांना काहीच महत्व नव्हते, पण वाटायचे नानाजीनी पेंशन घ्यावी आणि घरचे,दुकानातील वातावरण आनंदी ठेवावे. पुढे पुढे नानाजीच्या दुकानातील वातावरण खूप तणावग्रस्त होत गेले. नानाजी आणि शंकर यांच्यात अबोला सुरू झाला. पुढे पुढे या तणावामुळे आमच्या वडलांचे नानाजींच्या  दुकानात जाणे कमी झाले. अचानक एक दिवस सकाळी शंकर आमच्या घरी येऊन धडकला.  त्याच्या हाती एक पोस्टाने आलेला लिफाफा होता, तो त्याने बाबांच्या हाती दिला. बाबांनी त्यातील पत्र काढून वाचायला सुरुवात केली.  कागदावरील अशोकस्तंभ खूण पाहून ते पत्र शासनाकडून आलेले आहे हे आम्हाला समजले. ते वर्ष महात्मा गांधीचे जन्मशताब्दीवर्ष होते, आणि शासनाने त्या निमित्ताने पेन्शन न घेणाऱ्या आदर्शवादी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते.  त्या यादीत नानाजींचे नाव होते, त्याचेच पत्र नानाजींना आले होते. पण नानाजी सत्काराला नाही म्हणत होते, त्यामुळे त्यांना समजवावे म्हणून शंकर आला होता. बाबांनी चौकशी केली, नकाराचे कारण विचारले–शंकर म्हणाला ‘ सत्कारासोबत अकरा हजार मिळणार आहेत  म्हणून ते नाही म्हणतात.’ आता मात्र बाबा गंभीर झाले.  विचार करून शंकरला म्हणाले,” तू जा. स्वीकारतील ते सत्कार “. दुपारी बाबा एकटेच नानाजीना भेटले. काय चर्चा झाली माहीत नाही, नानाजी तयार झाले. ठरलेल्या दिवशी बाबा, नानाजी, त्यांची पत्नी, व शंकर नागपूरला गेले.  तिथे नानाजींचा सपत्निक  सत्कार झाला.  ताम्रपत्र, खादीचे धोतर, बंगाली शाल, श्रीफळ व अकरा हजाराचा चेक नानाजीना,  व त्यांच्या पत्नीला नऊवारी पातळ- खण देऊन मंत्रीमहोदयाहस्ते सन्मानित केलं गेलं. सोबतच कार्यक्रमाच्या संचालकाने घोषणा केली. नानाजींनी मिळालेले अकरा हजार रुपये अनाथाश्रमाला देणगी म्हणून देऊन टाकले होते. केवळ ताम्रपत्र, चंदनाचा  हार,व खादीचे कपडे, शाल स्वीकारली. शंकरचा चेहरा उतरला.  पण वडलांनी त्याला समजावले, आश्वस्त केले –’ तुझा फायदा होईल.’- सारे चंद्रपूरला परत आले. आता मात्र शंकरचे बाबांकडे येणे वाढले. नानाजींना  मिळालेल्या ताम्रपत्रामुळे शंकरच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरू झाली. दोन्ही पोरांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून नोकऱ्या मिळाल्या.  शंकर जाम खुश झाला.आता मात्र नानाजी- शंकर अबोला संपला. पुन्हा बाबांचा दुकानातील वावर वाढला.  संघर्ष संपून आनंदोत्सव नांदू लागला.  पुन्हा बाबा- नानाजीचे कविता वाचन रंगू लागले. काही वर्षानंतर कळले की सत्कार होण्यासाठी नानाजींचे नाव आमदारांना सांगून बाबांनीच  शासनाला कळविले होते. आज नानाजीचे दुकान काळाचे ओघात नष्ट झाले.  तिथे नवीन दुकानांची इमारत उभी आहे.  पण आजही त्या रस्त्याने गेलो की नानाजीचे ते दुकान, तो संघर्ष डोळ्यासमोर  चलचित्रपटासारखा सरकत जातो.

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments