श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ बा.द.सातोस्कर….भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिलं- त्यांनी जाई ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग मेनका लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या शा अनेक कादंबर्या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या.- आता इथून पुढे ) —-
बा. द. सातोस्कारांची महत्वाची पुस्तके मात्र सागर साहित्यानी नाही, ‘शुभदा सारस्वत’चे प्रकाशक, गोगटे यांनी काढली आहेत. ही पुस्तके केवळ लेखक सातोस्कर यांची नाहीत, तर लेखक आणि संशोधक सातोस्करांची आहेत. ‘मराठी मासिकांचे पहिले शतक’ हे त्यांचे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले. हे पुस्तक माहितीपूर्ण आहेच, पण संदर्भ साहित्य म्हणूनही उपयोगी आहे. गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार हे पुस्तक ‘सागर साहित्या’ने ७५साली काढले. अर्वाचीन गोव्याचा इतिहास त्यांनी ३ खंडात लिहिला आहे. त्यांचे सर्वात महत्वाचे संशोधनपर पुस्तक म्हणजे गोमंतक प्रकृती आणि संस्कृती – ३ खंड. हे ग्रंथ ‘शुभदा सारस्वत’ ने प्रकाशित केले आहेत . यात गोव्याचा प्राचीन इतिहास आहे, गोव्याचे प्राकृतिक वर्णन आहे. समाजव्यवस्था, लोकांची संस्कृती, सण , उत्सव सगळे आहे. या ग्रंथाचा पहिला खंड १९७९ साली प्रकाशित झाला. याला ‘केसरी मराठा संस्थेचा तात्यासाहेब केळकर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर प्रकाशित झाले, ते ’बादसायन’ हे त्यांचे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र म्हणजे काही केवळ ‘बा.द. सातोस्कर’ यांचे स्वत:चे चरित्र नाही. त्याला गोव्याचे अस्तर आहे. गोमंतकीय समाज , तिथले लोकजीवन, तत्कालीन गोव्याचे वातावरण , गोव्याचा निसर्ग याला जोडून ते येते. ‘’बादसायन’ प्रकाशित झाले १९९३ मधे . ‘शुभदा सारस्वत’ नेच ते प्रकाशित केले. या दरम्यान त्यांनी रामायणाचा अभ्यास करून ‘अभिराम’ ही कादंबरी लिहिली. यावेळी त्यांचे वय होते ८० . त्याच अभ्यासातून पुढे ‘रामायणकालीन जमाती व संस्कृती असे एक छोटेखानी पुस्तकही लिहून टाकले.
१९८५ च्या दरम्यान दादा आजारी पडले. प्रकाशनासाठी करावी लागणारी दगदग त्यांना सहन होईना. आई आधीच गेली होती. मग त्यांनी ‘सागर साहित्य प्रकाशन’ बंद केले. ते शेवटचे माझ्या घरी आले, तेव्हा विषादाने म्हणाले होते, “ गोव्यात गेलो, तेव्हा दोन गोष्टी डोळ्यापुढे होत्या. मराठी हीच गोव्याची भाषा आहे, हे सिद्ध करायचे. आणि भाषिक व सांस्कृतिक एकतेच्या आधारावर महाराष्ट्र आणि गोवा यांचे एकीकरण घडवून आणायचे.” पण त्यांना हे शक्य झालं नाही, आणि याची बोच त्यांनी कायमची आपल्या काळजात वागवली.
पुढे माझ्या बहिणीने- लताने गोव्यातलं आपलं बिर्हाड – बाजलं हलवून पुण्याला मांडलं. मग गोव्यात जाणं झालंच नाही. नंतर दादा अर्धांगाने आजारी असल्याचे कळले. आई आधीच गेली होती. दादांना भेटून यावं, असं खूप मनात होतं. पण त्यांना भेटायला जाणं नाहीच जमलं. नंतर दादा गेल्याचीच बातमी पेपरमध्ये वाचली.
दादा म्हणजे, प्रकाशक, लेखक, संपादक, संशोधक, गप्पिष्ट, माणसांचे लोभी, कृतिप्रवण अशा व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंनी झळझळणारे लोलकाचे लखलखते झुंबर. ते मालवलं आणि गोव्याचं माझं माहेरही सरलं —-
-समाप्त-
©️ श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈