सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ तुलसी विवाह ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नुकतीच दिवाळी संपली आहे, पण तरी परवापासून सुरु झालेल्या तुळशीच्या लग्नामुळे अजूनही मस्त सणाचे  वातावरण आहे, नुसते आजूबाजूला नाही, तर फेसबुक वर पण..

आज असंच दिरांशी बोलता बोलता , तुळशीच्या लग्नाचा विषय  झाला … आम्ही सांगलीत असताना दिरांकडे धडाक्यात ते लग्न साजरे करायचो.. तेव्हा माझ्या मनात लहानपणापासून पाहिलेली तुळशीची लग्नं आठवायला लागली ! आणि वाटलं की खरंच आपण का करतो तुळशी चे लग्न ?,हे आताच्या पिढीला समजेल अशा पध्दतीने सांगायला पाहिजे ! म्हणून हा लेखनप्रपंच !

आम्हीही लहानपणापासून तुळशीचे लग्न पाहिलंय. पण आता मुलींना त्याची कारणमीमांसा पण लागते. त्यामुळे मी लगेच त्याबद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली. 

यामागची पौराणिक कथा आहे ती अशी–जालंदर नावाचा असुर देवांना अजिंक्य झाला होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. विष्णूने जालंदरचे रूप घेऊन वृंदेचे सत्वहरण केले. 

तेव्हा जालंदराने तिला शाप देऊन दगड केले. तेव्हा ती सती वृंदावनात प्रकट झाली. हीच ती  ‘तुळस ‘— विष्णूने याचे प्रायश्चित्त म्हणून तिच्याशी विवाह केला. विष्णूच्या कृष्णावतारात हे लग्न झाले. त्यामुळे आपण विष्णू आणि कृष्णाला तुळस वहातो.

—– या सर्व पुराणकथा झाल्या !

पण आताही आपण तुलसी विवाह का करतो ? आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्ट निसर्गाशी निगडीत केलेली आहे. निसर्गातील प्राणी, पशू- पक्षी, वनस्पती, वृक्ष- वेली, हे आपले सगेसोयरे आहेत. 

त्यामुळे माणूस या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सव करतो. जसे वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा… पंचमहाभूतांचे त्या निमित्ताने स्मरण केले जाते. 

तुलसी विवाहाची प्रथा ही अशीच आली असावी. तुळस ह्या वनस्पतीचे शास्त्रीय महत्व आहे. तुळशीचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे आहे. तिच्या मंजि-यांपासून असंख्य रोपे तयार होतात. सर्वांना ऑक्सिजन मिळावा म्हणून पूर्वी घराभोवती तुळशीची झाडे वाढवली जात. तुळशीमुळे कीटक येत नाहीत, इतकंच काय डासही कमी होतात. तुळशीचा रस अंगाला लावला की डास चावत नाहीत. तुळशीची पाने औषधी आहेत. तुळशीच्या पानांचा रस खोकल्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचेच्या रोगांवरही तुळशीचा रस उपयोगी असतो. अशी ही बहुगुणी तुळस पूजेसाठी योग्य ठरली !

पूर्वी च्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे समाजात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना घराबाहेरची मोकळी हवा मिळत नसे. अशा विचाराने बहुतेक तुळशीला रोज स्त्रियांनी पाणी घालण्याची पध्दत  आली असावी. पूर्वी वाडा संस्कृती होती, तेव्हा वाड्यात शिरले की  मधोमध तुळशी वृंदावन असे. 

ती एक पवित्र जागा असे, जिथे संध्याकाळी घरातील स्त्रिया, मुले बाळे बसून शुभंकरोती, परवचा म्हणत असत. तुळशीसमोरच्या पणतीच्या शांत उजेडात मनही शांत होऊन जाई !

या दिवसात चिंचा,बोरे,आवळे यायला सुरुवात होते. ही फळे म्हणजे व्हिटॅमिन ‘सी’ चा साठाच जणू ! त्यामुळे तुळशी विवाहाच्यावेळी ही सर्व फळे पूजेसाठी असत.आपोआपच घरातील मुलांना ती  खायला मिळत. उसाची मोठी झाडे आणून ती तुळशीला मांडव म्हणून वापरली जात. दिवाळी  झाल्यानंतर मुलांसाठी तुळशीचे लग्न हा एक आनंददायी कार्यक्रम असे. दिवाळीत राहिलेले फटाके 

तुळशीच्या लग्नात उडवून संपवायचे. दिवाळी फराळ संपत आला असला तरी नवीन लाडू, करंजी लग्नासाठी बनवली जात असे. तुळशीचे लग्न झाले की विवाह- मुहूर्त सुरू होत असत. आणि वातावरण सणांकडून लग्न समारंभाकडे वळत असे.

तुळशीचे लग्न ही गोष्ट आता जरी कालबाह्य वाटत असली तरी तुळशीचे गुणधर्म काही नाहीसे होत नाहीत ! निसर्ग आणि ईश्वर  यांची सांगड आपल्या संस्कृतीत अशा पध्दतीने घातली गेली आहे. शिक्षणामुळे ज्ञान वाढले, सुबत्ता आली, पण अशांतता ही वाढली. एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. प्रत्येक कुटुंब म्हणजे एक बेट बनले आहे !  हे असे प्रसंग लोकांना जोडून ठेवायला मदत करतात. . हल्ली लोकांना एकटेपणा मुळे इतक्या मानसिक समस्याना तोंड द्यावे लागते.. नुसती  भौतिक प्रगतीच नाही तर मन:स्वास्थ्य  जपणे हे तितकेच महत्वाचे आहे . आपल्या संस्कृतीतून हे  आपसूकच घडून येत असे

— दुसऱ्याच दिवशी तुळशीचे लग्न करून मुलीने पण तुळशी लग्नाचे फोटो पाठवले. स्वत: छान साडी नेसलेला, नातीने परकर पोलके घातलेला, आणि नातवाने तुळशीसाठी अंतरपाट

धरलेला आणि हे सर्व कौतुकाने जावई बघत आहेत—असे फोटो मोबाइलवरून आले.आणि क्षणार्धात माझे मन विमानाच्या वेगाने दुबईला पोचले…तुलसी विवाह कसा साजरा झाला हे बघण्यासाठी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments