सौ.अस्मिता इनामदार
मनमंजुषेतून
☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार☆
चुनीलालजींना चालतांना कष्ट पडतात, पण आठवड्यातून कमीतकमी ३ वेळा ५०० मीटर लांब असलेल्या शंकर मंदिरात ते नियमित जात असतात. भाविक प्रवृत्तीचे आहेत. भगवान शंकराचं मंदीर आमची इस्टेट आहे, असं म्हणत ते दर्शनाला जातात. चांगली गोष्ट आहे !
माणूस श्रद्धावानच असावा. दगडाच्या देवावर, देवस्वरूप माणसांवर, सत् अशा कार्यांवर माणसाची श्रद्धा असणं स्वाभाविक आहे. पशू नसल्याचं… आणि माणूस असल्याचं ते एक लक्षण आहे.
पण देवळांतील देवावर श्रद्धा ठेवत असता, आपल्या क्षेत्रात काही अन्य सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांद्वारे, राष्ट्र चिंतन,राष्ट्र आराधन, राष्ट्र उपासना चालत असते, तिकडे चुनीलालजी ढुंकूनही वळत नाहीत.
मोक्ष हा वैयक्तिक पुरुषार्थ आहे. देवळात जाण्याने मोक्ष मिळतो….आणि मातृभूमीच्या संवर्धनार्थ योजिलेल्या कार्यात,आयामात, प्रकल्पांत तो मिळत नाही,असं वाटणं कितपत योग्य आहे ?
मला वाटतं, या क्षेत्रात मोक्ष तर मिळतोच… पण ‘धर्म-पुरुषार्थ’ ही घडतो. आपल्या वैयक्तिक सत्कर्मात व संस्थांच्या सेवा प्रकल्पात धर्म आहे, ऋणमोचन आहे, ऋण फेडल्याचं समाधान आहे… हे आम्ही लक्षात घ्यायला हवे की नको ?
जय भोलेनाथ ! जय श्रीकृष्ण ! प्रभू श्री रामचंद्रकी जय ! याच सुरात व याच भाव-भक्तीने, तन्मयतेने “भारत माता की जय !” चा जयजयकार तितकाच मोक्षदायी नाही का ?
देवासमोरचं कीर्तनसुद्धा आता अध्यात्मिक कमी व राष्ट्रीय अंगाने जाणारे अधिक होते आहे…. तेव्हा मोक्ष संकल्पनेचे तात्पर्य-अर्थ देव, देऊळ यातच सिमीत आहेत… असं मानणं उचित नाही.
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी राष्ट्र कारण केलं… संत गाडगेबाबांनी स्वच्छकारण केलं… कुणी महापुरूषांनी दलित समाजोद्धाराचं कार्य केलं… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व स्वयंसेवकांनी सेवा कार्ये पार पाडली, पाडताहेत…. मातृभूमीच्या रक्षणार्थ सैनिकांनी बलिदान केले… आजही करताहेत… या सर्वांना ‘धर्म व मोक्ष’ हे दोन पुरूषार्थ तर प्राप्त झालेच, शिवाय अधिक काही !
जीवनाचा परमार्थ उलगडण्याचे जिथे प्रामाणिक प्रयत्न होतात, तिथेही धर्म व मोक्षाचं दान पडतं, हे समजून घ्यायला हवे.
आपल्याला काय वाटतं ?
ले : मुकुंद पुराणिक
संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈