सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  मनमंजुषेतून ?

☆ आठवणी दाटतात ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

ऐकताच त्या काव्य ओळी—

आठवणी दाटतात—

माझे लग्न ठरले. त्यावेळी वडीलांनी आम्हाला सर्वांना ‘ या सुखांनो या’ हा सिनेमा दाखवला होता. आता केव्हाही  ‘या सुखानो या’ हे गाणे ऐकले की त्या मधुर आठवणी जाग्या होतात. एका निमित्ताने सीमाताई देवांशी बोलताना आम्ही या सिनेमाबद्दल, आठवणीबद्दल बोललोही आहोत.

माझ्या लग्नातली ही आठवण– लग्न अगदी थाटात लागले. ‘मिष्ठान्नम् इतरे जन:|’ या उक्तीप्रमाणे पंगतीवर पंगती उठत होत्या. लग्न मिरजेतील एका नामांकित कार्यालयात होते. त्याकाळी आजच्यासारखी सगळीकडे कार्यालयांची सोय नव्हती. त्यामुळे मिरजेतील कार्यालयांचा खूप नावलौकिक होता. माझे माहेर एक छोटेसे तालुक्याचे गाव होते. तिथल्या बऱ्याच जणांनी अशा कार्यालयातील लग्न पाहिलेलेच नव्हते‌. त्यामुळे बऱ्याच जणांना रंगीत पाटांची मांडणी, रांगोळ्या, उदबत्या, आग्रहाने वाढलेली पंगत या गोष्टींची खूपच अपूर्वाई वाटली.

ह्या पंगती सुरू असतानाच सर्व लग्न विधी पार पडले. आता दोन्हीकडची मानाची माणसे जेवायला बसणार होती. त्यामुळे या खाशा पंगतीसाठी गरम गरम भजी, पुऱ्या,  मसालेभात वगैरे खास व्यवस्था केली होती. रांगोळ्या, समया, उदबत्या, चांदीचे ताट- वाटी, असा थाट होता. आम्ही दोघे मध्ये आणि आजूबाजूला सर्व नातेवाईक असे जेवायला बसलो. उखाणे घेत आम्ही एकमेकांना घास दिले. हसत खेळत पंगत सुरू झाली

ह्यांच्या मामींनी  ‘ लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके ‘ हे गाणे खूप छान म्हटले. ऐकून जरा धीर आला‌. तोपर्यंत एक जणीने ‘ गंगा यमुना डोळ्यात उभ्या का ‘ हे गाणे सुरू केले आणि सगळे वातावरणच बदलून गेले.

माझे वडील आधीच खूप संवेदनशील होते. त्यातच आजी गेल्यापासून जास्तच हळवे झालेले होते. या गाण्यामुळे त्यांचे डोळे भरून आले. मी १- २ वर्षांची लहान असताना आई-वडील मला लाडाने बाळे म्हणत असत. ‘कडकडूनी तू मिठी मारता बाळे’  ही ओळ ऐकली आणि माझ्या वडिलांच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. त्यांचे पाहून बहुतेकांचे डोळे पाणावले. एक दोघींनी तर हुंदके दिले. पाहता पाहता पंगतीचा सगळा नूरच पालटला. रंगाचा पुरता बेरंग झाला होता. पक्वान्नांची तर चवच गेली होती.

माझी अवस्था फारच केविलवाणी झाली होती. शेजारी नवरदेव आणि सासरची मंडळी. सर्वांच्या नजरा आमच्यावर खिळलेल्या. त्यामुळे तोंडावर उसने हसू आणत कसेबसे जेवण पार पाडले. दुपारचा हा प्रसंग अनुभवल्याने संध्याकाळी सासरी जायला निघताना रडू आवरण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. त्याचे माझ्या मनावर इतके दडपण आले की नंतर दोन-तीन दिवस चक्क दुखणे आले.

काही काही माणसांना काळ-वेळाचे भानच नसते. आपल्या कृतीने इतरांच्या आनंदावर विरजण पडते, याचे त्यांना काहीही देणे घेणे नसते. आमच्या लग्नाची ही पंगत माझ्या मनात कायमची घर करून बसली आहे. लग्नातल्या इतर सर्व आनंददायी गोष्टींवर तिने जरा जास्तच मात केलेली आहे. प्रत्येक गाण्याला गीतकार, संगीतकार, गायक यांच्या दृष्टीने एक विशिष्ट असा इतिहास असतो. या गाण्यामुळे हा असा इतिहास माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. लग्नाला यंदा ४५ वर्षे होतील. पण आजही जेव्हा केव्हा हे गाणे मी ऐकते तेव्हा नकळत डोळ्यांपुढे धुके दाटतेच.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments