श्रीमती उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
☆ घन तमी शुक्र बघ राज्य करी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
भास्कर रामचंद्र तांबे
घन तमी शुक्र बघ राज्य करी
सध्या झी मराठी चॅनेलवर सारेगमप लिटिल चॅम्पस् ही गाण्याची स्पर्धा चालू आहे. मध्यंतरी एका चिमुरडीने,
‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा
ताई आणखी कोणाला? चल रे दादा चहाटळा’
हे गाणं सादर केलं. त्या गाण्याने माझं बोट धरलं आणि मला थेट शाळेत घेऊन गेलं. ६वी-७वीचा वर्ग असेल. ऑफ तास असला की गाण्याच्या भेंड्या खेळायच्या हे अगदी नक्की ठरलेलं. मग, सुरुवातीलाच काही काही अक्षरांची गाणी आठवून ठेवायची. ‘त’अक्षर आलं की पहिल्यांदाच म्हंटलं जाई, ‘तुझ्या गळा माझ्या गळा …’ सुरुवात कोणी का करेना, दोन्ही गट गाणं म्हणायला लागत. यात आपोआपच मुलांचा गट, दादाच्या ओळी म्हणे आणि मुलींचा गट ताईच्या ओळी. हे गाणं खरं तर हळुवारपणे ताईची गोड चेष्टा करणारं. पण ते एकमेकांकडे बघून हावभाव करत म्हणताना, कव्वालीच्या जुगलबंदीचं त्याला रूप येई. पुन्हा ‘त’ आलं की ‘तिनिसांजा सखे मिळाल्या हे ठरलेलं. ‘ड’ आलं की पहिलं गाणं असे, ‘डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये. शंख फुंकीत ये… येई रुद्रा.. येई रुद्रा.’ सुरुवात कुणी तरी करे आणि मग सर्व वर्गच त्याला साथ देई. गाणं कोरसमध्ये ‘खणखणत येणार्यां शूलाप्रमाणे’ खणखणित आवाजात गायलं जाई. इतक्या खणखणित आवाजात की शेजारच्या वर्गातून कुणी तरी सांगत येई, ‘डमरू जरा हळू वाजू दे आमच्या वर्गात सरांनी बोलेलेलं आम्हाला ऐकू येत नाही. आमचे आवाज थोडे खालच्या पट्टीत यायचे. ‘र’ येताच पुन्हा कोरस सुरू व्हायचा.,
‘रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी
ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. इथे झाशीच्या राणीचं स्मरणही खणखणत शूल ये, याच जातकुळीतलं करायचं.
ही भा.रा. तांबे यांची गीतं अगदी दुसरीपासून पाठ्यपुस्तकात असलेली आणि आम्ही अभ्यासलेली आठवताहेत. इयत्ता दुसरीत, ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहूणीया दूर ‘ अशी निखळ निसर्ग वर्णनाची कविता होती, तर चौथीमधे ‘या बाळांनो यारे या. लवकर भरभर सारे या.’
६वी किंवा ७ वीत ‘रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ‘ ही कविता होती. पुढे बहुतेक ९ वीत ‘मधु मागासी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी ‘ ही रूपकात्मक कविता. आता नवीन लिहिण्याची शक्ती नाही, असे सांगणारी’ (मधू पिळण्या परी रे बळ न करी’ आणि ११वीत होती ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही शाश्वत सत्य उलगडून दाखवणारी कविता॰ अशा कविता आभ्यासल्या होत्या. त्यांच्या कविता सहज पाठ होत. मुद्दाम त्यासाठी पुस्तक डोळ्यासमोर धरून पाठ करायची जरूर नसे. या सगळ्या कवितांची गीतं झाली होती आणि ती ऐकून ऐकून पाठ होतच होती.
पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर ‘मराठी कवितेचा इतिहास’ अभ्यासताना भा. रा. तांबे अर्थात भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता अभ्यासली. १९३५ साली राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि पुढे याच्या अनेक आवृत्या निघाल्या. ग्वाल्हेर संस्थानचे ते राजकवी होते. वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतले होते. याशिवाय हिन्दी कविता, उर्दू नज्म , गझल याविषयी त्यांचा अभ्यास होता. या दोन्हीचे संस्कार घेऊन ताब्यांनी कविता लिहिल्या. त्यांची कविता साधी, सहज, सुलभ होती. कवितांचा अर्थ सहज समजे. त्यांच्या लेखनाने आनंददायी कवितेची वाट प्रशस्त झाली.त्यांच्या कवितांची गीतरूपे आकाशवाणीवरून प्रसारित झाली॰ अजूनही होत आहेत.. आकाशवाणीवर वाजताहेत. कार्यक्रमात गायली जाताहेत.. त्यांच्या शब्दांना स्वरसाजाचे लखलखीत सुवर्ण कोंदण लाभले आणि त्या कोंदणात त्यांची कविता हिर्या्सारखी झळाळून उठली. त्यांना गीतकाव्याचे प्रवर्तक असं सार्थपणे म्हंटलं जातं. त्यांचं एक गीत आहे, ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी..’ मनाची खिन्नता घालवण्यासाठी ते सांगताहेत, ‘ अंधार घनदाट असला, तरी वर शुक्रतार्या्कडे बघ! बघ. तो कसा अंधारातही तेजाळतो आहे ते! त्या शुक्राप्रमाणेच त्यांची गीते जनमानसावर गारुड करतात. त्यांना आनंद देतात.
कॉलेजमध्ये असताना आम्हाला त्यांच्या
‘तिनिसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला
आजपासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला’, ‘नववधू प्रिया मी बावरते’ झालंच तर ‘ डोळे हे जुलमी गडे’, कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी’, या सारख्या अनेक गीतांनी मोहवलं होतं.
आज मात्र त्यांच्या शाश्वत सत्य सांगणार्याै ‘मावळत्या दिनकरा’, मधू मागसी माझ्या, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय ‘ सारख्या कविता अधीक जवळिकीच्या वाटू लागल्या आहेत.
आपल्या कवितांनी दैनंदिन जीवनातील दु:खे विसरायला लावणार्याट भा. रा. तांबे यांच्या स्मृतीला नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन.
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈