डाॅ. मेधा फणसळकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर ☆ 

मनुष्याला ‛मी’ पण मिळवून देणारा सार्थ शब्द म्हणजे ‛अहंकार’! मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. म्हणूनच इतर पशु- पक्ष्यांपेक्षा तो वेगळा गणला जातो. आपल्या भावना तो आपल्या संवादातून , कृतीतून व्यक्त करु शकतो. म्हणूनच  जिथे सुख आहे तिथे दुःख, जिथे प्रेम आहे तिथे द्वेष आणि जिथे राग आहे तिथे लोभ हे हातात हात घालून असतात. त्यामुळेच जिथे स्वत्व आहे तिथे ‛अहम्’ असलाच पाहिजे असा अलिखित नियम आहे.

हा अहम् माणसाला कोणत्या स्तरापर्यंत पोहोचवू शकतो याची शेकडो उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. या ‛अहम्’ नेच हिटलरचा बळी घेतला. जग जिंकणारा सिकंदर या ‛अहम्’ पुढेच नमला. आपल्या मुझद्दीपणाने अनेक लोकांचा बळी घेणारा औरंगजेबाचा  अहम् चा तोरा  संभाजीराजांसारख्या राष्ट्रनिष्ठ व्यक्तीच्या देशभक्तीपुढे फिका पडला. मात्र अहम् ला जिंकणारे या जगात अजरामर झाले.स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा…… किती नावे घ्यावीत तेवढी थोडीच आहेत.

खरं तर मनुष्य जन्माला येताच त्याचा ‛को$हम्’ (मी कोण?) चा प्रवास सुरु होतो. परंतु ‛अहम् ब्रह्मा$स्मि’ (मी ब्रह्म आहे) पर्यंत सर्वांचा प्रवास होतोच असे नाही. त्यामुळे हा अहम् च आपण कुरवाळू लागतो.

लहान असताना आपण पंचतंत्रात एक गोष्ट वाचली होती . त्यामध्ये बेडकीची पिल्ले गाय बघून येतात आणि आईकडे तिचे वर्णन करतात. ती केवढी मोठी होती हे समजण्यासाठी ती स्वतःचे शरीर फुगवून “ एवढी मोठ्ठी का?”असे विचारते. तेव्हा मुले म्हणतात,“नाही, त्यापेक्षा मोठ्ठी!” मग बेडकी आणखी अंग फुगवते. पुन्हा विचारते, मुले पुन्हा नकार देतात, पुन्हा ती फुगते व फुगत फुगत शेवटी मरुन जाते. त्याचप्रमाणे आपण या अहम् चा  फुगा फुगवू लागतो. आपल्याच कौतुकात आपण मग्न होऊन जातो. त्यामध्ये आपण इतरांचा बळी घेतो आहोत हे लक्षातच येत नाही.मात्र कधीतरी या भ्रमाचा भोपळा फुटतो व आपण जमिनीवर येतो. पण त्यावेळी हातात  बाकी शून्य राहिलेली असते.

पण अहंकार सोडणे म्हणजे स्वाभिमान सोडणे नव्हे. जिथे गर्वाची भावना येते तिथे अहम् वाढतो.मात्र आत्मसन्मान स्वाभिमान वाढवतो. आमचा ‛आयुर्वेद’ म्हणता म्हणता अमेरिकेसारखा देश आमच्या देशातील हळदीसारख्या औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवते. जगात क्रिकेटमध्ये  अव्वल नंबरवर असणारे आम्ही वर्ल्ड कप क्रिकेटमधून बाहेर पडतो किंवा एक अहवाल ओबामाना सांगतो की त्यांच्या देशातील बरीच ‛ टॅलेंट’ ही भारतीय आहे ज्याचा उपयोग ते त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी करुन घेतात. किंवा आमच्या सहिष्णुतेला दुर्बलता समजून पाकिस्तान किंवा चीनसारखे देश आम्हालाच आव्हान देत घुसखोरी करतात.  या सर्व घटना खरोखरच आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या आहेत. म्हणूनच आता केवळ अहम् कुरवाळण्यापेक्षा स्वाभिमानाची कास धरण्याची गरज आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments