? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 4 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजात शिकत असतानाच पत्रकारिता केल्याने, विविध क्षेत्रीच्या थोरा-मोठय़ांकडे सहजतेनं जाता आलं आणि त्यातून नव्यानं सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’ साठी नव-नवे विषय सुचवू शकलो. व्यंकटेश माडगूळकर, ना. ग. गोरे, लालचंद हिराचंद, आबासाहेब गरवारे, शकुंतला परांजपे, बाळासाहेब ठाकरे अशा ५० नामवंतांच्या तरुणपणीचे अनुभव, त्यांचं करिअर घडणं, पत्रकारितेच्या निमित्ताने ऐकता ऐकता, ‘दूरदर्शन’साठी ‘आमची पंचविशी’ ही मुलाखत मालिका वर्षभर केली. तर नामवंतांच्या घरातील मुलांशी बोलण्यातून जान्हवी प्रभाकर पणशीकर, कीर्ती जयराम शिलेदार, जयंत भीमसेन जोशी, रमेश स्नेहल भाटकर, श्रीधर सुधीर फडके अशा कित्येक मुलांची मानसिकता समजून घेणारा, ‘वलयांकित’ हा कार्यक्रम ‘दूरदर्शन’वर करू शकलो. डेक्कन क्वीननं प्रवास करताना पुणे स्टेशनवर डेक्कन क्वीनच्या डब्यावर हात ठेवणारा उंच मुलगा पाहून वर्षभरात वेगळी वाटणारी पन्नास माणसं ‘ मुलुखावेगळी माणसे ’मध्ये आणू शकलो.

जितेन्द्र अभिषेकीबुवांशी गप्पा मारत, गाणं समजून घेत, ‘मत्स्यगंधा ते महानंदा ’ हा अभिषेकी संगीताचा कार्यक्रम (कामत, आशाताई, राजा काळे आदींसह) जयराम, जयमाला- कीर्ती- लता- किरण भोगलेशी बोलत, ‘गंधर्व सुरांची शिलेदारी’, गोव्याच्या समुद्रावर काकतकरच्या साथीनं जाऊन, बाकीबाबांशी गप्पा मारत, ‘कांचनसंध्या’ असे गाण्यांचे कार्यक्रम करू शकलो. हे सारं ‘नक्षत्रांचं देणे’ संकल्पना येण्यापूर्वी ! फक्त ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ कार्यक्रमात अडकून न पडता, ‘स्मरणयात्रे’च्या कोषात न थांबता, दगडूशेठ गणपतीच्या शतकोत्सवात सारसबागेच्या मैदानावर गजानन वाटवे, ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे, पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, श्रीधर फडके अशा भावगीतकारांच्या तीन पिढय़ा सादर करू शकलो. अरुणभय्या आणि बाळासाहेब मंगेशकर यांचे स्वतंत्र कार्यक्रमही सूत्रबद्ध केले. अरुण काकतकरांमुळे भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषाताई, मीनाताई, हृदयनाथजी, अशा पाचही मंगेशकर भावंडांच्या मुलाखती आणि गाणी ‘दूरदर्शन’वर प्रथम सादर करण्याची संधी मला मिळाली. आणि आशा भोसलेंच्या मुलाखती- गाण्यांचे कार्यक्रम तर गेली २७ वर्षे करत आलोय. भेटलेल्या माणसांच्या गप्पांच्या नोंदी रोज रात्री रोजनिशीत नोंदवायची सवय असल्याने, संदर्भाच्या साडेतीन हजार फायली (माझ्या आरंभकाळात कॉम्प्युटर सोय नव्हती) सांभाळून आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या किमान दोन पिढय़ांशी रंगमंचावरून, कॅमेऱ्यासमोर मुलाखतवजा- संवाद सहजतेनं जमवू शकलोय.

मॉरिशसला व्यासपीठावर माणिकबाई वर्माना घेऊन आलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या (माझी फिरकी घेणाऱ्या) उत्स्फूर्त वक्तव्यानं अस्वस्थ न होता, सभ्य प्रतिउत्तर देऊ शकलोय ते माहितीचे संदर्भ सतत ताजे ठेवण्यामुळे ! माणिकताईंच्या गाण्यातून अनेकांची प्रेमं फुलली असल्याने मी त्यांना विचारलं की, ‘‘माणिकताई, माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं?’’ यावर माणिकताईंनी काही उत्तर द्यायच्या आधीच, त्यांच्या बाजूला उभे असलेले पु. ल. देशपांडे म्हणाले, ‘‘अरे सुधीर, तिच्या वर्मावर कशाला घाला घालतोयस?’’ यावर पु.लं.कडे बघत मी पटकन उत्तरलो, ‘‘मी कोण त्यांच्या वर्मावर घाला घालणार? त्यांचा ‘वर्मा’ ‘अमर’ आहे.’’ या उत्स्फूर्ततेला पु.लं.नीही ‘दाद’ दिली.

मला नामवंतांशी संवाद साधण्याच्या संधी खूप मिळाल्या. हिंदी अभिनेते-अभिनेत्रींच्या जवळ जाता आलं ते देवयानी चौबळ नामक सत्तरच्या दशकात फिल्म जर्नालिझममध्ये टेरर असलेल्या ‘स्टार अ‍ॅण्ड स्टाइल’च्या संपादक ज्येष्ठ मैत्रिणीमुळे. ‘मनोहर’ साप्ताहिकात मी काम करत असताना, आमच्याकडे त्या ‘चंदेरी च्युइंगम’ सदर लिहायच्या. दत्ता सराफांनी चौबळसंपर्काची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्या हाजीअलीसमोर एनएससीआय क्लबवर राहायच्या. दर बुधवारी मी मुंबईला त्यांच्याकडे जायचो. त्या मला घेऊन थेट हिंदी ग्लॅमरस पाटर्य़ाना, नटांच्या घरी घेऊन जायच्या. त्यामुळे इंग्रजी फिल्मी मासिकांची भाषांतरं न करता थेट बातम्या मिळायच्या. राजेश खन्नाच्या साखरपुडय़ाला, धर्मेद्रच्या मारहाणीला मी साक्षी होतो.

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

खूप सुंदर लेख सुधीरजी,जुन्या आठवणी जाग्या झाल्या.देवयानी चौबळ चं बिनधास्त लेखन खूप आवडायचं! मलाही त्या काळात सिनेपत्रकार व्हावंसं वाटलं होतं.