डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

तुकारामांनी म्हटलेली ही कळवळ्याची जाती, काही माणसे उपजतच घेऊन येतात. ते त्यांच्या सहजवृत्तीतूनच होते.

माझा भाचा आदित्य हा त्यातलेच एक उदाहरण. 

किती लहान होता तो. एक दिवस घरी आला आणि म्हणाला,” मला लवकर खायला दे, खूप भूक लागलीय. “

आई म्हणाली, ‘ डबा नाही का खाल्लास? ” तर काहीच बोलेना.

एवढ्यात शेजारचा  कुशल आला. ” म्हणाला काकू ,आज ना,डबा खायच्या सुट्टीत गंमतच झाली. आम्ही डबा खायला सुरवात करणार, इतक्यात बागेला पाणी देत असलेला माळ्याचा मुलगा चक्कर येऊन पडला आदित्य लगेच उठून गेला. तो मुलगा उपाशी होता,सकाळपासून. 

अहो,आदित्यने स्वतःचा डबाच देऊन टाकला त्याला. आम्ही नाही बाबा दिला.’

आदित्य तरी गप्पच होता.आदित्यला काकू रागावत नाहीत,हे बघून कुशल निघून गेला. 

स्वातीने त्याला पोटाशी धरले. ” आदित्य,खूप गुणी मुलगा आहेस रे. पण कसा निभाव लागेल बाबा तुझा या जगात…. ? “

आदित्यचे  छंदही जगावेगळेच होते. एक दिवस कचरा पेटीजवळ कुडकुडत असलेले कुत्र्याचे पिल्लू घेऊन आला. वर आईला म्हणाला,” आई रागावू नकोस ना. माझ्या वाटणीचे दूध आणि पोळी त्याला दे.” 

ते पिल्लू काय मग—घरचेच झाले. रोज आदित्यची रिक्षा आली की पळत पळत रिक्षामागे धावायचे. तो शाळेतून यायची वेळ झाली की असेल तिथून येऊन पायरीवर वाट बघत बसायचे. 

त्यांच्या घरातल्या कामवाल्या बाईला हा भांडी घासायला मदत करायचा. तिच्या मुलाला शिकवायचा. त्याचा अभ्यास घ्यायचा. अजूनही तो मुलगा– गणेश हे विसरला नाही. 

म्हणतो,” आदित्य दादामुळे मी शिकलो. नाहीतर बसलो असतो असाच, वाईट संगतीत. 

आदित्यदादामुळे मी  graduate झालो. किती वेळा गुपचूप माझी फी भरलीय त्यांनी—

माझी  मुलगी पण लहानपणी जगावेगळीच होती. सगळ्या जगाचा तिला कळवळा. तिचा आवाज अतिशय सुंदर म्हणून मी तिला गाण्याच्या क्लासलाही घातले होते शाळेतला गाण्याचा कोणताही कार्येक्रम श्रुतीशिवाय व्हायचाच नाही. एकदा शाळेतून गाण्याच्या बाईंचा निरोप आला, ” येऊन भेटा.”– मी गेले भेटायला. त्या म्हणाल्या,” श्रुती यावेळी भाग घेणार नाही म्हणते. असे का? ती असे कधी करत नाही.” 

घरी आल्यावर मी विचारले तर म्हणाली, “आई, बाईंनी, माझ्या पट्टमैत्रीण गौरीला गाण्यातून काढून टाकले. तिला किती वाईट वाटले असेल अग. मग तिच्याशिवाय मी कशी घेऊ भाग ?”

मी कपाळाला हात लावला–‘ देवा।कसे होणार या मुलीचे पुढे आयुष्यात.’

एकदा तर तिने कळस केला. 

गणितात हिला १00 पैकी १00 मार्क मिळाले. आणि तिची मैत्रीण कमी मार्क मिळाले म्हणून रडत होती. हिने बाईना सांगितले, ” बाई,माझ्यातले 10  मार्क द्या ना अनुजाला, म्हणजे तिचे मार्क वाढतील.” 

या असल्या स्वभावाची तर मला चिंताच वाटू लागली पुढे पुढे.

एकदा म्हणाली, ” तुम्ही दोघेही डॉक्टर आहात ना, मग माझ्या शाळेत शिबिर घ्या की. 

आमच्या शाळेतल्या गरीब शिपाई आणि शिपाईबाईना कोणीच तपासत  नाही. “

 आम्हाला तिचे इतके कौतुक वाटले. आम्ही तिच्या शाळेत खरोखरच फक्त सेवक वर्गासाठी शिबिर घेतले. मुख्याध्यापक बाईनी श्रुतीचे त्यासाठी मुद्दाम आभार मानले. पण ही शांत बसली होती. तिला ना गर्व, ना आपण फार काही केल्याचा अभिमान—-

आणि हे स्वभाव कायम राहतात. तीव्रता कमी जास्त होते,पण जात मात्र नाहीत. अर्थात ही माणसे इतकी सरळ असतात–सुदैवाने त्यांचे काही वाईटही होत नाही म्हणा. 

पण मग पुढे, लबाड जगात, माणसे ओळखायची कला यांना येत नाही. अनपेक्षित फटके बसले, की कळवळतात. पण धडे कुठे घेतात ?नाहीच। मूळ स्वभाव जात नाही.

यथावकाश श्रुतीचे लग्न झाले. अगदी लाखात एक नवरा मिळाला, आणि परदेशात निघूनही गेली एकदा भारतात सुट्टीवर आले होते दोघे. सहज बोलताना जावई म्हणाला, ” तुमची मुलगी वेगळीच आहे हो।” 

म्हटले ‘ बाप रे,आता काय ऐकावे लागतेय.’

म्हणाला, ” हिचा गेल्यागेल्या लगेचच वाढदिवस होता. तर मी विचारले पार्टीला कोणाकोणाला बोलवायचे ग .तर गप्पच बसली. मग म्हणाली,पार्टी बिर्टी नको. मला इथला अनाथ मुलांचा आश्रम दाखव. आपण त्या  मुलांच्यात सबंध दिवस घालवू. त्यांना खाऊ पुस्तके, गिफ्टस देऊ. 

चालेल ना तुला ? “

त्याला इतका अभिमान वाटला तिचा. तो दिवस त्यांनी अक्षरशः एन्जॉय केला त्या मुलांबरोबर. 

आता दरवर्षी ते त्या आश्रमातच आपला वाढदिवस साजरा करतात. 

नंतर  तिला मुलगा झाला. त्याला घेऊनही हे तिकडेच जाऊ लागले, आणि त्याचाही वाढदिवस तिथेच साजरा करू लागले. मुलानेही सही सही आईचा सहृदय स्वभाव उचललाय. तो वेडा तर स्कॉलरशिपचे मिळालेले पैसेही,कोण्या गरीब मुलाची फी भरून खर्च करून टाकतो.

‘ कुठून येते हे?’–मला खूप आश्चर्य वाटते. आता  माझा भाचा आदित्य मोठा झालाय. खूप छान नोकरी आहे त्याला बोटीवर. परवा आला होता तर अंध शाळेत गेला, आणि खूप मोठी रक्कम त्या मुलांना लॅपटॉप घेण्यासाठी देऊन आला.म्हणाला,” मला शक्य आहे म्हणून पैसे दिले

डोळे तर नाही ग देऊ शकत.” 

आमचे डोळे नुसते भरून आले. केवढे हे मोठे मन. 

आपल्या तुकोबा माउलींनी तर ही जात केव्हाच ओळखली होती हो. किती द्रष्टे असतील तुकोबा—-म्हणूनच म्हणून गेलेत —

ऐसी कळवळ्याची जाती

करी लाभावीण प्रीती.

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments