सुश्री सुनिता गद्रे
मनमंजुषेतून
☆ हिंदी आणि मी— भाग पहिला ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट! माझे लग्न ठरले आणि माझ्या आजीला नातीला लग्नानंतर दिल्लीला…इतके दूर पाठवावे लागणार या विचाराने रडूच कोसळले.
” जावयांना इकडे बदली करून घ्यायला सांग. तिकडची भाषा वेगळी.लोक वेगळे. त्यांचे रीतीरिवाज… सगळेच वेगळे. वेळ प्रसंगी मदतीची गरज वाटली तर ही बिचारी काय करणार?” तिने बाबांच्या मागे टुमणेच लावले .(तेव्हा आता सारखे घरोघरी फोन, हाता- हातात मोबाईल नव्हते.)
“अगं जावयांचा जॉब ट्रान्सफरेबल नाही.” बाबा आपल्या आईला समजावत होते,” आणि हल्ली या चिमण्या तर नवरोबाबरोबर सातासमुद्रापार पण मजेनं उडून जातात… तिथं दिल्लीची काय कथा? ना पासपोर्ट ना व्हिसा…ठरवलं की एक -दोन दिवसात येथे हजर!..”
माझ्यासाठी म्हणायचं झालं, तर जिने महाराष्ट्राची राजधानी, मुंबई पण पाहिली नव्हती तिला देशाच्या राजधानीत वास्तव्य करायला मिळणार होतं. इतर सगळ्या गोष्टींबरोबर हा एक प्लस पॉइंट पण होता…. अन् भाषेचं काय विशेष? मला एस. एस .सी. ला हिंदीत 75% मार्क मिळाले होते. (तेही त्या वेळच्या कडक मार्किंग सिस्टीममधे!) …मी टिळक विद्यापीठाच्या हिंदीच्या तीन परिक्षातही प्रथम श्रेणी मिळवली होती. आणि हां, हिंदी पिक्चर बघतोच की आपण. छान कळतात ते …मी भाषेच्या बाबतीत थोडी ओव्हर- कॉन्फिडन्टच होते. (तेव्हा महाराष्ट्रात टेलिव्हिजन पोहोचला नव्हता आणि शेंबड्या पोरालासुद्धा हल्ली जसे हिंदीत बोलता येते, तितपत हिंदीही कोणाला बोलता येत नसायचे.)
यथावकाश आम्ही दिल्लीला पोहोचलो. ( तिलक ब्रिज की मिंटो ब्रिज ?) नक्की आठवत नाही, पण ट्रेन तिथे थांबली होती आणि गाडीतून घडलेल्या दिल्लीच्या पहिल्या दर्शनातच मी तिच्या प्रेमात पडले होते.
दुसऱ्या दिवशी घरमालकिणीचा छोटा मुलगा आमच्याकडे आला. “ऑंटीजी कल आप दोनों के लिये हमारे घर में दावत है .” वह बडा खुश होकर बोल रहा था. “वह सब कुछ मम्मीजी आपको बतायेगीही. लेकिन अभी आप को मम्मीजी ने बुलाया है .थोडी देर के लिये ! अंकल आज घर पर नहीं है नं…” मी ,उद्या आम्ही दोघं मिळून येऊ असे सांगून नकार देणार होते. पण तो इतक्या गोड आवाजात बोलत होता की मला नाही म्हणवलेच नाही. मिठाईचा एक पॅक घेऊन मी त्या छोट्या बरोबर त्यांच्या घरी गेले आणि त्याच्या आईच्या हातात तो देऊन मी वाकून त्यांना एका हाताने चरणस्पर्श केला.( हिंदी पिक्चर स्टाईल मधे!)
बसल्यावर सगळ्यात प्रथम माझं लक्ष त्यांच्या गळ्याकडं गेलं. ओह्, मंगळसूत्र नाही म्हणजे या विधवा असाव्यात. चार-पाच मुलं मुली मला निरखून पाहत होते.( त्यांना सहा मुली आणि दोन मुलगे आहेत, हे ह्यांनी सांगितल्यावर मला आश्चर्यच वाटलं होतं .पण कुटुंबनियोजनाचा दिल्लीत खूप धज्जा उडवला जातो हे मला नंतर कळले. ) त्यांना एवढयांचं पालन-पोषण एकटीनं करणं ही बाब मला खूप अवघड वाटली. पण घरमालकांची ओळख झाल्यावर मला कळलं की विवाहित स्त्रीनं मंगळसूत्र घालायची तिथे पद्धतच नाही.लग्नानंतर पायात जोडवी घालतात .
“बैठो आराम से ” माझ्या हातात पाण्याचा ग्लास देऊन ऑंटीजी म्हणाल्या …नंतर हिंदीतून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आणि जमतील तशी उत्तर मी देऊ लागले.
” तुम्हारा पिहर कहा है?”… हा शब्द कधीच वाचनात आला नव्हता.” पिहर मिन्स ?” मी विचारती झाले .त्या सर्वांना माझ्या एकंदरीत सगळ्या बोलण्याचं हसू येत होतं आणि मी नर्वस होऊ लागले होते. “मतलब मायका…. मम्मी का घर.” मी उत्तर देईपर्यंत पुढचा प्रश्न उपस्थित झाला.
” तुम्हारा दहेज का सामान कहाँ है?”
‘म्हणजे हुंडा’- मी मनात म्हणाले. आणि….हुंडाबंदीसाठी मोठी लेक्चरं झाडणार्या मला, फर्राटेदार हिंदीतून आपलं म्हणणं पटवून देता आलं नसतं, याची जाणीव झाली.. म्हणून मी प्रथम गप्पच राहिले. पण नंतर हसून मी प्रसंग सावरुन घेतला. मी मनसोक्त थापा मारल्या.
अजी वो सोफासेट, फ्रिज, और हेवी सामान नां? वो और बहूत सारा सामान मैं ससुराल छोड आई हूँ. बहुत दूर का मामला हैं ना इसलिये. सिर्फ थोडीसी ज्वेलरी लाई हूँ. चार -चार सेट दिये है मेरे मम्मी- पापाने. उधर अभी टीव्ही पहूँचा नही है, तो उसके पैसे भी दिये है उन्होंने.”– आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.
क्रमशः—-
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈