डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….!) इथून पुढे —- 

पॅरालिसिस होऊन गेल्यानंतर त्या रुग्णांमध्ये काहीही केलं तरी विशेष सुधारणा होत नसते, तरीही माझ्या या आजोबांना हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं.

हेतू पुन्हा तोच…. किमान काही दिवस हॉस्पिटलमध्ये का होईना, पण  चांगल्या ठिकाणी  तरी राहतील आणि दोन वेळच्या जेवणाची तरी सोय होईल. 

एके दिवशी या ही हॉस्पिटल मधून सुद्धा फोन आला, तुमच्या पेशंटचं जितकं काही करता येणं शक्य आहे ते आम्ही केलं आहे, पेशंटला डिस्चार्ज देत आहोत, कृपया त्यांना घेऊन जावे. 

आता या आजोबांना कुठे घेऊन जाऊ ?  की सोडू परत बागेबाहेरच्या त्याच फूटपाथवर यांना ? की सांगू त्यांना ?  पडून राहा इथे बागेबाहेर …. मरणाची वाट बघत ! 

प्रसंग तिसरा – पुणे कॉर्पोरेशनकडून शनिवारवाड्याकडे जात असताना,  तिथल्या पुलावर अचानक एक फोन आला, मी गाडी थांबवून तो फोन घेतला.

माझं सहज लक्ष गेलं, पुलाच्या कठड्यावर एक मध्यम वयाची व्यक्ती बसली होती. त्याला दिसत नव्हतं, हे त्याच्या हालचालींवरुन मला समजलं, जागेवरच बसून त्याची काहीतरी चुळबूळ चालली होती.

थोडा चुकला, तर पुलाच्या कठड्यावरून सरळ खाली पाण्यात पडेल…. त्याला कुठेतरी सुरक्षित जागेत बसवून द्यावं, असा विचार करून त्याच्या जवळ गेलो, त्याला सुरक्षित जागेत हलवलं आणि सहज विचारपूस केली… 

याचं सध्याचं वय साधारण 42

सर्वसामान्य लोकांप्रमाणेच याला दिसत होतं, पण घरच्या कटकटीमुळे वैतागून पुण्यात आला, एका हॉटेलमध्ये नोकरी करून स्वतःपुरता व्यवस्थित जगत होता.

एके दिवशी, म्हणजे त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका अपघातात डोक्याला मार लागला आणि यात त्याची दृष्टी गेली. 

दृष्टी गेली, तशी नोकरी गेली….  घर आधीच सुटलं होतं…. आता तो भिक्षेकरी म्हणूनच जगायला लागला. फूटपाथ वर राहायला लागला 

जन्मतः ज्यांना दृष्टी नसते ते लहानपणापासून परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात….

पण वयाच्या चाळीसाव्या वर्षी, दृष्टी जाणे हा धक्का अतीभयानक असतो. ते परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत….! 

अचानक पणे बसलेल्या अशा धक्क्यातून कुणीच लवकर सावरू शकत नाहीत. अशात घरच्यांचा आधार असेल तर ठिक , पण ज्याला कोणाचाच आधार नाही, अशा दृष्टी गेलेल्या व्यक्तीने जगायचं कसं ?

याची कहाणी ऐकून, मी याच्या जवळ ओढला गेलो…. 

यानंतर आधुनिक वैद्यक शास्त्रात डोळ्यांच्या संदर्भात ज्या काही ट्रीटमेंट असतील त्या सर्व ट्रीटमेंट त्याला पुण्यातल्या नामांकित Opthalmologist कडून दिल्या. पण कसलाही फरक पडला नाही….

शेवटी माझा मित्र डॉ. समीर रासकर याने सांगितलं, निसर्गापुढे आपण हरलो आहोत, याला आयुष्यात कधीही दिसणार नाही. 

याला हे समजल्यानंतर, ज्या पद्धतीने तो कळवळून रडला होता, ते कारुण्य मला इथे शब्दात मांडता येणं शक्य नाही. 

तरीही त्याच्या मनाला उभारी देऊन, त्याला एक व्यवसाय टाकून दिला.

फुटपाथवर बसून तो हा व्यवसाय करायचा. 

रात्री कुठेतरी आडोशाला झोपायचा.  भुरटे चोर येऊन याला त्रास द्यायचे,  झालेली कमाई काढून घेऊन पळून जायचे….  दिसत नसलेला हा….  याने प्रतिकार कसा करावा? 

आता, वैतागून तो आत्महत्येची भाषा करायला लागला. 

कुणाच्यातरी देखरेखीखाली त्याला ठेवावं असं मला वाटू लागलं…. अन्यथा डिप्रेशन मध्ये त्याने स्वतःचा अंत करून घेतला असता…!

नेमकं काय करावं मी ? या एका मागोमाग आलेल्या तीन प्रसंगांनंतर…..? 

पहिल्या बाबांची सोय कुठे करावी….?  या विचारात असताना दुसरे बाबा समोर आले…..आता या दोघांची सोय कुठे करावी ?  या विचारात असताना हा तिसरा अचानकपणे समोर आला…

कुणीतरी परीक्षा घेत होतं माझी….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments