डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(कुणीतरी परीक्षा घेत होतं माझी….! ) इथून पुढे —

तिघांचीही सोय करणं गरजेचं होतं… पण माझ्या स्वतःकडे कोणतीही सोय नाही…. 

तिघांची एकदम, एकाचवेळी, सोय कुठे आणि कशी करणार ? कोण या तिघांना पटकन प्रवेश देऊन कायमची जबाबदारी स्वीकारेल ? 

मी कात्रीत सापडलो होतो, आणि हे तिघेही माझ्याकडे डोळे लावून बसले होते….! 

मागच्या आठवड्यात माया केअर सेंटरचे संचालक डॉ. श्री व सौ भाटेताई यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली होती. 

या दाम्पत्याचं मला कौतुक वाटतं. जिथं प्रत्यक्ष मुलं आपल्या आई बापाला सांभाळत नाहीत, तिथं हे दोघे रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांना आपल्या घरात घेऊन येतात. मुलांनी सोडून दिलेल्या आईबापांना स्वतःचे आई-बाबा म्हणून सांभाळतात. 

एखादी व्यक्ती घरात घेऊन येणं म्हणजे एखादी वस्तू घरात आणण्या इतकं सोपं नसतं. त्या व्यक्तीचं जेवण-खाणं, कपडा लत्ता, दुखणं खुपणं, सर्वच बघावं लागतं …. मरेपर्यंत! 

अशात, यांच्याकडे जागा कमी, काम करायला कामगार मंडळी कुणीही नाहीत, अपुरी साधनसामुग्री, सरकारी कोणतीही मदत नाही.

डॉ सौ भाटेताई, स्वतः आजारी असून सुद्धा, स्वयंपाक बनवण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व कामं करून या आईबाबांची सेवा शुश्रूषा करतात.

अशाही परिस्थितीत, यापूर्वी रस्त्यावर मला सापडलेले चार ते पाच लोक मी यांच्या सेंटरला ठेवले आहेत, डॉ भाटे दांपत्य, माझ्या या लोकांचा सांभाळ करत आहे. 

ऋण कसं फेडावं यांचं ? 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असताना, आपण आणखी तीन लोकांचा भार यांच्यावर टाकावा का ? …. असं म्हणत, निर्लज्जपणे मी पुन्हा डॉ. भाटे सरांनाच फोन लावला. 

भाटे सरांना विषय सांगताच ते चटकन म्हणाले, ‘पाठवून द्या सर माझ्याकडे त्यांना.’

‘पण भाटे सर, अगोदरच तुम्ही इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून वेळ मारून नेत आहात त्यात…’ 

मला पुढे बोलू न देता ते म्हणाले, ‘परिस्थिती आपल्याला अनुकूल अशी कधीच नसते, ती आपल्याला बनवावी लागते सर, आणि आपण परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसलो तर रस्त्यात पडलेले हे लोक आपली वाट न बघता देवाघरी जातील, आपणच मग आपल्याला माफ करू शकणार नाही… पाठवून द्या तुम्ही तिघांनाही…!’ 

काय बोलू मी या माणसापुढे ?

शुक्रवार 17 डिसेंबर 2021,  हा दिवस या तिघांना भाटे यांच्या आश्रमात पाठवण्यासाठी मी निश्चित केला.

त्या अगोदर बाकीची सर्व तयारी म्हणजे पोलिसांना कळवणे, त्यांच्यासाठी लागतील त्या सर्व वस्तू विकत घेणे वगैरे सोपस्कार पार पाडले. 

शुक्रवारच्या सकाळी यांची आंघोळ आणि दाढी कटिंग झाली.

यांना आणलेले नवे कोरे कपडे घातले. तिघांनाही नवीन बॅगा आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू त्या बॅगेत ठेवून दिल्या. 

आंघोळ आणि दाढी-कटिंग नंतर, वर्षानुवर्षे काळवंडून पडलेली पितळी समई, घासावी पुसावी आणि लख्ख व्हावी …. तसे आता हे तीघे दिसत होते… !

पहाटेचा काळोख हळूहळू विरत जावा आणि सूर्याने आपला मुखडा दाखवावा…. आज तसे ते दिसत होते… !!! 

संध्याकाळी घरात पूर्ण अंधार असावा आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली पणती आपण चेतवावी आणि यानंतर तो देव्हारा काळोखात उजळून निघावा, आज तसे भासत होते मला हे तिघेही…. !!! 

माझ्यासाठी हिच पूजा…हाच माझा अभिषेक… ! 

हाच माझा नैवेद्य… हाच मला मिळालेला प्रसाद आणि हिच मी केलेली आरती… !!!

आता दुसरी कुठलीही पूजा मांडण्याचं मला कारण नाही….. माझी पूजा झाली ! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments