सौ कुंदा कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ विदुषी अपाला… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
महर्षी अत्री ऋषी यांना एकच मुलगी होती तिचे नाव अपाला.ती अत्यंत सुंदर, बुद्धिमान व एकपाठी होती. अत्रि ऋषी आपल्या शिष्यांना शिकवत त्यावेळी ती त्यांच्याजवळ बसे व त्यांनी एकदा सांगितलेले ज्ञान लगेच अवगत करत असे. तिला चारही वेद आणि त्यांचे अर्थ मुखोद्गत होते. वेदांतील ऋचांच्या अर्थाविषयी आपल्या पित्याशी संवाद साधत असे. चर्चा करत असे. त्यावेळी तिची असामान्य प्रतिभा पाहून अत्रीऋषी सुद्धा अचंबित होत असत. अर्थातच ती त्यांची अत्यंत लाडकी होती. पण अपालाला त्वचारोग होता. तिच्या अंगावर कोडाचे डाग होते. अत्रीऋषींनी तिच्यावर खूप उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे तिच्या लग्नाची त्यांना सतत चिंता वाटत होती.
एक दिवस त्यांच्या आश्रमात वृत्ताशव(यांना कृष्णस्व किंवा ब्रह्मवेत्ताऋषी असेही म्हणतात)ऋषी आले. अपालाने त्यांची खूप सेवा केली. तिच्या सौंदर्यावर भाळून त्यांनी तिला मागणी घातली. तिच्याशी विवाह करुन ते तिला घेऊन आपल्या आश्रमात गेले.
काही दिवसांनी वृत्ताशव ऋषींना तिच्या कोडाचा संशय आला व त्यांनी तिचा त्याग केला. अपमानित होऊन ती परत आपल्या पित्याकडे आली.
अत्री ऋषीना खूप वाईट वाटले. त्यांनी तिला आधार दिला व पूर्वीप्रमाणे अभ्यास, अध्यापन, योग, उपचार सुरू कर असे सांगितले व इंद्राची पूजा करण्यास
सांगितले. अपाला मनोभावे इंद्राची आराधना करू लागली. इंद्र देव प्रसन्न झाले. त्यांना सोमरस आवडतो म्हणून तिने शेजारचा सोमवेल तोडलापण त्याचा रस काढण्यासाठी तिच्याकडे काहीच साधन नव्हते मग तिने आपल्या दातांनी तो वेल चर्वण केला व एका भांड्यात रस काढून इंद्र देवांना प्यायला दिला. इंद्रदेव संतुष्ट झाले व त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिने आपला रोग बरा व्हावा , सतेज कांती मिळावी व पित्याची आणि पतीची भरपूर सेवा करता यावी असे वरदान मागितले. इंद्र म्हणाले तथास्तु. त्यांनी आपले सर्व ज्ञान पणाला लावले आणि तिची त्वचा तीन वेळा स्वच्छ केली. अपाला पूर्णपणे रोगमुक्त झाली.
इकडे वृत्ताशव ऋषींना पण आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. माफी मागण्यासाठी ते अत्री ऋषींकडे आले.त्यांनी अपाला ची आणि तिच्या वडिलांची मनापासून माफी मागितली व तिला बरोबर येण्यास सांगितले.
अत्रीऋषींना खूप आनंद झाला .खूप भेटवस्तू देऊन त्यांनी आपली मुलगी व जावई यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या घरी परत धाडले. अपाला पतीसह आनंदात राहू लागली.
अशी ही विद्वान, धर्मपरायण व सामर्थ्यशाली अपाला. तिला कोटी कोटी कोटी नमन
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈