डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ मध्यस्थ… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
समिधा माझ्या मुलीची मैत्रीण.
थोडी पुढच्या वर्गात होती समिधा अगदी निम्न मध्यम वर्गातलीच म्हणा ना.
समिधा फार हुशार परिस्थितिची जाणीव असलेली आणि समजूतदार होती.
दिसायला तर ती छान होतीच,पण खूप हुशारही होती समिधा.
समिधाला लहान भाऊही होता, अगदी पाठोपाठचा तोही हुशार होता.
समिधाच्या आईने आम्हाला एकदा हळदीकुंकवाला बोलावले होते.
अगदी साधेसुधे, 3 खोल्यांचे पण नीटनेटके ठेवलेले घर.
त्या स्वत:ही शिकलेल्या होत्या पण घरीच असायच्या.
समिधा बोर्डाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये झळकली. .समिधाला खूप बक्षिसेमिळाली.
तिचे आईवडील पेढे घेऊन आले आमच्या घरी.
समिधा ला इंजिनिअर व्हायचे होते.
बारावीला तिने कसून अभ्यास केला.
तिला सुंदरच मार्क मिळाले आणि तिला चांगल्या कॉलेज मध्ये सहज मिळाली ऍडमिशन.
लागोपाठ ,तिचा भाऊ समीर ही होताच.
तिच्या वडिलांची, ओढाताण होत होती दोन्ही मुलांच्या फी, पुस्तके,क्लास ची फी भरताना. पण मुले हुशार होतीच.
समिधा च्या पाठोपाठ समीरही इंजिनीरिंग ला गेला.
समिधाच्या अंगावर अगदी साधे तेच तेच ड्रेस असत. पण तिने कधीही तक्रार नाही केली. ज्या कॉलेज मध्ये मुली नुसत्या फुलपाखरा सारखे स्वच्छंदी जीवन जगतात, मौजमजा करतात, त्याच ठिकाणी समिधा अतिशय साधी कोणत्याही मोहाला बळी न पडणारी होती.
मला फार कौतुक वाटायचे त्या कुटुंबाचे बघता बघता समिधा इंजिनिअर झाली तिला कॅम्पस interview होऊन लगेचच जॉब ही मिळाला.
किती आनंदात पेढे घेऊन आली समिधा.
त्या कुटुंबाची मी फॅमिली डॉक्टरही होते.
समिधा जॉईन झाली कंपनीत.
खूप चांगले पॅकेज मिळाले तिला.
पण ती होती तशीच साधी राहिली.
पण हळूहळू,तिच्यात चांगला बदल झालेला दिसू लागला.
छान कपडे,थोडा मेकअप तिचे रूप खुलवू लागला.
पूर्वी जरा गंभीरच असलेली समिधा आता हसरी खेळकर दिसू लागली.
मला तिच्या आजीला बरे नव्हते म्हणून घरी visit ला बोलावले होते मी घरात पाउल ठेवले मात्र.
मला घरात लक्षणीय बदल जाणवला घर तेच होते, पण आता उत्तम महाग रंग लावलेला, ज्या घरात फ्रीझही नव्हता तिथे मोठा फ्रीज,भारी सोफासेट.
घर खूप सुंदर आकर्षक दिसत होते.
भारी कपबशीत मला समिधाच्या आईने चहा दिला पूर्वीचा,जाड कपबशीतला, चहा आठवलाच मला.
लक्षात येण्यासारखे घर बदलले होते।छानच वाटले मला.
पण ही किमया घरात येणाऱ्या समिधाच्या पगाराची होती,हे माझ्या चाणाक्ष नजरेला समजलेच.
समिधाच्या आईला मीम्हटले, आता छानसा जावई आणा.
हसत हसत हो म्हणेल हिला कोणीही.
कायग, जमवलं आहेस का कुठे नाही हो काकू. मी सध्या ऑफिस झाले की क्लास लावलाय जावा चा.
बाबा म्हणाले,मग तुला प्रमोशन मिळेल.
मला हे कुठेतरी खटकलेच.
बाबा बेरकी पणे,माझ्याकडे बघत होते.
मी घरी आले पण समिधा चा विचार जाईना मनातून.
तिच्या पेक्षा थोडीच लहान असलेली माझी इंजिनीअर मुलगी, किती मस्त मजेत होती.
तिच्या मित्र मैत्रिणींचा घोळका घरी येतअ सायचा. तिलाही खूप पगार होताच पण आम्ही कधीही तिला विचारले नाही तीच सांगायची,आई,मी अमुकअमुक इन्व्हेस्टमेंट्स केल्यात समिधा मला या ना त्या कारणाने भेटत राहिली.
माझा जनसम्पर्क तर खूपच असतो समिधा आली होती, त्याचदिवशी एक बाई औषधासाठी आल्या होत्या छान आहे हो मुलगी डॉक्टर.
करतेय का लग्न.
माझा भाचा आहे लग्नाचा. बघा, त्यांनी त्या मुलाची माहिती,पत्ता मला दिला.
मी उत्साहाने समिधाच्या आईला ती माहिती दिली.
मग बरेच दिवस काही समजले नाही म्हणून मीच त्या बाईना विचारले त्या म्हणाल्या,अहो,त्या समिधाच्या आईकडून काहीच नाही आले उत्तर मला आश्चर्य वाटले.
नेमक्या समिधाच्या आईच दवाखान्यात त्या दिवशी आल्या मी त्यांना विचारले,तरमाझी नजर चुकवत म्हणाल्या,हं हं,ते होय.
अहो पत्रिका नव्हती जमत, मग नाही गेले बाई मी.
एक दिवस समिधा एका मुलाला घेऊन माझ्या दवाखान्यात आली.
काकू,हा माझा टीम लीडर आहे, संदीप याला तुम्ही मेडिकल certificate द्याल का .
मुलगा छानच होता .मी लगेच त्याला हवे ते certificateदिले दुसऱ्यादिवशी समिधा आली थँक्स हं काकू.
मी म्हटले,ते जाऊं दे ग,
छान आहे की ग मुलगा.
नुसताच मित्र आहे का आणखी काही.
समिधा हसली, म्हणाली काकू कित्ती चांगला मित्र आहे माझा तो.
त्याला कशाला नवऱ्यात बदलायचे.
काल गेला चीन ला, आता 3 महिने नाही येणार मी म्हटले,समिधा, चांगला मित्र, चांगला नवराही होऊ शकतो.बघ.
सगळ्या दृष्टीने मला आवडला हा तुझा मित्र.
असेच दिवस पुढे जात होते अचानक एक दिवस,संदीप दवाखान्यात आला म्हणाला,काकू ,थोडे बोलू का. अरे बोल की म्हणाला,मी चीन ला गेलो,तो पर्यंत मला समिधा बद्दल तसे काहीही वाटत नव्हते पण मला समजले की मी तिला खूपच मिस करतोय काकू,मला लग्न करायचंय तिच्याशी
तुम्ही बोलाल का तिच्याशी
अरे, मी कशाला, तू तिला जा घेऊन तुमच्या ccd मध्ये आणि बिनधास्त विचार
ती नाही म्हणणार नाही बघ
तो म्हणाला, करू असं मी?
अरे करच. ती नक्की हो म्हणेल
दुसऱ्याच दिवशी दोघेही हसत हसत आले दवाखान्यात.
काय रे मुलांनो, काय म्हणता
समिधा लाजली आणि म्हणाली
काकू, तुम्ही कित्ती बरोबर ओळखलंत
मलाही चैन पडेना, हा 3 महिने नव्हता तेव्हा .
आम्ही लग्न करायचे ठरवलेय.
ती म्हणाली, आई बाबांना आवडले नाही
मी परस्पर लग्न ठरवलेले.
म्हणाली इतकी घाई का करतेस
याहूनही चांगला मुलगा मिळेल की तुला
काकू,मी इतकी अडाणी राहिले नाहीये हो
मलाही माहीत आहे, खूप मुले आईने
माझ्या पर्यंत येऊच दिली नाहीत
पण मी तिला दोष नाही देणार
पण मी आता 27 वर्षाची आहे,
यापुढे
कधी मी लग्न करणार .
मला खात्री आहे, आम्ही या लग्नाने सुखी होऊ
समिधाच्या लग्नाला अर्थातच मी हजर होते
संदीप च्या आईने मला सुंदर साडी दिली
म्हणाली, तुमच्या मुळे छान सून मिळाली हो आम्हाला
सगळे सांगितलंय आम्हाला संदीप ने
वधुवेशातली सुंदर समिधा आणि तिला शोभणारा जोडीदार बघून मला अतिशय समाधान वाटले.
©️ डॉ. ज्योती गोडबोले