सुश्री मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ आईपण… डॉ.सोनिया कस्तुरे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☘️ सहजच जगता जगता
आज 25 फेब्रुवारी अनुजाचा वाढदिवस. या दिवशी 2003 साली मी दूसऱ्यांदा आई झाले. पहिल्यांदा 1998 साली डॉ.प्रेरणाचा जन्म झाला तेव्हा. आईपण हे काय रसायन आहे हे मी गेली 25 वर्षे अनुभवती आहे. पण आईपण सुरु झाल्यापासून मी मला शोधण्याचा प्रयत्न करते. मी मला कायम आई म्हणूनच सापडते. मी माला दवाखान्यात काम करताना शोधले. मी मला माझ्या नात्यात शोधले. मी मला घरात, घरा बाहेर शोधले पण मी मला नेहमी आई म्हणूनच सापडले. आईपण खूप पछाडून टाकतं हे मला इतकं माहितच नव्हतं. आणि आज मुली मोठ्या झाल्या तरीही आईपण थोडं सोडवू पाहते पण अजिबात सुटत नाही.
माझ्या जीवनाला कलाटणी म्हणजे आईपण. माझ्या जगण्यातला सर्वोच्च अविष्कार म्हणजे आईपण. माझ्या जीवनाचं अतिम सत्य म्हणजे आईपण. माझ्या माणूसपणातील सर्वात रोमांचकारी, अनाकलनीय, सर्वोत्कृष्ट निर्मितीचा आनंद म्हणजे आईपण. प्रेम, विश्वास, जिव्हाळा, निष्ठा, कर्तव्यतत्परता, जबाबदारी, काळजी, समर्पण म्हणजे आई. आईपणात वेदना आणि दुःख अमाप आहे. आई त्या वेदनांचा, दुःखाचा सोहळा उत्सव करते. ही आईपणाला गवसलेली अनोखी शक्ती आणि युक्ती म्हणायला हरकत नाही.
मी अजूनही स्वतःला शोधत राहते पण आई म्हणूनच सापडते. माझ्या दवाखान्यात, माझ्या कवितेच्या ओळीतही मी आई म्हणूनच सापडते…!
नाही उमगत मी मला अजूनही…!
मला आईपण बहाल केल्याबद्दल मी माझ्या दोन्ही मुलींची ऋणी आहे. माझा जोडीदार या दोघींच्या बाबांचे नामदेवचे धन्यवाद मानालाच हवेत !
सर्व आईंना मनापासून सलाम ! 🙏🏻
– डॉ.सोनिया कस्तुरे
9326818354
25/02/2022
संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२