सौ कुंदा कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ सत्यवती ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : सत्यवती
सत्यवती ही महाभारताची मूळ स्त्री. ती राजा शंतनूची पत्नी, धृतराष्ट्र, पांडू विदुर आणि शुकदेव यांची आजी व कौरव-पांडवांची पणजी होती. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती भगवान वेदव्यास यांची आई होती. तिची जन्मकथा सुद्धा विलक्षण आहे.
पूर्वी सुधन्वा नावाचा एक राजा होता. तो शिकारीसाठी वनात गेला. इकडे त्याची पत्नी रजस्वला झाली. तिने गरुडा कडून ही वार्ता पतीला कळवली. त्याने आपले वीर्य एका द्रोणात भरून तिच्या साठी त्या पक्षाकडून पाठवले. वाटेत एका पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. द्रोणा तले वीर्य यमुनेत पडले. तिथे ब्रम्हा च्या शापामुळे मछली च्या रूपाने अद्रिका नावाची एक मछली होती. पाण्याबरोबर तिने ते वीर्य गिळले. ती गर्भवती झाली. दाशराज नावाच्या निषादाने तिला पकडले व तिचे पोट चिरले. त्यातून एक कन्या बाहेर आली. दाशराजाने ती सुधन्वा कडे नेली. पण तिच्या अंगाला फार घाण वास येत होता म्हणून राजाने स्वीकार केला नाही. दाशराजानेच तिचा सांभाळ केला. त्याने नाव ठेवले सत्यवती. तिच्या अंगाला माशांचा वास येत असल्यामुळे तिला मत्स्यगंधा हे नाव पडले. ती मोठी झाल्यावर होडी चालवण्यास शिकली.
एकदा परशुरामपुत्र पराशर ऋषी यमुनेकाठी आले. मत्स्यगंधाला पाहून ते तिच्या प्रेमात पडले. पण हुशार सत्यवती ने त्यांना नकार दिला. ती म्हणाली तुम्ही ब्रह्मज्ञानी आणि मी निषाद कन्या आपले कसे जमणार? पण पराशर ऋषी ऐकेनात तेव्हा तिने त्यांना तीन अडचणी सांगितल्या.
1) माझ्या अंगाला घाण वास येतो. पराशर ऋषीनी तो नाहीसा करून तिथे सुगंध निर्माण केला. आणि ती योजन गंधा म्हणून प्रसिद्ध पावली.
2) माझा कौमार्यभंग झाल्यावर माझे लग्न कसे होणार?
ऋषीनी तिला वर दिला मुलाच्या जन्मानंतर तू अक्षत योनी होशील. कुमारिका होऊन तुझे दुसरे लग्न होईल.
3) आपले मीलन दोन्ही किनाऱ्यावरचे लोक बघतील.
ऋषीने दोघाभोवती संपूर्ण होडीवर दाट धुके निर्माण केले.
ते दोघे एका द्वीपा वर गेले. तिथे त्यांचा पुत्र व्यास जन्माला आला.
तो जन्मताच उभा राहिला व बोलू लागला “माते मी तपश्चर्या करण्यासाठी दूर निघून जाणार आहे पण तुला वचन देतो की तू जेव्हा संकटात सापडशील तेव्हा माझे स्मरण कर मी तुझ्यासाठी धावत येईन.”
पराशर ऋषींच्या वरदानामुळे सत्यवती हे सारे विसरून गेली व कुमारिका म्हणून जगू लागली.
एकदा शंतनू राजा तिथे आला. त्याला ती आवडली व त्याने दाश राज कडे लग्नासाठी मागणी घातली. तो म्हणाला तिचीच मुले राज्यावर बसतील व ती राजमाता होईल असे वचन द्या. शंतनू ला देवव्रत नावाचा मुलगा होता. त्यालाच तो राज्यावर बसवणार होता. पण सत्यवतीच्या प्रेमामुळे तो खंगायला लागला. देवव्रताने दाश राजाच्या अटी मान्य करून ब्रह्मचर्य पा पाळण्याचा निर्णय घेतला.
सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोन मुलगे झाले. शंतनु च्या मृत्यूनंतर चित्रांगद गादीवर बसला पण एकदा गंधर्वाबरोबर युद्ध सुरू असताना तो मरण पावला. विचित्रवीर्य गादीवर बसला. सत्य वतीने त्याचे लग्न काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी लावून दिले. पण त्याला क्षयरोग झाला आणि त्याचाही मृत्यू झाला. सत्यवती ला खूप दुःख झाले पण वंश पुढे चालू ठेवण्यासाठी तिने देव व्रताला लग्न कर असे म्हटले. पण तो म्हणाला माते तुझाच मुलगा राज्यावर बसेल असे मी कबूल केले आहे. तू तुझ्या मुलाला हाक मार. आणि एकाएकी सत्यवतीला पूर्वायुष्य आठवले. तिने व्याकुळ होऊन साद घातली आणि व्यासमुनी धावत आले. वंशवृद्धी साठी व आईची आज्ञा म्हणून त्यांनी नियोग पद्धतीने अंबिके शी संग केला. पण त्यांच्या तेजाने अंबिका खूप घाबरली व तिने डोळे मिटून घेतले. त्यामुळे तिला अंध पुत्र मिळाला. त्याचे नाव धृतराष्ट्र. अंध मुलाला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही असे सांगून सत्य वतीने अंबालिकाशी संग करण्यास सांगितला. पण व्यासांना पाहताच ती पांढरीफटक पडली. अशक्त पांडू जन्माला आला. सत्यवतीने पुन्हा अंबालिका ला गळ घातली. पण तिने आपल्या ऐवजी आपल्या दासीला पाठवले. विदुर जन्माला आला.
सत्यवती हताश झाली. तिने धृतराष्ट्राचे लग्न गांधारी शी लावून दिले. पांडू चे लग्न कुंती आणि माद्री यांच्याशी लावून दिले. शंभर कौरव आणि पाच पांडव यांची ती आजी झाली.
पांडूच्या मृत्यू नंतर ही फारच निराश झाली. व्यास त्रिकालज्ञानी होते. त्यांनी तिला वानप्रस्थाश्रम स्वीकारून अरण्यात जाण्यास सांगितले. ती अरण्यात गेली. तिने अन्नत्याग केला. त्यातच तिचा मृत्यू झाला. असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व सत्यवती उर्फ योजनगंधा.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈