डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ पारावरचा चहा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
त्या सगळ्या मैत्रिणी आता निवृत्त झालेल्या। सगळ्या जबाबदार्यातून म्हटले,तर मुक्त झालेल्या। अशीच, ग्रुप मधील उत्साही मनू एकदा म्हणाली, “अग ऐकाना। मला एक मस्त आयडिया सुचलीय। आपण एरवी भेटतो तेव्हा घाईघाई ने भेटतो, निवांत गप्पा होतच नाहीत मी परवा माझ्या नवऱ्या बरोबर अशीच गेले होते तेव्हा एका ठिकाणी मस्त चहा प्यायला. गम्मत म्हणजे, त्या चहा वाल्याने समोर असलेल्या, मोठ्या झाडालाच पार बांधलाय. गुळगुळीत. आणि त्यावर बसवून तो चहा देतो. इतकी मजा वाटली ग. तर आपण निदान महिन्याने तरी जमूया का.” सीमा म्हणाली “हो, मला चालेल.”
सगळ्या तयार झाल्या. मनु अगदी आनंदून गेली नवरा म्हणाला, “मनु, आपण जातो ते ठीक, तुझ्या म्हाताऱ्या कसल्या यायला.”
मनु खट्टू झाली. “बघूया आता, ठरवले तर आहे.”
ठरवलेल्या तारखेला, 10 च्या दहा सख्या हजर होत्या. त्यांना त्या पाराची खूप गम्मत वाटली. हॉटेल सारखे बंधन नव्हते तिथे की मागे माणसे खोळंबून उभी आहेत. खूप गप्पा मारल्या आणि निवांत घरी गेल्या. मनु म्हणाली, “बघ बघ प्राची, चेष्टा केलीस ना, पण बघ. सगळ्या ग माझ्या सख्या आल्या न चुकता.” पुस्तकातले डोके वरही न काढता प्राची म्हणाली, “मासाहेबा, जरा रुको तो. आगे आगे देखो, होता है क्या.”
मनूने तिच्या पाठीत धपका घातला म्हणाली, “बाई, नको ग बोलू असे.जमलोय तर जमू दे की.”
प्राची,म्हणाली, “उगीच चिडू नको ग. मागच्या अनुभवावरून म्हणतेय मी.”
नवरा म्हणाला “प्राची आपल्या आई इतका उत्साह नसतो कोणाला. ही जाते जीवाची धडपड करत आणि त्या म्हाताऱ्या सतरा कारणे सांगतील बघ. गप बसा तुम्ही बाप लेक. काही सांगितले, की केलीच चेष्टा. मी सांगायलाच नको होते.”
मनु आत निघून गेली. पुढच्या वेळीही पारावर दहाचा आकडा जमला. मनूला धन्य धन्य झाले. गप्पा झाल्या आणि निघताना,मनीषा म्हणाली, “ए, सॉरी ग.मला पुढच्या वेळी जमणार नाही यायला का ग मनीषा? आता काय झाले.”
“अग काय होणार। सूनबाई ची deadline आहे बाई.”
मला म्हणाल्या, “बंटी कडे बघाल ना जरा? कसली येणार मी आता मग.”
“काय आई साहेब. गप्पशा. आज कोरम फुल नव्हता वाटते.” प्राचीने विचारलेच.
मनू चिडचिड करत म्हणाली, “ होता,, होता ग बाई. पण पुढच्या वेळी,मनीषा मावशीला जमणार नाही म्हणे.
“अग, देवयानी म्हणाली, सुद्धा. फारच करते हो, ही मनीषा. काय मेलं महिन्यातून एकदा भेटतो, तेही जमू नये का. असो. चला, मी आज भेळ देते सगळ्यांना.”
“किस खुशीमे ग देवी?”
“काही नाही ग. आता जून आलाच. अमेरिकेची हाक आली लेकीची नोकरी, आणि तिच्या पोरांना समर हॉलिडेज. मग काय. आहोतच की आम्ही. विहिणबाईंची आईआजारी आहे मग त्यांना जमत नाहीये. आमचे हे. लगेच उडी मारून तयार.”
“जाऊ ग देवी आपण. तुला का नको असते ग यायला?”
देवी म्हणाली “याना काय होतंय बोलायला। तिकडे गेलो की, नुसते सोफ्यावरबसायचे 24 तास तो, tv आणि मला हुकूम. कामाने कम्बरडे मोडून ग जाते माझे एवंच काय तर, मीही जून पासून रजा बर.”
मनू गप्पच बसली. प्राची आणि नवरा घरीच होते. प्राची म्हणाली, “आज ही मेंबर गळाला वाटते.” आई जवळ येऊन बसली, आणि म्हणाली आई, “कम ऑन. चीअर अप.”
“असे होणारच मॉम. तू का चेहरा पाडून बसतेस. तुझ्या परीने तू खूप केलेस ना ग प्रयत्न सगळ्या जुन्या मैत्रिणी एकत्र याव्या, सुखदुःखाच्या गोष्टी share कराव्या. पण मॉम, लोकांच्या priorities वेगळ्या असतात तुझ्या इतके sincere आणि हृदय गुंतवणारे लोक फार कमी असतात मॉम. म्हणून तुला त्याचा त्रास होतो ग. दे सोडून. इतके दिवस भेटलात, हसलात, मजा केलीत, हेच बोनस म्हण .”
“हे बोलतेय ती प्राचीच का?” मनूने डोळे उघडून नीट बघितले। इतकी कधी समजूतदार आणि mature झाली आपली मुलगी? बॉयकट उडवत,विटक्या जीन्स घालणारी, भन्नाट कार चालवणारी, पण लग्नाचे नाव काढले तर खवळून उठणारी, मोठ्या पगाराची नोकरी करणारी आपली मुलगी, इतकी प्रगल्भ आहे? मनूच्या डोळ्यातच पाणी आलं. प्राची म्हणाली, “आई,चल मस्त मूड मध्ये ये तुला एक surprise आहे .छान साडी नेसून तयार हो ग.”
“आणखी काय धक्के देतेय प्राची”, म्हणतमनु साडी नेसून तयार झाली. बेल वाजल्यावर प्राचीने दार उघडले. एक स्मार्ट रुबाबदार तरुण उभा होता.
“आई बाबा, हा निनाद ग माझ्या ऑफिस मध्ये बॉस आहे माझा. तुला आठवतं का ग. मागे म्हणाली होतीस, की आज चहा च्या पारावर एक बाई माझी चौकशी करत होत्या?त्या याचीच आई बर का. मी तुला सोडायला नव्हते का आले, कार ने तेव्हा त्यांनी मला बघितले. या खुळ्या ला तोपर्यंत मला विचारावेसे वाटले नाही. पण याच्या आईनेच माझी माहिती तुझ्या कडून काढली। आधी नुसताच बॉस होता. मागे निनाद च्या आई उभ्या होत्या. मनु ला अगदी गोंधळल्या सारखे झाले.
“अहो, आत याना. प्राचीच्या आई, प्राचीने आम्हाला तुमच्या चहाच्या पारा बद्दलसगळे सांगितले आहे बर का. कट्ट्या वरचे तुमचे सभासद कमी होईनात का पण पारावरच्या चहाने तुम्हाला जावई तर झकास मिळवून दिला की नाही।“
मनू ला या सगळ्या योगाचे अतिशय आश्चर्य वाटले। निनाद च्या आई म्हणाल्या “अहो त्या दिवशी मी आणि हे असेच त्या पारावर चहा प्यायला आलो होतो. तर ही मुलगी तुम्हाला सोडताना दिसली म्हणून पुढच्या वेळी मी मुद्दाम तुमच्या कडून माहिती काढली. आणि केवळ योगायोगानेच निनादच्याच ऑफिस मध्ये ही काम करते, हे समजले. मग काय, निनाद ला विचारले. आणि तो हसत हिला विचारायला तयार झाला. घाबरत होता कसे विचारायचे. ही बिनधास्त आहे फार म्हणून. तर, असा तुमचा चहाचा पार, आपल्या दोघांना पावला म्हणायचा. निनाद प्राची, या रविवारी, आपण सगळ्यांनीच जायचे हं पारावर।” सगळ्यांच्या हसण्याने घर नुसते दणाणून गेले मनूचे।
©️ डॉ. ज्योती गोडबोले