सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
मनमंजुषेतून
☆ नजमा – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
सकाळी कामाला आली की आदल्या दिवशी शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पाढा माझ्यासमोर वाचला जायचा.
नजमाच्या वडिलांनी, दोन मुलं लहान असताना, बायको वारली म्हणून रुकसानाशी दुसर लग्न केलं. तिलाही दोन मुले झाली. त्यापैकी नजमा ही एक. रुकसाना स्वतःच्या कमाईवर आणि नातेवाइकांच्या मदतीवर संसाराचा गाडा ओढत होती. नजमाचे आंब्बा अध्यात्माच्या मार्गाला लागले होते .दर्ग्यामध्ये सेवेसाठी तिथेच मुक्काम करायचे. तेथे पोटापाण्याचा प्रश्न नव्हता .नजमाची शाळा दर्ग्यापासून जवळच होती. शाळेत गेली की ,तिला आपल्या आब्बांची आठवण यायची. फार फार लाडकी होती ती आब्बांची! कधीतरी तिला अब्बाला भेटायची तीव्र इच्छा व्हायची .पण आईला कळलं तर, काय काय शिक्षा मिळतील या विचाराने ती भेटीचा विचार सोडून द्यायची .तिला आपले अब्बा घरी यावेत, असं प्रकर्षानं वाटायचं. पण नाईलाज व्हायचा.
एके दिवशी तिन विचार केला, माझ्याच अब्बाना मी भेटले तर, तो काही अपराध आहे का? का नाही भेटू शकत मी माझ्या अब्बांना?आब्बांच्या आठवणींनी एके दिवशी ती बेचैन झाली. शाळेच्या मधल्या सुट्टीत एकटीच गेली आब्बांना भेटायला. दोघांनाही भरभरून आनंद झाला. दुसरे दिवशी सकाळी ही बातमी माझ्यासमोर खुल्लमखुल्ला झाली. मला पुन्हां पुन्हा म्हणाली, “भाभी, मेरी आम्मीको बताउ नको हं।”एका लहान मुलीला तिच्या लाडक्या वडिलांना भेटायला सुद्धा गुपचूप जाव लागत,हे पाहून मलाच कसतरी झाल.माझ्या डोळ्यात पाणी आल.हळूहळू दर चार पाच दिवसांनी तिच आब्बांना भेटण सुरु झाल.सकाळी आली की खूष असायची.आणि मग तिचा पाढा सुरू व्हायचा.” भाभी कल ना मै आब्बाको मिलके आई।आब्बाने मुझे एक रुपया दिया। “कधी आब्बा तिच्या आवडीचा पेढा द्यायचे.कधी गुलाबजाम, कधी बर्फी कधी रुपया दोन रुपये हातावर ठेवायचे. दुसरे दिवशी आली की पैसे जमवायला माझ्याकडे द्यायची. कधीमधी मी त्यात भर घालायची .तिच्या आईला पटवून, तिच्या (नजमाच्या ) नावाने पोस्टात रिकरिंग सुरू केले .त्याचं कार्डही माझ्याकडेच. इतका आई मुलगी दोघींचाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता.
कधी घरात आब्बांच नाव काढलेलं आईला आवडायचं नाही. ती आईशी वादावादी करायची. कधी मारही खायची. पण गप्प बसायची नाही. बंडखोर आणि तडफदार होती ती! सकाळी आली की, पाढा सुरु व्हायचा. “आज मै आम्मीके साथ झगडा करके आयी। मी—क्यूं? “हां फिर सलीम (धाकटा भाऊ) काम तो नही, पढाईभी नही, सिर्फ दोस्त मिलाके गुल्लीडंडा खेलता रहता है। मै तो काम करती हूँ। आम्मीको मदद करती हूँ। फिरभी मेरे बारेमे ऐसा बर्ताव क्यूं।उसके लाड प्यार जादा क्यूं? मुझे गुस्सा आता है।” मी दिला समजवायची ” नजमा, अगं आईला उलट बोलू नये . मोठी झाल्यानंतर सासरी अशी बोललीस ,तर आईचा उद्धार होईल.” ती मलाच उलट म्हणायची,” भाभी, चूप बैठने का नही । उनको भी समझना चाहिये।” ती बरोबर होती. अन्यायाविरोधात उभ राहणं हे तिचं तत्त्व होतं. कष्टाळूपणा आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही गुण त्यात पुरेपूर भरले होते.
ती आता आमच्या घरी छान रुळली होती. सण वार सगळं तिला माहीत झालं होतं. कधी सणावारी आमचा स्वयंपाक उशिरा व्हायचा. मग काम करून जाताना ,ती मला हक्कानं सांगून जायची .”आज बनाया हुआ श्रीखंड, एक वाटी मेरे लिये फ्रिज मे रखो हाँ भाभी” दुसरे दिवशी तिला ते खाताना बघून मला समाधान वाटायचं. कधी तिला एखादं पक्वान्नं आवडायचं. आणि मग पुरणपोळी, गव्हाची खीर, बासुंदी, खूप दिवसात केली नसल्याचीही मला आठवण करून द्यायची. तिला आता सगळे सणवारही माहीत झाले होते. तिच्या आई पेक्षा माझ्याशी बोलण्यात तिला मोकळेपणा वाटायचा. मला सारखं वाटायचं, तिचे आणि माझे कुठलेतरी ऋणानुबंध असतील नक्की.
राखी पौर्णिमेचा दिवस आला. तिने सकाळी येताना गुपचुप दोन राख्या आणल्यान. मला हळूच दाखवल्यान. मला म्हणाली,” राजू भैया और विजय भैया ,(आपके दोनो बेटे) को मै बांधने वाली हूँ। मै उनको भय्या पुकारती हूँ ना। मुझे आरती लगाके देते है क्या? क्या क्या करना मुझे सिखाओ। माझ्या मुलांना बहीण नव्हती. त्या दिवशी नजमाने दोघांना तिलक लावून ओवाळले .ओवाळून राख्या बांधल्यान. मुलं ओवाळणी द्यायला लागली तर, घ्यायला तयार नाही. आणि म्हणते कशी, “ओवाळणीके लिये मैने राखी नही बांधी ।हमारे मे ऐसा कुछ रहता नही ना।
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈