डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆साहसे श्री ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

लग्न होऊन, नीरा कोकणात गेली,तेव्हा तिला परके किंवा वेगळे काहीच वाटले नाही. कोकणातल्याच खेडची मुलगी आता गुहागरला गेली, हाच काय तो बदल.

तेच आयुष्य,तेच कुळागर,तेच माड आणि तेच आंबे.

खरं तर नीराला मनापासून शहरी नवरा हवा होता. तिच्या मावश्या,आत्या राहायच्या ना पुण्यामुंबईकडे.

पण तिकडची मुले कुठली कोकणातल्या मुलींना हो म्हणायला.

नीरा आपली पायरी ओळखून होती. वडिलांची बेताची परिस्थिती, आणखी दोघी बहिणी लग्नाच्या.

कोणीतरी हे स्थळ सुचवले,आणि योग जुळून आले म्हणायचे— साधेसुधे घर ,बेताचीच परिस्थिती,

अशी नीरा गुहागरला सासरी गेली.

 तिच्या सासूबाई अतिशय कष्टाळू होत्या. निरनिराळे छोटे मोठे उद्योग करून चार पैसे गाठीला लावायच्या.

नीराचा चुणचुणीतपणा केव्हाच हेरला त्यांनी.

नव्या नवलाईचे दिवस सरले, आणि हळूहळू नीराच्या लक्षात काहीकाही गोष्टी येऊ लागल्या. सासूबाई कर्तृत्वाच्या,तर सासरे एकदम विरुद्ध. काय जे आंबे फणस,शेतातले धान्य विकले जाईल, त्यावरच गुजारा.

नीराने नवऱ्याचेही गुण बघितले. व्यसन बिसन नव्हते,पण आळशीच एकूण. नोकरी करता का असे तिने सुचवून बघितलेही. पण याला कोण देणार नोकरी आणि कसली. नुसते बसण्याची सवय,आणि आयुष्यात ध्येय लागते,हेच ठाऊक नाही.

नीरा हळूहळू रुळायला लागली. मुलगा झाल्यावर,  त्याला वाढवण्यात काही दिवस गेले.

पण तिला असेच निष्क्रिय आयुष्य नव्हते काढायचे. सुदैवाने त्यांची जागा मोक्याच्या जागी आणि मोठीही होती.

नीराने सासूबाईंना विश्वासात घेतले. म्हणाली,” सासूबाई,मागे एवढी मोठी जागा रिकामी आहे, आपण सध्या 3 खोल्या  बांधूया का? थोडा खर्च होईल, पण आपल्याला उत्पन्न सुरू होईल. आपण जरा शहरी लोकांना लागतात,तशा सोईच्या खोल्या  बांधूया. तुम्ही बाबांची परवानगी घ्याल का ?” 

सासूबाई भीतभीत म्हणाल्या,” हो, पण बांधकामाला पैसे? “

नीरा म्हणाली,” आपण बँकेचे कर्ज काढूया.”

सासूबाई सासरे तयार झाले. नीराने नवऱ्याला स्पष्ट सांगितले,“ हे बघा,हे जे आम्ही करतोय, त्यात तुम्हीही

सहभागी व्हा. नुसती बघ्याची भूमिका घेऊ नका. मी सांगेन ,ते  तुम्हाला करावे लागेल.” 

कुरकुर करत का होईना,तयार झाला तो.

 समुद्रकिनारीच त्यांचे घर होते, तिथे टुमदार 3 खोल्या तयार झाल्या, अगदी शहरी सोयी सुविधा सकट.

नीरा एकदा पुण्याला मावशीकडे जाऊन आली. तिला आपले हे नवीन फार्महाऊस दाखवायला घेऊन आली.

मावशीला ते अतिशय आवडले. तिने आणखीही काही छान सूचना केल्या.  त्या फार्म हाऊससमोर झोपाळे बसले.

रंगीत खुर्च्या आल्या.

“ मावशी,होईल ना ग हे नीट.कर्ज फेडू शकू ना आम्ही?” 

“ नीरे,वेडे,बघ तू. जागा पुरायची नाही बघ तुम्हाला. कष्ट करणाऱ्याला लक्ष्मी प्रसन्न का होणार नाही ग?

मला आता ती कार्ड्स दे. मीही देते ओळखी पाळखीत.” 

 पहिला ग्रुप,मावशीच्या ओळखीतूनच आला.नीराने त्यांची अतिशय सुंदर सरबराई केली—खास कोकणी  नाश्ता, मोदक, सोलकढी– पाहुणे खुश होऊनच गेले. ही पहिली कमाई बघून सासूबाईंना गहिवरून आले.

नीराने आता हाताखाली दोन बायका ठेवल्या.सासू सुनांना आता दिवसाचे चोवीस तास पुरेनात. नीराचा माधव आळस झटकून कामाला भिडला. बाहेरची खरेदी,नोकरवर्गावर  लक्ष ठेवणे, आलेल्या पाहुण्यांची नीट व्यवस्था बघणे

त्याने अंगावर घेतले. नीराच्या घरगुती फार्म हाऊसची आपोआपच प्रसिद्धी होऊ लागली. नीराने बँकेचे कर्ज लवकरच फेडले. मॅनेजर म्हणाले,” नीराताई, आणखी कर्ज घ्या आणि खोल्या वाढवा. आणखी करा तुमचे farmhouse मोठे सुसज्ज. बँक देईल की कर्ज. आम्हाला असे चोख गिऱ्हाईक हवेच असते. “

नीराने सासू सासऱ्यांना विचारून आणखी खोल्या वाढवल्या, पण त्याला शहरी रूप नाही येऊ दिले.

 नीराने आपल्या मुलाला मुंबईला, हॉटेल management साठी पाठवले. लवकरच, तो ते शिक्षण पूर्ण करून

आपल्या आईवडील आजीच्या मदतीसाठी येईल–आणखी नवनवीन कल्पना घेऊन.

मागच्याच महिन्यात नीराच्या फार्महाउसला भेट दिली आम्ही.

अतिशय सुंदर केलेय तिने सगळे. तिच्या सासूबाईची माझी  थोडी ओळख होती. माझ्याजवळ येऊन बसल्या आणि 

कौतुकाने म्हणाल्या,” काय हो कर्तृत्वाची सून माझी!! हे आम्हाला नव्हते सुचले, आणि सुचले असते, तरी धैर्य नसते  झाले हो. बघा कसे नंदनवन फुलवलेय आमच्या सुनेने. अहोरात्र कष्टत असते हो पोर. आणि ,आमच्या मुलालाही बघा कसा छान कामाला लावलाय. तेही गोड बोलून. मला धन्य वाटते हो, आमच्या नुसत्या पडीक जमिनीचा असा सोन्याचा घास आम्हाला मिळाला. सगळे श्रेय नीराला जाते. कधी अंगाला सोने नव्हते लागले, पण बघा, नीराने दिवाळीत मला कशा पाटल्या बांगड्या केल्यात.” 

थोडी सवड मिळताच, नीरा आम्हाला तिच्या बागेत घेऊन गेली. म्हणाली, “ माझा मुलगा हॉटेल management करून येईल 2 वर्षात. मग आमचा कॅनिंग फॅक्टरी सुरू करायचा विचार आहे. शिवाय इथे मासळी भरपूर मिळते.

कोल्ड storage करायचाही विचार करतोय तो. म्हणजे एक्स्पोर्ट बिझिनेस सुरू करता येईल.”—-

या  साध्या सरळ, खेड्याबाहेरचे जग न बघितलेल्या मुलीची ही गरुड झेप बघून थक्क झालो आम्ही. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप तर दिलीच, पण सासूबाईंचेही कौतुक केल्याशिवाय राहवेना आम्हाला. सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

एक साधीसुधी मुलगी,आपल्या जिद्दीने, श्रमांनी, हे वैभव उभे करू शकली, याचे आम्हा सर्वांना अतिशय कौतुक वाटले.

“ साहसे श्री प्रतिवसति ।। “ ही उक्ती नीराने आपल्या जिद्दीने खरी करून दाखवली होती . 

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments