☆ अस्थायी सूर… सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
कोणालाही हेवा वाटेल अशी चाळीस वर्षांची आमची घट्ट मैत्री .जीवश्च कंठश्च अशा आम्ही दहा मैत्रिणी महिन्यातून एकदा अख्खा दिवस एकत्र घालवतो. गप्पांना उधाण येतं. हास्याचे फवारे उडत असतात .सुखदुःखाची देवाणघेवाण होते .. डाएट,डायबेटीस रक्तदाब सगळं त्या दिवसा पुरतं थोडं शिथिल करीत जेवणावर ताव मारला जातो ..पुन्हा भेटण्याची तारीख ठरवून ताज्यातवान्या होऊन घरी परततो .
गप्पांचा फड जमवताना आम्हाला एकही विषय वर्ज्य नसतो .सासू ,नवरा ,मुलं,घरातले वाद,असे टिपिकल बायकी विषय ..तोंडी लावण्यापुरतेच ..
गाॅसिपिंगला तर थाराच नाही .
पण प्रवासातले अनुभव ,पाहिलेलं नाटक किंवा सिनेमा ,वाचलेलं काहीही ..खवय्या असल्यामुळे रेसिपीज् ..भटकंती …कश्शा कश्शावरही बोलायला वेळ पुरत नाही आम्हाला.
गेल्या दोन तीन भेटीत एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आमचा एक सूर अस्थायी लागतोय का ..?
हसत हसत ,सहजपणे आमच्या तोंडून यायला लागलय ..”ए ..आपल्याला आता पाच सहा वर्षच बास आहेत हं ..” सत्तर परफेक्ट आहे बाय बाय करायला ..”
खरं तर आर्थिकद्रृष्ट्या सुस्थितीत ,खूप काही गंभीर आजार नाहीत ,मुलं सेटल्ड ..जबाबदाऱ्या संपलेल्या ….
असं असताना आम्ही हा सूर का आळवतो ..
शिक्षक असलेले माझे वडील नव्वदाव्या वर्षी निवर्तले . गरीबी ..वारावर जेवण .शिक्षणासाठी अपार कष्ट …अंगावर बऱ्याच जबाबदाऱ्या..अशात मध्यम वय संपलं, तरी एकही दिवस मी त्यांच्या तोंडून नव्वदाव्या वर्षी सुद्धा “बास झालं आता जगणं “असं ऐकलं नाही ..
मग आम्ही का अशा कंटाळलो ?
अडीअडचणी ,संकटं ,चढउतार, काळज्या ,तणाव हे सर्व जरी प्रत्येकीच्या आयुष्यात असलं, तरी संघर्षमय जीवन नव्हतं ..मग तरी सुद्धा ..?
काय असेल कारण ?
ऐंशीच्या घरातली जवळची माणसं विकलांग होताना पहावी लागली म्हणून ?
की तसं धावपळीचं दगदगीचं जीवन जगावं लागलं ..लागतय म्हणून??
स्त्रीने घर सांभाळायचं आणि पुरूषांनी कमाई आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या उचलायच्या , अशी कामाची विभागणी वडिलांच्या पिढीत होती .म्हणून दोघंही थकले नाहीत का ?
आम्ही हिरीरीने ,मनापासून घरची – दारची जबाबदारी उचलून थकलो ?
की त्यांच्या ठायी असलेलं समाधान,.संतुष्टता आमच्यात नाही .?
की त्यांची मुलंबाळं त्यांच्याजवळ असल्यामुळे उत्साहाचा झरा अखंड वाहता होता .रोज काहीतरी उद्देश असायचाच तो दिवस पार पडायला ?.
या विचाराशी येऊन मात्र मी थोडीशी चमकले .
दहाजणींपैकी आम्हा आठ जणींची मुलं नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात किंवा परदेशी आहेत .हे तर कारण नसेल ..?
दोघं दोघं रहातो म्हणून कंटाळतो?
…कारण मुलांबरोबरअसतो तेव्हा “सत्तरी बास “काय ..दुखणं खुपणं ही आठवत नाही …
थोडी सटपटले …असला रडा सूर लावणं म्हणजे जरा self pity त जाणं वाटलं मला.
माझाच मला राग आला ..हे कसलं भरल्या ताटावरचं रडणं ..
इतकं मजेत आयुष्य जगण्याचं भाग्य लाभलय .आणि कसले हे “सत्तरी बास चे डोहाळे “
पुढच्या वेळेला भेटू तेव्हा एकीलाही असा “अस्थायी “सूर लावू द्यायचा नाही ..बजावूनच टाकलं मी स्वतःला ..
लेखिका : नीलिमा जोशी
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈