डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अगरबत्ती …!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
ती…!
मला भेटली फुटपाथवरच… भीक मागत…! वय वर्षे 70 च्या आसपास… दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण…
तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा एक वास येतो…
अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी… (मळकी हा शब्द खूप थिटा आहे)
याला साडी का म्हणावं ? हाच मुळात प्रश्न आहे… अक्षरशः पाच साडेपाच फुटाचं हे कापड ती अंगावर गुंडाळते… जे झाकायला जावं तेच उघडं पडतं… आणि दुर्दैव असं की तिला ते कळत नाही… जाणवत नाही… कारण डोळ्याच्या कसल्याशा प्राॕब्लेममुळे तिला काही दिसतच नाही…!
एकूण अवस्था अशी, की या आज्जीजवळ कुणी जावुच नये… तिच्याजवळ कुणी बसूच नये…! तरीही मी जातो, बसतो तिच्याजवळ .. याचं कारण तिचं लाघवी बोलणं…
हिच्या गोबऱ्या गालातुन एक एक शब्द असा बाहेर पडतो, जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेकपात्रातुन थेंब थेंब अभिषेक व्हावा, त्या पिंडीवर …! अतिशय शुद्ध आणि सात्त्विक !
भीक मागतांना म्हणते… “बाळा तुला जमलं काही तर मला दे, स्वतःला अडचणीत टाकून मला काही देवु नकोस… आधी तू घे, प्रसन्न हो, त्यातून काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे… अन्यथा नको !”
गोळ्या मागतांना म्हणते, “डाॕक्टरसाहेब, मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या. अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खूप आहेत अजून, त्यांना आधी द्या… मी काय, करेन थोडं सहन… !”
दुस-याचा विचार करण्याच्या तिच्या या वृत्तीमुळे मी हिच्याकडं आपसुकच ओढला गेलो होतो…
तिच्याजवळ बसलं की, तिचं बोलणं ऐकता ऐकता बोलण्यातूनच सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरुन येणाऱ्या घाण वासाची जाणिवच होत नाही आपल्याला…
शेजारी बसलं की विचारते, “मी एक श्लोक म्हणू … ?” आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता, ही “विश्वप्रार्थना” म्हणायला सुरुवात करते… “सर्वांना चांगली बुद्धी दे… आरोग्य दे…..आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!”
या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे, तो स्वतःला अजून काही तरी मिळू दे म्हणून “लाचार” होतोय… आणि सर्वस्व गमावून बसलेली ही आज्जी ‘दुसऱ्याला सुखात ठेव’ म्हणून “प्रार्थना” करत्येय…!
स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी, आणि दुस-यासाठी मागणं ही झाली प्रार्थना… दोन्हीतला फरक मला या आज्जीमुळेच समजला…!
ही आज्जी, एका मॕनेजरची बायको. भरपूर श्रीमंती आणि खानदानी संस्कार. रास्ता पेठेत यांचा जुना बंगला होता. सगळं काही होतं, पण घरात कुणी चिमुकलं नव्हतं. दोन वेळा पोटातच बाळ गेलं. मरता मरता वाचली. तिसऱ्या वेळी डाॕक्टरांनी सांगितलं, “आता तुम्हाला बाळ होणे नाही. दत्तक घ्या.”
मधल्या काळात यजमान गेले. इतके दिवस “दूर” असलेले सगळे नातेवाईक “जवळ” आले. आठवतील ती नाती सांगून घराची वीट न् वीट घेऊन गेले.
सगळी “नाती” बरोबर येताना “पोती” घेऊन आली होती. या पोत्यांतुन सर्वस्व वाहून नेलं हिचं… हिच्याच डोळ्यांदेखत…
असलेली सगळी “नाती” हिंदकाळत “गोती” खात गेली, आणि वाड्याची ही खानदानी मालकीण आता फुटपाथची राणी म्हणून जगत्येय, गेली १५ वर्षे… विश्वप्रार्थना गात… ‘सर्वांना सुखी ठेव’ म्हणत…! आपल्या अंगावर धड कापड नसतांनाही गात असते… ‘सर्वांना ऐश्वर्यात ठेव…!’ सगळ्यांनी लुबाडून घेतलं तरी आर्त प्रार्थना करते…. ‘सर्वांचं भलं कर…कल्याण कर….’
ऐकणारा “तो” तिचं ऐकतोय की नाही माहित नाही… तरीही गोबऱ्या गालांतुन हसत, वर बघत विश्वासानं म्हणत असते ‘आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!’
मी एकदा चाचरत हिला म्हटलं, “मावशी तू मनानं इतकी सुंदर आहेस पण इतकी अस्वच्छ का राहतेस?”
ती म्हटली, “अस्वच्छ …? मी कुठंय अस्वच्छ …???”
“अगं हा वास…?” मी आवंढा गिळत, नजर चोरत बोललो….
ती म्हटली, “हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला ? लहान आहेस तू बाळा अजुन…. अरे रस्त्यावर या घाणेरड्या वासानंच माझ्या, रक्षण केलंय माझं… !” ती हसत बोलली…!!!
“म्हणजे…?”
कानाजवळ येऊन बोलली, “तुला माहीत आहे ? कापूर पेटवला की आजुबाजुला किडे येत नाहीत… मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येऊन चावत नाहीत…
ही घाण नाही बाळा, हे माझं कापूर आहे… माझी अगरबत्ती आहे… या कापरामुळंच आणि अगरबत्तीमुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत…”
क्रमशः…
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈