श्री उदय गोपीनाथ पोवळे
☆ अदृश्य लेबल – भाग – 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
परवाचीच गोष्ट. नेहमी प्रमाणे घरातून म्हणजेच श्रीनगर, वागळे इस्टेटमधून दुकानात जायला निघालॊ. गाडी रोडवर आणली आणि घडाळ्यात बघितले. ९.४५ झाले होते, म्हणजेच नेहमीपेक्षा १० ते १५ मिनिट्स मला निघायला उशीर झाला होता. १० वाजता दुकान उघडण्याची वेळ आणि घर ते दुकान गाडीने कमीत कमी २० ते २५ मिनिटांचा वेळ लागतोच. डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं . नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वेळेवर पोहचण्यासाठी माझी धडपड चालू होती. नशिबाने आज तसा रोडवर हेवी ट्रॅफिक नव्हता म्हणून काही गाडयांना ओव्हरटेक करत मी जेवढ्या वेगाने गाडी चालवता, नाही गाडी मारता येईल तेवढी मारत होतो. पुढे जुने पासपोर्ट ऑफिसकडून डाव्या रस्त्याला गाडी वळवून मी हजुरी रस्त्याला लागलो. रस्ता जरा अरुंद असल्याने मला काही करता वेग घेता येत नव्हता आणि गाडयांना ओव्हरटेकही घेता येत नव्हते. मी जरा मनाला आवर घालत, गाडीचा वेग कमी करत हळूहळू पुढे जात होतो. हळूहळू गाडी चालवत हजुरीचा रस्ता पार केला आणि पुढे लुईसवाडीच्या जरा मोठ्या रोडवर लागलो.
आता पुढचा रस्ता सगळा मोकळा दिसत होता तरीही माझ्या पुढे असलेली एक गाडी काही वेग घेत नव्हती. मला एकतर उशीर झाला होता आणि हा जो कोण होता तो गाडी आरामात चालवत होता. पहिल्यांदा मला वाटले कदाचित तो मोबाइलवर बोलत असणार, पण तसे नव्हते. मला त्याचा खूप राग आला होता. मी पहिले गिरगावात रहात असल्याने, राग आल्यानंतर सवयीप्रमाणे पुढची गाडी चालवणाऱ्याच्या खानदानाची माझ्याकडून जोरदार आठवण काढली गेली. माझ्या गाडीच्या काचा बंद असल्याने माझा आवाज बाहेर किंवा त्याच्याकडे पोचण्याचा काहीच प्रश्न नव्हता आणि माझा आवाज त्याच्याकडे पोचावा अशी माझीही अपेक्षा नव्हती. पण त्या क्रियेने आपण जरा मोकळे होतो, हा आमचा गिरगावकरांचा अनुभव.
अजूनही पुढचा गाडीवाला वेग घेत नव्हता. आता माझा धीर सुटायला लागला. मी जोरजोरात हॉर्न मारू लागलो तरीही तो, त्याच्यापुढे पूर्ण रस्ता मोकळा दिसत असूनसुद्धा वेग काही घेत नव्हता. माझी सहनशीलता आता पणाला लागली. माझे एकसारखे घड्याळाकडे लक्ष जात होते. मला खूप उशीर होत होता आणि जो कोण होता तो गाडी बैलगाडीच्या वेगाने चालवत होता आणि ओव्हरटेक करायला पण संधी मिळत नव्हती. आता मी माझा अनावर झालेला राग, हॉर्न दाबूनच ठेवून प्रकट केला. मोठा कर्कशपणे हॉर्नचा आवाज येत होता आणि …
आणि माझं लक्ष त्या गाडीच्या मागच्या काचेवर लिहिलेल्या वाक्यावर गेले. “अपंगांची गाडी, जरा धीर धरा “
ते बघितल्यावर मलाच माझी लाज वाटली. मी जो काही मोठयाने हॉर्न वाजवून माझी अक्कल पाजळली होती त्याची मला शरम वाटली. आता माझी ही गाडी त्या गाडीच्या मागे हळूहळू जात होती आणि मला त्याचा काहीही त्रास होत नव्हता. पुढे जरा डाव्या बाजूला मोकळी जागा होती तेंव्हा त्या पुढच्या गाडी चालवणाऱ्यानी गाडी डाव्या बाजूला घेऊन मला पुढे जाण्यासाठी जागा करून दिली. मी माझी गाडी पुढे घेऊन त्या गाडीच्या समांतर आणून, माझ्या गाडीची काच खाली करून त्याला सॉरी बोलून दिलगिरी व्यक्त केली. त्या माणसाने माझ्याकडे बघून एक लहानसे पण छानसे स्माईल दिले.
क्रमशः…
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈