सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
अनेक दिवसांपासून ठरलेला एखादा प्रवास… आव्हानात्मक, साहसी असेल तर त्यासाठी काही दिवसांपासून रोजचा दिनक्रम सांभाळून सुरु केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी… प्रवासासाठी लागणार्या साधन सुविधांची जमवाजमव, कपडे-खाऊची बांधाबांध ,प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागताच आप्त आणि मित्रांच्या शुभेच्छानी वाढू लागलेली उत्सुकता…काही दिवसांसाठी बंद रहणार्या घराची व्यवस्था….अशा सगळ्या धामधुमीत केलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचेच प्रवास खूप छान आठवणी गाठीला बांधतात. निसर्गरम्यतेमुळे मनाला तजेला आणि चिरंतन आन्तरीक समाधान देऊन जात असतात.म्हणून तर प्रत्येक जण अशा प्रवासाची आतुरतेने वाट पहात असतो आणि तेथून आल्यावर त्या क्षणांना इतरांसोबत वाटून पुन्हा पुन्हा तो आनंद उपभोगत असतो. फोटोरुपाने ते क्षण जपत आणि जगत रहातो ; पण काही प्रवास वेगळ्या अर्थी अविस्मरणीय ठरतात….
अशाच एका अविस्मरणीय प्रवासाची अधुरी कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटली.
तर झालं असं..
चार सहा महिन्यांपूर्वी ‘एवरेस्ट बेस कैंप’ला जायचा बेत ठरला. आमच्या कुटुंबातील आम्ही सहाही जण (तीन भाऊ आणि त्यांच्या पत्नी) या प्रवासाची आपापल्या परीने तयारी करत होतो.आमचे नवरे यात उत्साहाने सामिल झालेले असल्याने आम्ही तिघी जावा प्रवासाच्या आखणीबाबत अगदी निश्चिंत होतो.निदान मी तरी प्रवासाच्या मार्गक्रमणाबाबत अगदीच गाफिल होते. चाळीस तज्ञ आणि सूज्ञ लोकांबरोबर प्रवास करताना ‘आपण केवळ प्रवासाचा आनंद लुटावा ‘अशी माझी साधी सोपी धारणा!!
कमीत कमी संख्येने कपडे आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याच्या सूचनांचे आम्ही पालन करण्याचे ठरवले.19000 फुटांवरचे जग आणि तिथले जगणे पहिल्यांदा अनुभवण्यासाठी आमची तयारी झाली होती.
29 एप्रिलला मुंबईहून आम्ही दोघे आणि इतर तीन जण विमानाने दिल्लीला पोहोचलो.तिथे इतर दहा बारा पुणेकर आम्हाला भेटले.संध्याकाळी चार पर्यंत काठमांडूला पोहोचल्यावर उरलेल्या पंचवीस तीस भारतीय सहप्रवाशांची भेट झाली.चाळीस लोकांच्या या चमूत भारतीयांबरोबर काही अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवासीही होते.ग्रुपमधील जवळ जवळ सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि पूर्वाश्रमीचे घट्ट मित्र!त्यांच्या साठी हे एक अनोखे कौटुंबिक reunion होते.आम्हीच यामध्ये थोडे नवखे होतो. सगळ्यांशी ओळखी होण्याकरता काही दिवस नक्कीच लागले असते.या चमूमध्ये बरेच प्रवासी पहिल्यांदाच गिर्यारोहणाचा अनुभव घेणार होते.चोवीस वर्षांच्या तरुणांपासून पासष्टीपर्यंतच्या वयोगटातील सगळे या साहसी यात्रेसाठी उत्सुक होते.प्रवासी कंपनीची सगळी मदतनीस माणसे, गाईड्स यानी मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले आणि उद्यापासून सुरु होणार्या प्रवासाबाबत सूचनाही दिल्या. एकंदरीत वातावरणात उत्साह आणि उत्सुकता भरल्याचे जाणवत होते.येत्या काही दिवसात आंघोळीची गोळी घ्यावी लागणार असल्यामुळे मस्त अंघोळ करुन घेतली आणि साद देणार्या हिमशिखरांची स्वप्ने बघत लवकरच झोपी गेलो….
दुसर्या दिवशी बांधून दिलेली न्याहारी सोबत घेऊन 15 जणांच्या गटाला घेऊन जाणार्या लहानश्या विमानाने ‘ लुक्ला ‘ नावाच्या विमानतळी उतरलो.आसमंतातील गारवा, शुद्ध ताजी प्रदुषणरहित हवा मनाला उत्तेजित करत होती.नवीन ओळखी करत, गप्पा टप्पा मारत, हसत खिदळत, रस्त्यात भेटणार्या देशी परदेशी गिर्यारोहकाना ‘नमस्ते’ या शब्दानी अभिवादन करत चाळीस जणांचा आमचा चमू आणि इतर 10 नेपाळी शेर्पा मदतनीस पुढे निघालो.पाइन वृक्षांच्या
हिरवाइने नटलेल्या डोंगररांगा, नागमोडी वळणाच्या कच्च्या पाऊलवाटा , अखंड सोबत करणारा खळखळता नदीप्रवाह, मधूनच दूरदर्शन देणारी हिमशिखरे, सुखद गारवा आणि मस्त उत्साही गप्पा….प्रवासाची सुरुवातच इतकी छान झाली…रोज साधारण पाच सहा तासांचे चालणे अपेक्षित होते. माझ्या आतापर्यंतच्या इतर जुन्या ट्रेकच्या अनुभवावरुन ‘दुपारच्या जेवणानंतर विश्रांती ‘असे गणित माझ्या मनात बसले होते.परंतु या ट्रेकची गणिते थोडी वेगळी आहेत हे हळू हळू लक्षात येऊ लागले.
त्या दिवसाच्या प्रवासाचा टप्पा ‘फाकडिंग’ या गावापर्यंत होता.तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 7 तास लागले.प्रत्येकाचा वेग, क्षमता, शारिरीक आणि मानसिक तयारी वेगवेगळी! शिवाय 2500 मीटर उंचीवरची विरळ हवा प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होती.दिवसाअखेरी ,प्रचंड थकल्यानंतर आयता मिळणारा साधा ‘डाळ भात’ही गोड लागत होता.
बिछान्यावर पडताच झोप लागली.
दुसर्या दिवसाची सुरुवात भरपेट न्याहारीने होणे गरजेचे असले तरी ग्रुपमधील अनेकाना म्हणावी तशी भूक नव्हती.पाठीवरच्या सैक मध्ये काही पौष्टिक खाऊ आणि दोन लिटर पाणी घेऊन आमचा प्रवास सुरु झाला.गिर्यारोहणात शारिरीक तयारी इतकीच मानसिक तयारी गरजेची असते,हे जाणवत होते.थकलेल्या शरीराला सोबतचा निसर्ग जोजवत होता.दिवसाअखेरी जडावलेले पाय आणि डोळे साध्याश्या अंथरुणावरही निवांत होत होते.
दर दिवशी जसजसे आम्ही अधिक उंची गाठू लागलो तसतशी परिस्थिती अधिक आव्हानात्मक होत चालल्याचे जाणवू लागले.काहींचे पोट बिघडले,काहींची डोकी जड झाली, काहींची झोप हरवली तर काहीना प्रचंड थकवा जाणवू लागला.चालताना धाप लागणे तर सहाजिकच होते. पण एखाद दोन दिवसात परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. आम्ही या नवख्या वातावरणाला सरावत होतो. कोणालाही मेडिकल imergency लागली नाही.
रोज सात आठ तासांचे चालणे होत होते.कधी ग्रुपबरोबर आणि बर्याच वेळा एकल असा हा प्रवास होत होता.स्वत:शी गप्पा मारायची, वाद घालायची, समजावणीची, चुचकारायची खूप संधी मिळाली.नव्या लोकांकडे बघून खूप शिकायला मिळाले.प्रतिकूल परिस्थितीमधील स्वत:च्या गरजा आणि क्षमता नव्याने कळल्या.निसर्गाची अपरिमित ताकद तर पावलगणिक जाणवत होती.पंचमहाभुतांनी व्यापलेल्या वातावरणाचा आपणही एक भाग आहोत याची संवेदना होत होती.निसर्गशक्ती धीरगंभीरतेने आम्हा सर्वांच्या अस्तित्वाला साथ करत होती.
एका प्रवासात तर डोले नावाच्या गावी मुकामी पोहोचायचे होते.त्या दिवशी आम्ही 14 तास चाललो.शरीराने प्रवास पूर्ण करण्यासाठी बंड पुकारले.पण डोंगरदर्यात, जंगलात, रात्र दाटत असताना ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून गत्यंतरच नव्हते.
क्रमशः…
लेखिका : डॉ. सुप्रिया वाकणकर.
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈