सुश्री तृप्ती कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा —’फुगेवाला‘ ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
मी नेहमीच असं गंमतीत म्हणते, ‘पुणेकर सगळं टाळू शकतील पण एक गोष्ट मात्र ते कधीच टाळू शकत नाहीत आणि ते म्हणजे ट्रॅफिक… ते जर कुणी टाळू शकत असेल किंवा आत्तापर्यंत एखाद्याला ते लागलं नसेल तर त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येच करायला हवी’, इतकं ते आपल्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे कुठंतरी आपण थांबणं आवश्यक असल्यामुळे, कुठंतरी जाम झाल्यामुळे… काहीतरी चुकतंय याची जी जाणीव आपल्याला होते ती सुधारण्याचा जो आपण प्रयत्न करतो तो फार महत्त्वाचा असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी सुरळीत होण्यापेक्षा कधी कधी अडथळे येणं हे आपल्यासाठी आवश्यक असतं, फक्त ते आपल्याला जाणता आलं पाहिजे.
मी जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकते तेव्हा मी आजूबाजूला बघते तर जाणवतं, अरे हे नवीन ठिकाण आहे. हे पूर्वी कधी आपण या निवांतपणे पाहिलं नव्हतं. आपण स्वतःहून कधी इकडे पाहिलंच नसतं. धावत्या गाडीतून एखादी गोष्ट बघणं आणि तिथे रेंगाळून ती गोष्ट बघणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गाडीच्या वेगाबरोबर आपल्या मनाचा वेग इतका जबरदस्त असतो की आपण त्या क्षणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची दखलसुद्धा घेत नाही. पण ज्यावेळी आपल्याला तिथं थांबण्याची वेळ येते तेव्हा जे आपल्याला दिसतं… जे अनुभवतो… ते एरवी आपण कधीच मुद्दाम पाहिलं, अनुभवलं नसतं.
त्यादिवशी असंच ट्रॅफिक लागलं. सिग्नल काही केल्या लवकर सुटेना. बहुदा काहीतरी घोळ झाला होता. आणि सगळेजण वैतागले होते. जो तो आपापलं मन रिझवण्याचा पयत्न करत होता… कुणी मध्येच रस्त्यात उतरून हातवारे करत वाहनांना मार्गदर्शन करत होतं. कुणी फोनवर मोठ्याने बोलत होतं, कुणी हॉर्न वाजवत होतं, कुणी गाडी साईडला घ्यायला सांगतंय, कुणी फूटपाथवरून गाडी घुसवण्याचा प्रयत्न करत होतं, असे सगळेच आपापल्यापरीनं प्रयत्न करत होते. सरतेशेवटी त्यांच्या लक्षात आलं की आता मूळ कोंडी सुटल्याशिवाय जाता येणार नाही. आणि मग सगळेच एकदम शांत झाले. मला जाणवलं की ही वेळ माझ्यासाठीचा खास निवांतपणा घेऊन येणारी आहे. डोक्यात चाललेल्या विचारांना पण या सिग्नलमुळे ब्रेक लागला होता. आणि आता काहीतरी नवीन बघायला मिळेल असं वाटत असतानाच अचानक तो दिसला… इतक्या शांतपणे आकाशाकडे नजर लावून उभा होता की जणू काही घडलंच नाहीये. फक्त त्या त्याच्या दणकट सायकलच्या हॅन्डलवर मागेपुढे दोऱ्याने घट्ट बांधेलेले रंगीबेरंगी आणि निरनिराळ्या आकाराचे फुगे तेवढे वाऱ्यावर उडत होते.
सगळ्यांनाच सक्तीनं स्थिर व्हायला लावलेलं असताना वाऱ्यावर उडणारे ते फुगे मला फारच लक्षवेधक वाटले. मला या परिस्थितीत काहीतरी विरोधाभास… विसंगती दिसली. सुदैवाने माझी रिक्षा त्याच्या बऱ्यापैकी जवळ आली होती. त्याच्या कॅरिअरला बांधलेले फुगे माझ्या रिक्षेत डोकावून त्या वातावरणात एक हलकेपणा आणण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटलं. आणि मी नकळतच त्याच्याकडे निरखून पाहू लागले. तसा तो पाठमोरा होता. मध्यम उंचीचा, रापलेला रंग, काटकुळा… विचार आला, आजपर्यंत आपण कधी जाडजूड फुगेवाला पाहिलाय का? मी आठवू लागले पण आठवेना… पांढराच पण मळलेला शर्ट, खाली मळकी पोटरीपर्यंत दुमडलेली पँट… राकट हात, त्यांनी पकडलेल्या हॅन्डलला लटकवलेल्या पिशव्या, त्यातून बाहेर येऊ पाहणारे फुगे. एका साध्याशा पिशवीत पाण्याची बाटली दिसली आणि अजूनही त्यात काहीबाही होतं पण त्याचा मला अंदाज लावता येईना…. आणि माझं मन फुगेवालाच्या आयुष्याचं अनॅलिसिस करू लागलं.
किती उत्पन्न असेल, त्यात सगळ्यांचं कसं भागवत असतील… याची स्वप्नं काय असतील… तो समाधानी असेल का… रोजच्या कामात तो कसा मन रमवत असेल… इतक्यात कसलातरी आवाज आला म्हणून त्यानं मागे फुग्यांकडे वळून पाहिलं, त्यावेळी मला त्याच्या डोळ्यात फुग्यांविषयी ममत्व दिसलं. एक मन म्हणालं, छ्या! असं काही नाही. तुला तसं वाटतंय… दुसरं मन म्हणालं का नाही तसं ? अरे माणूस आहे तो… माणसं चांगली असतात. या द्वंद्वात मी सापडले असताना पटकन काहीतरी हालचाल झाली मी दचकले. बघते तो इतक्या गोंधळात, गोंगाटात त्या फुगेवाल्याला एका लहान मुलाचा आवाज आला आणि त्यानं पटकन फुगा काढून त्याला दाखवला . मी बघू लागले याला कुठे दिसतोय मुलगा… मला काही दिसेना. आता रिक्षेवालाही बघू लागला. त्यालाही तो दिसेना. हा इकडून खाणाखुणा करून काहीतरी सांगत होता… त्याच्या चेहऱ्यावरून तरी तो फुगा विकला जाणार आहे असं वाटत होतं. या धामधुमीत सिग्नल सुटला… सगळेजण आता पुढे सरकू लागले. आणि आम्ही पुढे निघून आलो.
पूर्ण प्रवासभर माझ्या मनात प्रश्नच प्रश्न…
जाड फुगेवाला कुणी पाहिलाय का?
यांची स्वप्नं काय असतात?
फक्त फुगे विकणाऱ्याचं एखादं शानदार दुकान असू शकतं का ?….
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈