डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ ओंकारची शेळी— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
सुशीला माझी पेशंट. सारखे येऊन येऊन ह्या बायका माझ्या मैत्रिणी पण झाल्या. मी त्यांना घरचीच एक वाटत असे.
त्यांच्या घरच्या छोट्या मोठ्या समारंभाला मला आवर्जून बोलावत असत. मग लग्नाच्या बांगड्या भरणे असो किंवा हळदीकुंकू असो. मीही त्यांच्या कडे जाणे कधीही टाळले नाही.
सुशीला फार नीट नेटका संसार करणारी होती. नशिबाने नवऱ्याची साथ चांगली मिळाली होती तिला. गरीबीत का होईना अगदी छान टुकीत संसार चालला होता सुशिलाचा.
सुशिलाचा मुलगा ओंकार गुणी मुलगा होता. शाळेत नेहमी चांगले असत मार्क. एकच मुलगा होता सुशिलाचा पण भलते लाड करुन बिघडवून नाही ठेवला तिने. एक दिवस म्हणाली “ डॉक्टरबाई ओंकार म्हणतोय आपण गाय किंवा म्हैस पाळूया. आहे की जागा आपल्या घरासमोर. मी सगळे करीन त्याचे. मला लै हौस आहे. अहो पण चेष्टा का आहे गाय विकत घेणे– कुठून आणू मी ते हजारो रुपये ? पुन्हा त्याचे वैरण चारा—अशक्य गोष्ट आहे बघा . हा कसला हट्ट . पुन्हा गोठा बांधा– तो एक खर्च होईलच. रोज रोज चाललंय बघा. कुठून घेतलंय खूळ डोक्यात देव जाणे.
जनावर पाळणे चेष्टा नाही हो . घरचा सदस्यच असतो तो. ती धार कोण काढणार, दूध कोण विकणार —याला काही समजत नाही . पोराटकी नुसती. “
सुशीला खरोखरच वैतागली होती. तिचे अगदी बरोबर होते. आधीच लोकांची कामे करून पिचून निघत होती,
त्यात हा व्याप कोण घेणार अंगावर. मीही विचारात पडले. एकीकडे कौतुक पण वाटले ओंकारचे.
आमची मुले या वयात आणखी चांगला मोबाईल हवा– नवे गेम्स हवेत म्हणून हट्ट करतात . पण हा मुलगा गाय म्हैस पाळू म्हणतोय— मलाही हा प्रश्न कसा सोडवावा समजेना. अर्थात हा प्रश्न माझा नव्हता.
पण आमचे घरातले लोक म्हणतातच –` आपल्या बाईंना सवयच आहे लोकांचे प्रॉब्लेम आपलेच समजून डोके शिणवून घ्यायची.`
पण मी हे सगळे विसरूनही गेले . आणि माझ्या हजार व्यापात बुडूनही गेले. मुलीच्या परीक्षा, ऍडमिशन्स ,
हॉस्पिटलचे व्याप— एक का व्याप होता मागे माझ्या.
मग एक दिवशी सुशीला परत दवाखान्यात भेटायला आली . म्हणाली “ बाई, दवाखाना झाला की याल का घरी ?ओंकार बोलावतोय तुम्हाला. “
बाहेर ओंकार उभा होता. संकोचाने म्हणाला , “ ताई या ना, गम्मत आहे एक.”
दवाखाना बंद केल्यावर मी उत्सुकतेने गेले सुशीलाच्या घरी. मोठे टापटिपीचे घर. स्वच्छ ठेवलेला ओटा, 3 खोल्या अगदी छान ठेवलेल्या– मला छानसे सरबत दिले, लाडू दिला.
“ अरे ओंकार,ती गम्मत दाखवणार आहेस नं मला ?
“ बाई, चला मागे अंगणात.”
मला त्याने अंगणात नेले. तिथे एक पांढरी शुभ्र शेळी बांधलेली. आणि तिची सशासारखी दोन करडे.
मला इतकी मजा वाटली—
सुशीला म्हणाली, “ बाई,गाय म्हैसवरून शेवटी शेळीवर झाली बघा तडजोड. आमच्या पलीकडच्या चाळीत शेळी व्यायली. तिला दोन पिल्ले झाली. मैत्रीण म्हणाली, ` ही शेळी जा घेऊन तुझ्या ओंकारला. फार हट्ट करतोय ना.
बघ, सोपी असते ग शेळी पाळायला. वर दूध देईल, तिची पिल्ले विकता येतील ते वेगळेच उत्पन्न. बघ बाई हवी का.
एक नर आहे, एक मादी. मादी ने ओंकारसाठी – मावशीकडून भेट.
याचे पैसे नको देऊस मला.
घरी येऊन ओंकारला विचारले, तर तो लगेच गेला बघायला . ही शेळी इतकी आवडली त्याला. बारके पिल्ल्लूच की होते हो ते. मी म्हटले, “ ओंकार,हिची सगळी काळजी तू घ्यायची .तरच हो म्हण. आम्ही कोणीही हिचे काहीही करणार नाही बघ. पुन्हा अभ्यासात मागे पडलास तर देऊन टाकणार मी लगेच मावशीला. चालेल का ”
“ ओंकारने त्या पिल्लाला पोटाशी धरले आणि घेऊनच आला बघा. काय लागतंय हो शेळी सांभाळायला. बिचारी काही पण खाती. अहो, वर्षभरात केवढी मोठी झाली सुद्धा. ओंकार टेकडीवर तिला चरायला सोडतो आणि स्वतः अभ्यास करत बसतो. आता बघा,हिला दोन पिल्ले पण झाली . आहे का नाही आक्रीत ? “
सुशीला हसायला लागली. “ हा आणि उद्योग केव्हा केला म्हणायचा.”–आम्ही सगळेच हसलो.
ओंकार म्हणाला, “ दोन्ही पण बोकडच झाले. आता मी ते विकून टाकीन. मस्त किंमत येते बोकडांना. “
ओंकारची आजी पण बाहेर आली . म्हणाली, “ अहो, माझा पण मस्त वेळ जातो या यमनी पायी. यमनी नाव आमच्या शेळीबाईचे. गुणी हो बिचारी. अहो रोज अर्धा लिटर दूध पण देती सकाळ संध्याकाळ. आम्हाला आता बाहेरून दूध नाही घ्यावे लागत. पुन्हा उरलेला भाजीपाला असं काहीही खाते बिचारी. मस्त केले ओंकारने शेळी आणली. बाई, वाईच चहा घेता का शेळीच्या दुधाचा.”
“ नको,नको,,” मी घाईघाईने म्हटले. मला काही शेळीच्या दुधाचा चहा प्यायचे धैर्य झाले नाही. सगळे हसायला लागले.
ओंकार म्हणाला, “ माझे सगळे मित्र रोज येतात यमनीशी खेळायला. आणि हे दोन बोकड आहेत ना – चंगू मंगू मी दिसलो की उड्या मारतात, खूप खेळतात. आमच्या गुरुजींनी आमचा सगळा वर्ग आणला होता, माझी यमनी आणि पिल्ले दाखवायला. म्हणाले की आपण ओंकारचे कौतुक करू या. किती छान सांभाळ करतोय तो या मुक्या जनावरांचा. “
सुशीला म्हणाली, “ अहो बाई आमच्या पलीकडे दोन जुळी मुले झाली . अगदी बारकी बघा वजनाने. जगतात का मरतात अशी स्थिती. डॉक्टर म्हणाले,यांना फक्त शेळीचे दूध पचेल , बाकी कोणतेच नाही. आमच्या ओंकारने, रोज न चुकता दोन महिने स्वतः दूध पोचवले त्यांच्या घरी. आणि ती दोन्ही मुले अगदी छान गुटगुटीत झाली बघा. त्या आईवडिलांनी तर आमचे पायच धरले बघा. “
“ माझा शाळेत, 15 ऑगस्टला सत्कार केला,आणि छोटेसे बक्षीस पण दिले हेड सरांनी.” ओंकार अभिमानाने सांगत होता. मलाही अतिशय कौतुक वाटले या सगळ्यांचेच.
सुशीला मला पोचवायला बाहेर आली. म्हणाली, “ बाई आमच्यात एक म्हण आहे—मोठी, खूप खाणारी, जास्त दूध देणारी, मोठ्या पोटाची म्हैस पाळण्यापेक्षा छोट्या पोटाची म्हैस पाळावी। बेताचे खाणारी, परवडेल अशी बेतशीर. तिचा खर्चही कमी, देखभाल पण कमीच.”
किती खरे बोलली सुशीला —-
ही छोटी माणसे आपल्याला जगण्याचे केवढे मोठे तत्वज्ञान अगदी सहज सांगून जातात ना. —-
©️ डॉ. ज्योती गोडबोले