मनमंजुषेतून
☆ स्पर्शाचं महाभारत !…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆
ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?…आठवते का.??
बर्याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका..! अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं त्यात.. नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम.
शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..
हे सगळं आठवायला एक कारण घडलं. काल-परवा `आपलं माणूस ` हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..!
नाना आणि सुमीत राघवन.. त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमीतला बोलता-बोलता विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतास.? कधी आऊटिंगला ? बाहेर जेवायला.?”—- सुमीत गप्प…इथपर्यंत ठीक..
पण नंतर नाना सुमीतला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्याला?” — आणि अंगावर सरसरून काटा आला.. नाना पुढे म्हणतात —“ एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे “स्पर्श” करत नाही ही साधी गोष्ट नाही, हा तर पुढचा कहर..”
किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजीही घेतो, पण खरंच स्पर्श टाळतो का?— आणि तो खरंच इतका महत्वाचा असतो ? आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण ?
खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक. स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..
लहानशी गोष्ट—स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..
पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय ?–आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो?
आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात..!
उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..
दिवाळीत आंघोळी… आधी पाडव्याला आईने.., भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श—-तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला.
रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित —–
ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श.,
लग्नात लज्जाहोमाच्या वेळी, एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारा स्पर्श..
स्पर्श लाजरे असतात, बुजरेअसतात.. मायने ओथंबलेले असतात. कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात — पण ते बोलतात—
पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…
आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..
स्पर्श रेशमी असतात—जाडेभरडे असतात— पण आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..
आज माझी आई सत्तरीच्या पुढे आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टिव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते–“रोड झालास रे”. ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत
कितीतरी देवाण-घेवाण करते..
स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बात दिली जाते, तशीच दसर्याला सुद्धा गळाभेट असतेच की. पाश्चात्य संस्कृतीमध्ये शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही परिचयाची, भेटीची पद्धत. इथेही स्पर्श महत्त्वाचा..
का असेल स्पर्श महत्त्वाचा?—
मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात.. आणि हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..
मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.
आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ..?
म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “ शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्याला? ”
लक्षातच येत नाही आपल्या —हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत.. ती आपली गोष्ट सांगत राहतात . कुठे तरी, कोणाचे तरी, हात ताटकळतात..
डोक्यावरून फिरण्यासाठी. कुणाचेतरी तळवे कोमेजून जातात – तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे..
सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसुसते, नातवांनी ओढून पाहावी म्हणून—-
पण वेळ नसतो ना आपल्याकडे. पैसा असतो. टीव्ही असतो. गाड्या, घोडे सगळ काही आहे. पण —
पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून “ जेवलीस का गं ? ” असं विचारण्यासाठीचा वेळ आणि स्पर्श हरवून बसलो आहोत आपण..
“वेळ हरवला तरी चालेल, पण स्पर्श जपले पाहिजेत हो”
स्पर्श भावनेचा झरा सतत वाहू द्या.., त्याला अडवू नका आणि आटवू तर नकाच —-
लेखक : अज्ञात
संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈