श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साडेसाती – एक चिंतन – भाग – 2 … अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

(अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. ) इथून पुढे —–

कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात —– वेळ नसेल तर भिजत जायचे,—-

वेळ असेल तर थांबायचे,—- ही निर्णयक्षमता साडेसातीत येते.

चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते. 

भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते.

चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही. आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो. 

`मला वाटले,` `माझ्या लक्षात आले नाही ` ` इतकं चालतं,` अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात. 

शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही. अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. 

गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात. 

शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही.

हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात.

डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं. 

स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.

घाबरावे असे शनी काही करत नाही—-

आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे. 

त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही . ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.

माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे. 

गीतेत “ कर्मण्येवाधिकारस्ते “ असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात. 

गीता, आणि एकंदरीतच  संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो. 

ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो. 

खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो.

 अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात.

आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते —- फक्त साडेसातीत नाही , तर एकूण आयुष्यातच…

“ मी म्हणेन ते,—- मी म्हणेन तसे, —-मी म्हणेन तेव्हा —-” असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो.

माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही .– होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही .—तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही . तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही. 

——  एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते. आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते. तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, असे सांगते. मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले.—

त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले. 

ही सत्य घटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ? 

हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. चूक न सुधारता नुसती सांगून  उपयोग नाही.

साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते, त्या संधीचे सोने करावे. 

ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायला लावतात . माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही. 

साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात.

साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम. 

सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????

शुभं भवतु !

— समाप्त —

लेखक : अज्ञात

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
ऐश्वर्या परांजपे

साडेसाती बद्दल चांगले विवेचन केले आहे