डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ Mother’s day – एक शोकांतिका… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

खरं तर एक स्त्री रोग तज्ञ म्हणून हे प्रसंग मला नवीन नाहीत.  पण हे सगळे मागच्या तीन ते चार दिवसात एकत्रित घडलेत . Mother’s day च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आईप्रती भावनांचा जो काही धुमाकूळ घातला जातोय, आजचा लेख त्यावर शोकांतिका म्हणून नक्की वाचा ! एकच वाटतं, अजूनही २०२२ साली, नको तो जन्म बाईचा….

प्रसंग १

१९ वर्षाची पहिलटकरीण,  बाळाचे ठोके कमी होताहेत  म्हणून सिझरला शिफ्ट करत असताना, नवरा हात जोडून, ” मॅडम, बाळ वाचेल ना? लवकर करा सीझर ….” तोच नवरा मुलगी झाली हे कळल्यावर तोंडावर सांगून गेला, ” आधीच्या दोन बायकांना मुलीच झाल्या म्हणून तिसरं लग्न केलं होतं, हिलाही मुलगीच झाली. माझा आणि हिचा काही संबंध नाही….” 

तिसरं लग्न त्याचं, हिचं पहिलं? कोणी लावलं? इतकी लग्न officially कसं  करू शकतं कोणी? आता ही काय करणार? सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवून तो माझ्या डोळ्यासमोर निघून गेला.

प्रसंग २

प्रचंड सुजलेली , BP वाढलेली, दिवस पूर्ण भरलेली बाई आणि नवरा लेबर रुमला आले. येताच पहिलं वाक्य, पैसे नाहीत, करायला कुणी नाही. हॉस्पिटल मॅनेजमेंटला फोन करून बिलात सवलत मिळवून घेतली. डिलिव्हरी झाल्यावर गुंतागुंतीमुळे पेशंटला ICU त ठेवले. पैशाची सोय करून येतो म्हणून तिला लेबर रूममध्ये सोडून गेलेला नवरा अजूनही परत आलेला नाही. तिला घरच्यांचा नंबरही पाठ नाही. हॉस्पिटलने, डॉक्टरांनी कशी आणि किती जबाबदारी घ्यायची ? आहे उत्तर ? 

प्रसंग ३

२७ वर्षीय बाई, परवा रात्रीपासून ब्लिडिंग होतंय म्हणून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत दाखल. नाडी १३०, bp ८०/५०, पांढरीफटक पडली होती. हिमोग्लोबिन रिपोर्ट आला ३ ग्रॅम. योग्य ते उपचार, रक्त देऊन तिला सेटल केल्यावर रागावले, ” इतकं कशाला अंगावर काढायचं? यायचं ना लगेच… जीवावर बेतलं असतं .” तिचं त्यावर उत्तर, ” ताई, नवऱ्याला दोन दिवस सांगते आहे, दारूला पैसे असतात पण मला दवाखान्यात न्यायला नाही. चक्कर येऊन पडले म्हणून उचलून आणली “

–  काय बोलणार, आहे उत्तर ?

प्रसंग ४

गर्भनलिकेत राहिलेला गर्भ फुटून ( ectopic pregnancy ) पोटात रक्तस्त्राव झाला होता. Emergency ऑपेरेशन करून त्या बाजूची गर्भनलिका काढून टाकली आणि बाईचा जीव वाचला. नवऱ्याची प्रतिक्रिया, ” दुसऱ्या नळीवर प्रेग्नन्सी राहीलच असं लिहून द्या, तरच बिल भरतो. नाहीतर एवढ्या बिलात तर दुसरं लग्न होईल माझं….” 

— चूक डॉक्टरची, तिची की नवऱ्याच्या प्रवृत्तीची ? 

काल २४ तासांची ड्युटी करून हा लेख लिहिण्याचा अट्टहास मी एवढ्यासाठी केला की उद्या mother’s day म्हणून खूप कौतुक करतांना ह्या असहाय्य आयांची तुम्हाला आठवण यावी. अरे, नका देऊ आईला लाखोंचे गिफ्ट्स, द्या एका स्त्रीला सन्मान, काळजी घ्या तिच्या आरोग्याची. बदला दृष्टिकोन तिला creation आणि recreation चे साधन म्हणून बघण्याचा !

एक कळकळीची विनंती, आजूबाजूला अशी महिला दिसली तर जरूर मदत (उपकार नाही) करा. Mothers day ला घ्या ना विकत १०० लोहाच्या गोळ्या आणि वाटा तुमच्या घरातल्या कामवाल्या बायांना, सिक्युरिटीच्या बायकांना किंवा साईटवर काम करणाऱ्या महिलांना. घेऊन जा एखाद्या प्रेग्नन्ट गरीब महिलेला दवाखान्यात किंवा द्या तिला सकस आहाराचं पॅकेट !

— प्रत्येक स्त्री मध्ये आई बघा, आई बघा….

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर (स्त्री रोग तज्ञ)

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments