श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ गवसले की हरवले – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

नुकत्याच निर्माण झालेल्या चौपदरी महामार्गावरून सदाशिव ड्रायव्हर शंभर, एकशे वीसच्या गतीने कार चालवत होता. बाजूच्या सिटवर बसून मी दूरवर न्याहाळीत होतो. गुळगुळीत सिमेंटचा चौपदरी महामार्ग अगदी सरळ, नजर जावी तोपर्यंत वळण नसलेला ,दोन्ही बाजूस लोखंडी मजबूत कठडे, काठावर पांढरे पेंटचे पट्टे. मध्येच उंच पूल, नजर वळवली तर गावाला बाजूला टाकून मार्ग बनविला गेल्याचे लक्षात आले. अश्या कितीतरी छोट्या गावांना बाय पास करून मार्ग बनविण्यात आला होता . सदाशिवच्या आवाजाने मी भानावर आलो.

“मस्त बनलाय सर रस्ता. काही चिंता नाही समोरून येणाऱ्या वाहनांची, फक्त चालवीत रहायचे बस, तीन तासांत गावाजवळ”.

सदाशिवकडे माझं लक्षच नव्हतं. माझं मन भूतकाळात केव्हाच गेलं होतं .मामाच्या गावाला याच मार्गाने आईसोबत जाण्याचे ते दिवस आठवले. सी.पी. सिख कंपनीच्या बसने सकाळी सातला निघायचे नि दुपारी केव्हातरी मामाच्या गावी पोहचायचे. एकेरी वाहतुकीचा डांबरी रस्ता, लहान मोठे अनेक रपटेवजा पूल, दुतर्फा हिरवीकंच झाडे, त्यात तीस चाळीसच्या गतीने धावणारी, नि प्रत्येक गावाला थांबणारी ती बस आजही डोळ्यासमोर उभी राहते.  खिडकी- -जवळ बसून बाहेरचे दृश्य पाहणे हा माझा आवडीचा छंद होता. पावसाळ्याचे दिवस असले की शेताकडे जाणाऱ्या बायांचे थवे दिसायचे. प्रत्येकीच्या हातात विळा असायचा .कडेवर मूल ,डोक्यावर शिदोरीची टोपली- जलद गतीने जाणाऱ्या बायांकडे पाहून मला कुतूहल वाटायचे.त्यांच्यामागे एखादी बैलगाडी, त्यात भरलेले शेतीपयोगी सामान, ढवळ्या पवळ्यांची  जोडी , त्यांना हाकणारा गाडीवान पाहून आम्हाला चांदोबा मासिकातील चित्रे आठवायची .मध्येच बस अचानक थांबायची नि ड्रायव्हर जोरजोराने पोंगा वाजवायचा. नकळत नजर समोर जायची. गायी म्हशींचा कळप रस्त्यावरून चाललेला दिसायचा. काही लहान वासरे आपल्या आईच्यामागे असायची. एखादी धिप्पाड म्हैस हळूहळू डौलात चालायची, जणू काही चाळीतला दादा चाळीत फिरतोय असे वाटायचे .इतक्यात गुराखी धावत यायचा. हातातील काठीने गुरांना बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा. त्याची धावपळ व तोंडातून काढलेले आवाज ऐकून खूप आनंद वाटायचा. पुढे निघालो की बसला गती घेतांना जो घुरर घुर …..आवाज यायचा त्याची नक्कल आम्ही खेळताना करायचो. 

पुढे एखादे खेडे लागायचे. बाजूला एखादा तलाव दिसायचा. तलावात असलेली कमळाची फुले मन मोहून घ्यायची. काठावर कपडे धुणाऱ्या बाया, नि बैल धुणारे, त्यांना पाणी पाजणारे शेतकरी दिसायचे. तलावात एखादी होडी दिसायची. त्यावर बसलेला कोळी आपले जाळे फेकून मासे पकडीत असायचा. क्षणभर दिसणारी ही दृश्ये. पण मनपटलावर बिंबवली जायची. दिवाळीला मामाकडे जाताना ड्रायव्हर इथे गाडी थांबवायचा .लगेच अनेक स्त्रिया बसला गराडा घालायच्या. त्यांच्या हातात शिंगाड्यानी भरलेल्या परड्या असायच्या. तेव्हा पंचवीस पैशांना वीस शिंगाडे मिळायचे. दोन चार शिंगाडे जास्त मिळावे म्हणून घासाघीस चालायची. आईने घेऊन दिलेले शिंगाडे खाताना चालत्या गाडीतून  टरफल बाहेर फेकण्याची मजा वाटायची. मार्गात रेल्वेचे क्रॉसिंग यायचे. फाटक उघडे असावे असे लोक बोलायचे. पण मला मात्र ते बंद असले की आनंद वाटायचा. काही प्रवासी उतरून लघुशंका उरकून घ्यायचे नि फाटकाजवळ जाऊन उभे राहायचे. मला मात्र आई बसमधूनच पहा म्हणायची. दुरून आगगाडीची शिटी वाजली की तिकडे बघायचे. धडधडत गाडी यायची. त्यातही कोळशाचे इंजिन असले की धडधड आवाज यायचा. गाडी प्रवासी असली की गाडीतील काही प्रवाशी हात हलवायचे. खूप आनंद वाटायचा.

—क्रमशः…

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments