??

☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं की आज तुझी पुण्यतिथी. 

बायकोला सांगितलं, “अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.”

मग स्वतःलाच विचारलं, “ सावित्रीबाईंची पुण्यतिथी ? कसं शक्य आहे ? अगं, माझ्या गावातली, शहरातली, 

देशातली प्रत्येक मुलगी जेव्हा शिक्षण घेऊन एखाद्या मोठ्या पदावर जाते, शिक्षणाच्या भरोशावर एखादा सन्मान प्राप्त करते, तेव्हा – तेव्हा तूच तर जन्माला आलेली असतेस. यंदा माझी पुतणी पदवी घेईल, म्हणजे यंदा तू माझ्या घरातही जन्माला येणार आहेस.  सुरुवातीला प्रश्न पडला की तुला काय म्हणावं ? बाई म्हणावं की आई म्हणावं ? आमच्याकडे गावात मोठ्या बहिणीला बाई म्हणतात. मग विचार केला, माझी आई शिकलेली, थोरली बहीण शिकलेली, मावशी शिकलेली, माझी पुतणी शिकतेय –म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात माझ्याभोवती आहेस . 

सरकारचं घोषवाक्य आहे ‘ मुलगी शिकली, प्रगती झाली !’– 

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली ‘.

आजही वाटतं तुला भारतरत्न मिळायला हवं होतं. मग लक्षात येतं की या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत. जेव्हा कुठल्या महिलेला भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू ज्योतिबांना सांगत असशील ,  ‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला भारतरत्न मिळालं ‘. 

तुझ्याबद्दलचा मुळातच असलेला आदर सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे. 

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार सहन करीत तू तुझं काम करीत राहिलीस, म्हणजे आतून तू किती कणखर असली पाहिजेस–ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी. तसूभरही ढळली नाही . आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ. 

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने काळाच्या मागे जावं. लहान बनून तुमच्या घरात यावं.  ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्यात. तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत. 

मला एक प्रश्न नेहमी पडतो–’आपण करतो आहोत ते काम क्रांतिकारी आहे याची तुला जराशीही कल्पना नव्हती का ? कारण नखभर ही एटीट्यूड नव्हता तुझ्यामध्ये– नखभर सोडा, अणू – रेणू इतका सूक्ष्म पण नाही . 

हे कसं साध्य करायचीस ? नाहीतर आम्ही बघ– वितभर करतो आणि हात भर, त्याचाही  हल्ला, कल्ला करत ती दुखणी सांगत, ते यश सांगत गावभर हिंडतो. 

कदाचित म्हणूनच तू त्यावेळच्या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी म्हणून जी अक्षरं पाटीवर गिरवलीत, ती काळाच्या पाठीवर गिरवली गेलीत. 

आणि या भारतात जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री शिक्षित होत राहील,  तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील 

— पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील. 

लेखक – गजानन घोंगडे

9823087650

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments