मनमंजुषेतून
☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆
मैत्र क्षणांचे लिहून बरेच महिने उलटून गेले असतील. लोकलमध्ये भेटलेल्या काहीजणींच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न. या भेटलेल्या प्रत्येकीमुळे माझ्यात काही ना काही बदल झाला हे नक्की. बावीस वर्षांचा रोज सरासरी साडेतीन तास एवढे माझ्या लोकल प्रवासाचे आयुष्य आहे. आपण अजून जिवंत आहोत ना हे बघायचे असेल तेव्हा मी सरळ उठते आणि लोकलने कुठे तरी जाऊन येते. जाताना गर्दी नसेल अशी वेळ निवडायचे पण येताना अगदी चेंगराचेंगरीत लोकलमध्ये चढायचे. असा प्रवास आणि लोकलमधले वातावरण याने पुढील काही महिने जगण्याची ऊर्जा मिळते. पण करोनाने सर्वसामान्यांसाठी ट्रेनचा प्रवास बंद होता. तेव्हा काही कारणाने रेल्वे स्थानकाच्या आसपास जावे लागले. ती ओकीबोकी स्टेशनं बघून खरच भडभडून आले.
लोकल बंद मग त्यावर अवलंबून असलेल्या फेरीवाल्या कुठे गेल्या असतील हा विचार मनात येत असतानाच डोळ्यांसमोर उमा आली. तिला अगदी ती तीन-चार महिन्यांची असल्यापासून मी ओळखते. एका अंध जोडप्याची मुलगी. ते जोडपे लोकलमध्ये भीक मागायचे. त्या दोघांची प्रेमकहाणी आणि लग्न या सर्वांची मी साक्षीदार होते. पण ते दोघे जरा तिरसट असल्याने इतरांप्रमाणे त्यांच्याशी कधी संवाद व्हायचा नाही. त्यांना मुलगी झाली. मग ती बाई त्या छकुलीला घेऊनच लोकलमध्ये येऊ लागली. फार गोंडस मुलगी होती. सर्व प्रवासी महिलांसाठी अगदी कौतुकाचा विषय होती. तिची आई खूप प्रोटेक्टिव्ह होती. तुमची मुलगी खूप गोड आहे हो असे मी एकदा तिला म्हटलं त्या क्षणी तिने आपल्या मुलीभोवतीची मिठी अजूनच आवळली. उमा नाव ठेवल्याचे थोडे दिवसांनी तिने मला आपणहूनच सांगितले. एक दिवस उमाच्या वडिलांनी विचारले, आमची उमा गोरी आहे का काळी? ‘ छान गोरी आहे. आणि तिचे डोळे खूप बोलके आहेत.’ हे ऐकताच ते दोघेही खूप खूष झाले. उमा मोठी होत होती. दोन वर्षांची असल्यापासून ती आईवडलांना कोणते स्टेशन आले ते सांगू लागली होती. आम्हालाही फार गंमत वाटायची. ती अतिशय हुशार होती. तीन वर्षांची झाल्यावर लोकलमधल्याच प्रवाशांनी आग्रह करून तिला शाळेत घातले. दोन वर्षे नियमित शाळा सुरू होती. तिला भाऊ झाल्यानंतर आईवडलांच्या मदतीसाठी उमाची शाळा सुटली. भाऊ झाल्याचा तिला खूप आनंद झाला होता. गणेश नाव ठेवल्याचे तिने पूर्ण डब्यातल्या बायकांना सांगितले होते. तिच्या वयापेक्षा जास्त मोठी बनून ती आपल्या भावाला सांभाळत होती. सोबत आणलेल्या बाटलीतले दूध नासले नाही ना हेही ती तपासायची. उमा-गणेश लोकलमध्येच मोठे होत होते. उमा पुन्हा शाळेत जाऊ लागली. पण काही महिन्यात शाळा सुटली. नेरूळचे तिचे घर पडले. ते घणसोलीला रहायला गेले. मग शाळा सुटली ती सुटलीच. आईवडलांना तर शाळा हा विषय बिनमहत्त्वाचा होता. पण उमाला शिकायची आवड होती. ती जेवढं शिकली होती, त्याचा ती सारखा सराव करायची. एक दिवस मला म्हणाली, “ मॅडम मला एबीशी शिकवा ना. तिला मी ए टू झेड अक्षरे एका कागदावर लिहून दिली आणि मग गिरवून घेतली. दोन दिवसांनी भेटली तेव्हा तिला अक्षर येऊ लागली होती. मग लोकलवर चिकटवलेल्या जाहिरातीतील अक्षर ओळखण्याचा तिला नादच लागला. तिचे पालक भीक मागत तेव्हा ती दारात शांतपणे बसून असे. एक दिवस रुमाल विकायला आणले. सात-आठच होते पण ती आनंदात होती. मी विचारले कुठून आणले ग. एका ताईने तिच्याकडचे दिले. मला पैसे देणार आहे. एवढं सांगून घाईने निघून गेली. परत भेटली तेव्हा म्हणाली मला सगळे भिकाऱ्याची पोरगी म्हणून चिडवतात. मला आवडत नाही. काही माल विकायचा तर पैसे नाहीत. मग मी असाच माल विकून पैसे जमवणार आणि मी पण वेगवेगळा माल विकणार. त्यावेळी तिचे वय फक्त आठ होते. मला खूप कौतूक वाटले. उमा खूप दिवसांनी भेटली. गणेशला आश्रमशाळेत घालणार असल्याचे सांगितले. तळेगावच्या आश्रमशाळेची माहिती तिला गाडीतल्याच कोणी तरी दिली होती. खूप खूष होती. काही दिवसांनी मी पण शिकायला जाणार, असेही तिने सांगितले. मध्येच एकदा सगळे तळेगावला जाऊन आले. जूनपासून दाखला झाला होता. भावाचे शिक्षण मार्गी लागणार याचा तिला खूप आनंद झाला होता. आपलेही शिक्षण सुरू होईल ही आशा होती. काही दिवस ती गाडीला दिसायची. नंतर ते सर्वचजण गायब झाले. गाडीत येणे बंद झाले. नक्की कुठे गेले कोणत्याच फेरीवाल्यांना माहित नव्हते. गणेशचे शिक्षण सुरू झाले असेल का? उमाच्या स्वप्नाचे काय? या प्रश्नांनी मी अस्वस्थ होते. जरी शिक्षण सुरू झाले असले तरी लॅाकडाऊनमध्ये पुन्हा बंद पडलं असेल. खरंच एक हुषार मुलगी, आपल्या भावावर आईसारखी माया करणारी बहीण, आणि वयापेक्षा जास्त प्रगल्भ असलेली मुलगी परत कधीच बघायला मिळाली नाही. आता एकदा जाऊन उमाला शोधणार आहे हे नक्की.
लेखिका – सुश्री स्वाती महाजन -जोशी
प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈