श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
मनमंजुषेतून
☆ रेडिओ सिलोन…भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
(History: The history of Radio Ceylon dates back to 1925, when its first precursor, Colombo Radio, was launched on 16 December 1925 using a mediumwave radio transmitter of one kilowatt of output power from Welikada, Colombo. Commenced just 3 years after the launch of BBC, Colombo radio was the first radio station in Asia and the second oldest radio station in the world.)
Source: Radio Ceylon – Wikiwand
आमच्या बालपणीचे दिवस म्हणजे १९६५ ते १९७५ चा कालखंड, आजच्या पेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळा. मनोरंजन ही त्याकाळी चैनीची बाब समजली जायची. चित्रपट, नाटके ही साधने उपलब्ध असली तरी त्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी सर्वांचीच नसायची. मग मनोरंजनाचे सहज उपलब्ध साधन म्हणजे काय तर रेडिओ. परिसरात बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या घरात रेडिओ असायचे आणि शेजारच्या चार घरापर्यंत आवाज जाईल येवढ्या मोठ्या आवाजात त्यावरिल कार्यक्रम ऐकले जायचे. आमच्या सारख्यांना त्यातूनच रेडिओचा परिचय झाला. रेडिओ म्हणजे “रेडिओ सिलोन” अशी आमची धारणा होती कारण या व्यतिरिक्त कुणीही रेडिओ वर दुसरे स्टेशन लावत नसे. उपहारगृहात ही रेडीओवर सिलोन हेच स्टेशन सुरू असायचे. “ये सिलोन ब्राडकास्टींग कारपोरेशन का व्यापार विभाग हैं”. हे वाक्य आम्हाला पाठ झाले होते.
अनेकांची सकाळच रेडिओ च्या संगीताने व्हायची. समाचार, भक्तिगीते ऐकत आपआपली कामे लोक करायचे, रेडिओ ऐकण्यामुळे कुणाच्या कामात अडचण येत नसे, सकाळचा ज्येष्ट नागरिकां चा आवडीचा कार्यक्रम म्हणजे ” पुराने फिल्मो का संगीत”. आम्हाला सहगल, तलत मेहमूद, हेमंत कुमार, प्रदीप, सुरैया, शमशाद बेगम, नूरजहाँ. या गायकांचा परिचय याच कार्यक्रमामुळे झाला. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेस “खुश है जमाना आज पहली तारीख है” हे गीत हमखास लावले जायचे. रेडिओ सिलोन च्या लोकप्रियतेचे गमक होते चित्रपट गीते, कारण आल इंडिया रेडिओ वर चित्रपट गीतांचे प्रसारण होत नव्हते, चित्रपट गीतांना विरोध करणारी याचिका सन १९५२ ला कलकत्ता येथील प्रो. चक्रवर्ती यांनी न्यायालयात केली होती त्यामुळे आल इंडिया रेडीओवर सिनेगितांचे प्रसारण होत नव्हते. त्यामुळे रेडिओ सिलोन ची लोकप्रियता वाढली.
त्यावेळी सकाळच्या प्रसारणात सर्वात लोकप्रिय कार्यक्रम असायचा “आप ही के गीत” नवीन चित्रपटांच्या गीतांचा हा कार्यक्रम असायचा, महत्वाचे म्हणजे श्रोत्यांच्या फर्माइश वर गीतांची निवड केली जायची आणि गाण्याच्या प्रसारणा आधी पसंती कळविणाऱ्यांची नावे घेतली जायची. आपले नाव रेडीओवर यावे म्हणून लोक पोस्टकार्ड पाठवायचे. अनेकांना ही सवयच लागली होती. अनेक गावात तर त्यासाठी श्रोता संघ स्थापन झाले होते. भाटापारा, झुमारितलय्या या गावांची नावे त्यावेळी खूप प्रसिद्ध होती या गावातील लोकांची नावे अनेकदा यायची. नवीन चित्रपट येण्यापूर्वीच या कार्यक्रमामुळे गीते लोकप्रिय व्हायची व गीतांमुळे चित्रपट पाहिले जायचे. सिलोन रेडिओ हे व्यापारी तत्त्वावरआधारलेले स्टेशन असल्यामुळे त्यावर अनेकवस्तुंच्या जाहिरातींचे प्रसारणही व्हायचे, काही जाहिराती आजही आठवतात. सॉरीडॉन, बोर्नव्हीटा, एसप्रो, व्हिक्स, टिनोपाल, यातही ‘तन्दुरूस्ती की रक्षा करता है लाइफबॉय… लाइफबॉय है जहां तन्दुरूस्ती है वहां… लाइफबॉय… ही जाहिरात मला आजही पाठ आहे.
क्रमशः…
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈