डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माय…! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
जे झोपेत दिसतं ते स्वप्नं नव्हे, ज्याने झोप येत नाही ते स्वप्नं….
असंच एक स्वप्न पाहिलंय, भिक्षेकऱ्यांना, आणि कष्टकऱ्यांना गावकरी बनवण्याचं….. तुमच्या सर्वांच्या साथीनं …!
भीक मागून सुद्धा पैसे मिळतात…. परंतु त्या पैशाला किंमत नसते आणि मोल सुद्धा….
कमावलेल्या पैशाला, नुसती किंमत नको….. मोल हवं मूल्य हवं ….!
“हात” न हलवता मिळालेल्या पैशाला लगेच “पाय” फुटतात… !”
हा असा मिळालेला पैसा टिकत नाही… !
तर …. एक बाबा आहेत….
त्यांना मंदिराबाहेर भाविकांना गंध लावायचं काम लावून दिलं आहे… भांडवल फक्त दोनशे रुपये सहा महिन्याला….
येणार्या जाणार्या भाविकांना हे बाबा गंध लावतात आणि भाविक लोक यांना पाच / दहा / वीस रुपये दक्षिणा म्हणून देतात…. दिवसाला पाचशे रुपये आता हे बाबा कमावतात… !
समाजातल्या रुढी-परंपरांचा आम्ही अशाप्रकारे माणसांना उभं करण्यासाठी उपयोग करतो आहोत .. !
या सहा दिवसात तीन दिव्यांग लोक भेटले….
यातील एकाला आपण व्हीलचेअर दिली आहे, या व्हीलचेअरवर बसून तो अनेक वस्तूंची विक्री करेल, दुसऱ्याला शिलाई मशिन घेऊन देत आहोत, फाटलेल्या आयुष्याला तो टाके घालेल आणि तिसऱ्याला एक छोटे शॉप घेऊन दिले आहे त्यात तो किराणा माल किंवा तत्सम वस्तू विकेल….
माझा दिव्यांग सहकारी श्री. अमोल शेरेकर यांच्या माध्यमातून समोर आलेले हे तीनही लोक….
मी काही करण्याअगोदर समदुःखी असलेल्या अमोलने या तीनही लोकांसाठी आधीच बरंच काही केलं आहे….
माझा सहकारी श्री मंगेश वाघमारे यानेही या कामी खूप कष्ट घेतले…. दोघेही बाप से बेटे सवाई निकले !
ऋणी आहे दोघांचा …. !!
“बाप” या शब्दावरून आठवलं ….
लहान असताना माझ्या बापाला वाटायचं, पोरानं शाळेत “नाव” “काढावं” …. पण माझ्यासारख्या टारगट पोराला पाहून, शाळेनेच तेव्हा माझं “नाव” पटावरून “काढलं” होतं…!
हा…हा..हा…असो !
(मी लिवलेल्या पुस्तकात आशे लई किस्से हायेत…)
एप्रिल महिन्याच्या एक तारखेपासून ते आत्ता सहा तारखेपर्यंत अनेकांनी आपले हात पाय मोडून घेतलेले आहेत…. हौसेने नाही… दुर्दैवाने…. ! असे सहा गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल केले आहेत…सर्वांची ऑपरेशन्स झालेली आहेत …. ते मस्त आता टुमटुमीत आहेत… खाऊन पिऊन गोल गरगरीत झाले आहेत पोट्टे….
परवा त्यांना गमतीने म्हणालो, ‘ ए बटाट्यानो, कायतरी काम करा बे पोट्टेहो…! काय पडून राहिला बे असे ? ‘
‘ सांगून तर पाह्यना रे डाक्टर… काय बी करू…. तू सांगून तर पहाय ना रे भौ… तुझ्यासाटी कै पण करू ना रे भौ…’
—-हे मान तर देतात…. पण अरे तुरे बोलतात…. पण तरी लय भारी वाटतं ना रे भौ….!
माझे दैवत आदरणीय श्री गाडगे बाबा…. त्यांच्याच भागातली ही वाट चुकलेली पोरं….
त्यांची शपथ घालून, काम करेन पण भीक मागणार नाही असं यांच्याकडून वचन घेतलंय….!
—-“ माझ्यासाठी काही करु नका रे भावांनो….रस्त्याने चालताना नेहमी मागे वळून पहात जा…. कारण मागे वळून न पाहणारे… पुढे कुठेतरी धडपडतात….भविष्यकाळाकडे चालत असताना, भूतकाळाकडे नेहमी लक्ष ठेवावं … म्हणजे आपले अपघात होत नाहीत… “
ते सर्व जण हसले होते…
रस्त्यावर असंच एकदा काम करत असताना याच महिन्यात पाय अक्षरशः कुजलेला एक तरुण माझ्यासमोर आला…. ! रस्त्यावरच याचे ड्रेसिंग करून त्याला ऍडमिट केला आहे…. जाताना रडत मला म्हणाला, ‘ सर, मी मागल्या आयुष्यात काहीतरी वाईट काम केलं असेल …. म्हणून या आयुष्यात मला अशी शिक्षा मिळाली असेल…. ! यातून मी कधीच उभा राहू शकणार नाही असं मला वाटतं…. मी कधीच यशस्वी होणार नाही असं मला वाटतं सर…’
त्याला सहज म्हणालो, ‘ नाही रे मित्रा, कर्माला दोष देऊ नकोस, तू जे केलंस ते तुझ्याकडून कोणीतरी करवून घेतलं आहे आणि लक्षात ठेव “कर्माला” दोष देणारा “कर्ता” कधीच होऊ शकत नाही… ! कोणालाही दोष न देता “कर्म” करत रहा…. आपोआप तू “कर्ता” होशील…. “क्रिया” करणारे “पद” होशील… !’
‘आणि हो मित्रा, तुला जर यशस्वी व्हायचं असेल, तर आधी अयशस्वी लोकांचा तुला अभ्यास करावा लागेल… ते जिथे चुकले त्या चुका तुला टाळाव्या लागतील….!’ विचार करतच तो ऍडमिट झाला…. !
रस्त्यावर अक्षरशः पडलेले एक बाबा…. यांना अवघड जागी गाठ आली होती…. ती जवळपास संत्र्याएवढी झाली… पुन्हा फुटली आणि हे विष संपूर्ण शरीरात पसरले…यांनाही ऍडमिट केले आहे…
देवीपुढे जोगवा मागणाऱ्या एका ताईला, ईदच्या निमित्ताने, मस्जिद पुढे विकण्यासाठी चादरी घेऊन दिल्या आहेत…
म्हटलं ना…. समाजातील रुढी-परंपरांचा उपयोग आम्ही लोकांना उभं करण्यासाठी करत आहोत….!
मला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी आवडते, हे आमच्या एका भीक मागणाऱ्या आजीला माहित आहे…. एके दिवशी तिने मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी घरून तयार करून आणली….मला दिली… मी म्हणालो, ‘ पुढे वाटेत खातो कुठे तरी….’
ती म्हणाली, ‘ न्हायी माझ्यासंगट खा…,’
हात धुऊन मग तिच्याच ताटात बसलो जेवायला…. !
ती दिलखुलासपणे हसली…. ! माझ्याकडं कौतुकानं बघत बाजूच्या आया बायांना म्हणाली, ‘ बग गं कसं खातंय माजं लेकरू मटामटा, किती भुकेजलेलं हाय….’ असं म्हणून तिने चारदा डोक्यावरुन हात फिरवला, पदराने तोंड पुसलं …! मेथीची भाजी – भाकरी खाताना सहज तिच्याकडे पाहिलं…. आणि काय आश्चर्य…. मला तिथंच माजी माय दिसली….!!!
© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈