सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ आला आषाढ – श्रावण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
चैत्र वैशाखात उन्हाळ्याची काहीली होत असताना अचानक एक दिवस आभाळ भरून येते !
ढगांचा कडकडाट आणि विजांचा लखलखाट सुरू होऊन पावसाचे टपोरे थेंब येतात. गारा पडतात. जणू तुटे गारा मोत्यांचा सर… जमिनीवर ओघळून येतो ! वळीव येतो आणि हवेत थोडा गारवा निर्माण होतो. पण पुन्हा हवा गरम होते आणि आता प्रतीक्षा असते ती पावसाची ! असे दोन-चार वादळी पाऊस झाले की मग मात्र त्या ‘ नेमेची येतो मग पावसाळा ‘ ची ओढ लागते. ज्येष्ठ उजाडतो आणि अजून जर पाऊस नसेल तर ‘ पावसा, कधी रे येशील तू?’ असं म्हणत त्याची आराधना केली जाते. आंबे,करवंदे,जांभळे ,फणस हा उन्हाळ्याचा मेवा आता संपत येतो.सात जून उजाडला की साधारणपणे पावसाचे आगमन होते.पण ८/१० दिवस जरी पुढे गेला की लोकांच्या तोंडचे पाणी पळते ! लगेच पाणी नियोजन सुरू होते ! पण निसर्ग माणसाइतका लहरी नसतो. लवकरच पावसाचे आगमन होते. आषाढाचा पाऊस सुरू होतो. वर्षा गाणी ऐकू येऊ लागतात.’ ये रे ये रे पावसा..या बाल गीतापासून मंगेश पाडगावकरांच्या पाऊस गाण्यापर्यंत ! सकाळच्या अधूनमधून पडणाऱ्या सोनसळी उन्हात पावसाचे थेंब हिऱ्याप्रमाणे चमकू लागतात आणि मन कवी बनतं !’ जागून ज्याची वाट पाहिली,ते सुख आले दारी ‘ असे म्हणत आलेल्या गारव्यात मन पावसाचा आनंद घेत रहाते. ‘ रिमझिम पाऊस पडे सारखा…’ म्हणतच ज्येष्ठी पौर्णिमेला पावसात वडाची पूजा करताना सृष्टीच्या बदलत्या रूपाचा आपण आस्वाद घेत असतो. वर्षा सहली निघतात,कांदा भज्यांची आॅर्डर येते.कांदे नवमी साजरी होते.आणि आषाढाचा आनंद दरवळू लागतो. गुरू पौर्णिमा बरेचदा पावसात
भिजतच साजरी होते.आणि निसर्ग हाच गुरू हे मनावर अधिकच ठसते !
आठ पंधरा दिवसातच सृष्टी बालकवींची ‘ श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे..’ ही कविता आठवायला लावते. हिरवा शेला पांघरून श्रावणातील सणांना सामोरी जाण्यासाठी सृष्टी नटून सजून बसते ! पावसाची नक्षत्रे सर्व नक्षत्रात महत्त्वाची आणि चैतन्याला जास्त पोषक असतात. अन्न आणि पाणी दोन्ही गरजा पुरवण्यासाठी पाऊस आवश्यकच असतो, पण अधूनमधून पावसावर चिडायला होते. त्याच्या सतत कोसळण्याने आपले काही बेत पाण्यातून वाहून जातात, पण तो निसर्ग राजा त्याच्याच तालात येत असतो. त्याच्या मनाप्रमाणे तो सगळीकडे बरसत असतो. कुठे पूर तर कुठे दरडी कोसळणे, तर कुठे वाहतूक खोळंबणे असे चालूच असते, पण तरीही पाऊस आपल्याला हवासा वाटतो. बघता बघता श्रावण येतो. आणि हसरा श्रावण सणांची माला घेऊन येतो .’ रिमझिम पाऊस पडे सारखा ‘…’असा पडणारा पाऊस श्रावणामध्ये ‘ श्रावणात घन निळा बरस ना ‘ असे गाणे गात येतो. प्रेमिकांचा आवडता श्रावण, कवी लोकांचा आवडता श्रावण, उत्सवप्रेमींचा आवडता श्रावण, सणासुदीचे दिवस असलेला श्रावण गाणी गात गात येतो !’ घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ‘…’ हे आषाढाचं गाणं आता श्रावणात बदलतं– कधी ऊन तर कधी पाऊस असं निसर्गाचे मनमोहक रूप दिसू लागते. सुखाची,आनंदाची सोनपावलं उमटवत श्रावण बरसत असतो. सगळीकडे सस्यशामल भूमी डोळ्यांना आनंद देत असते. बघता बघता नारळी पौर्णिमा येते. पाऊस थोडा कमी होऊ लागतो.. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण येतो. कोळी लोक समुद्रावर मासेमारीसाठी जाण्यास सुरुवात होते. सभोवतालचे वातावरण हिरवेगार, नयनरम्य होते. मग ओढ लागते ती भाद्रपदाची ! श्रावणाला निरोप देता देता गणपती बाप्पाची चाहूल लागते. पावसाचा जोर कमी होऊ लागतो. सगळीकडे आनंदीआनंद पसरू लागतो…..
…. पण तो मनात मुरलेला, भिजलेला श्रावण अजूनही आपल्याला खुणावत असतो. त्याचे ते लोभस रूप पुन्हा पुन्हा दरवर्षी आपण नव्या नव्हाळीने अनुभवतो. .’अस्सा श्रावण सुरेख बाई ‘…. .अनुभवतो…आणि मंगळागौरीच्या फेरासारखा तो मनात घुमत रहातो…
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈