??

☆ श्रावणसरी ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

वालचंदनगर म्हटलं की बालपणीच्या आठवणी जागवतात. बालपणीचा पाऊस तर मनाला चिंब भिजवतो…. आपलं बालपण जपत..!आखिव -रेखीव असं हे निमशहरी गाव. माझं बालपण ,शालेय शिक्षण इथेच झालं. आमची शाळा घरापासून बरीच लांब. पावसाळ्यात छत्री असे पण ,कधी मुद्दाम विसरलेली ,पावसात चिंब भिजण्यासाठी.! पावसाळ्यात बऱ्याच वेळा शाळेला सुट्टीच असायची. नीरा नदीला पूरही येत असे. तो पहायला जाण्यात एक वेगळच थ्रिल असायचं. पाण्याच्या उंचच उंच लाटा, नदीवरचा मोठा पूल पाण्याखाली बुडालेला, हे सगळं पाहताना सारंच तेव्हा आश्चर्यजनक वाटायचं. पावसानं थोडी विश्रांती घेतली की सुट्टीच्या दिवशी शेजारपाजारचे सगळे मिळून नदीकाठच्या देवीला दर्शनासाठी जायचं. तेव्हा एकच बैलगाडी करायची त्यात जेवणाचे डबे अन चिल्लीपिल्ली कंपनी असायची . देवीचे दर्शन घेऊन जेवणाची पंगत बसायची .घारग्या, मटकीची उसळ ,तिखट मिठाच्या पुऱ्या,  शेंगदाण्याची चटणी , तांदळाची खिचडी आणि दही या मस्त बेताची छान अंगत पंगत व्हायची. जेवणानंतर नदीकिनारी एक फेरफटका व्हायचा नंतर मुलांची पतंगांची काटाकाटी नदीकाठी चालायची. पुरुष मंडळी ही त्यात सहभागी व्हायची. नाहीतर पत्त्यांचा डाव रंगायचा .बायका आणि मुली देवीची,पंचमीची गाणी म्हणायच्या. आम्ही मुली आणि मुलं पावसाची गाणी, कविता म्हणायचो. खूप मजा यायची .त्यातच एखादी श्रावण सर आली की इंद्रधनुष्य फार सुरेख दिसायचं. मग श्रावणसर अंगावर घेतच घाईघाईनेच घराकडे प्रयाण. खरंच श्रावणातलं पर्जन्यरूप किती सुंदर आणि वेगळच ..! जाई जुईचे झेले हातात घेऊन सुवास घ्यावा असे.. ऊन पावसाचा लपंडाव खेळणारा हा श्रावण..

त्यावेळी अगदी घरोघरी श्री सत्यनारायण ,जिवतीची पूजा असे. मंगळागौर तर नव्या नवरीला उत्सवच वाटायचा . सकाळी सकाळी फुलं ,पत्री, दुर्वा ,आघाडा,गोळा करायला जायचं .कुणाच्या दारातल्या फुलांवर डल्ला मारायचा.  कुणी मनानेच हौसेने फुलं द्यायचेही .त्याचा आनंद आजच्या फुलपुडीत कुठला?

श्रावण म्हटलं की आठवतो दारातल्या निंबाच्या झाडाला दादांनी बांधलेला दोरांचा झोका ..मैत्रिणींबरोबर घेतलेले उंचच उंच झोके ,मंगळागौरीचे खेळ, नागपंचमीची फेर धरून म्हटलेली गाणी,माईच्या हातची पुरणाची दिंड, नारळी पौर्णिमा- राखी पौर्णिमा, भावांना बांधलेली राखी ,गोकुळाष्टमीचे किर्तन. ..!

लग्नानंतर दौंडला आम्ही बंगल्यासमोर छान बाग जोपासली. आता सगळ्याच आठवणीत रंगताना दारातली बागच नजरेसमोर उभी राहिलीय…. कंपाऊंडच्या भिंतीलगत अबोली ,कर्दळीचे विविध प्रकारचे ताटवे ,प्राजक्ताचा सडा, टपोऱ्या विविधरंगी गुलाबांची झाडं, जाई- जुईचे फुलांनी डवरलेला वेल, वाऱ्यावर डोलणारा कृष्णकमळाचा वेल अन् फुलं, वृंदावनातील तुळशीच्या पानाफुलांचा सुगंधी दरवळ, दारातील झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर मैत्रिणींबरोबर झुलणारी माझी फुलराणी झालेली फुलवेडी लेक..!

– आता किती काळ गेला आयुष्य॔ बदललं .आताही श्रावण येतो, ऊन पावसाचा खेळ खेळतो .आणि मनांतला श्रावण मनांत पिंगा घालतो. मग…. आठवांच्या सरीवर सरी डोळ्यांतल्या श्रावणसरींबरोबर अलगद बरसू लागतात. …!

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments