सौ. उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
📓 शब्द व्हावे सारथी… भाग-2 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(दिलीपने माझी ३१ पुस्तके दहा-बारा वर्षांत काढली. १२४ पुस्तकांची आई आहे. अजूनही लिहितेच आहे..) इथून पुढे —-
मी ‘गोदरेज’ मध्ये विज्ञानाची शिक्षिका होते तेव्हा माझी पुस्तके येऊ लागली होती. माझ्या ‘मेनका’ मधील कादंबरीतले काही वर्णन थोडे प्रक्षोभक होते. तेवढाच भाग अधोरेखित करून एका शिक्षिकेने डॉ. डी.डी. पंडय़ा या आमच्या मुख्याध्यापकांना दाखवला. ‘‘शोभते का हे उघडेवाघडे लिहिणे एका शिक्षिकेला?’’ त्यांनी पूर्ण कादंबरी वाचायला मागितली. ‘‘रेफरन्ससकट वाचल्यास त्यात अशोभनीय काही नाही.’’ त्यांनी क्लीन चिट दिली. माझे पुस्तक मी जय गोदरेज या संचालिका मॅडमना नियमित देत असल्याने आणि शाळेच्या वेळात ‘लेखन’ करीत नसल्याने एरवी अनवस्था प्रसंग ओढवला नाही.
सासूबाईंनी मला शिकू दिले, पण प्रथम सासऱ्यांचा नकार होता. बीएडला फीचे पैसे देईनात. ‘‘तुझ्या आईने दिलेली चांदीची भांडी मोड नि भर पैसे. त्यावर म्हाताऱ्याचा हक्क नाही.’’ त्या म्हणाल्या. मी ‘आज्ञापालन’ केले, पण बीएडला मला कॉलेजात प्रथम क्रमांक, लायब्ररी अॅवॉर्ड, टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती, बेस्ट स्टुडंट अॅवॉर्ड, विद्यापीठात मानांकन मिळाले नि सासरे म्हणाले, ‘‘आता माझा विरोध संपला.’’ तरी ते नेहमी म्हणत, ‘‘आमच्या घरात साध्या बायका नाहीत. एक अडाणी नि दुसरी दीड शहाणी.’’ माझे सासरे जुने बीकॉम होते. तैलबुद्धीचे होते.
‘गोदरेज’मध्ये सत्तावीस वर्षे मी इमानेइतबारे नोकरी केली. एम.ए., पीएच.डी.ला अत्युच्च गुण आणि गुणांकन असल्याने सर्व मराठी शिक्षकांना डावलून मला मराठी विभागाचे प्रमुखपद दिले गेले, मी विज्ञानाची शिक्षिका असूनही. नवल गोदरेज यांनी मला मुलाखतीत पहिला प्रश्न विचारला, ‘‘हू आर युवर एनिमिज?’’
‘‘एकही नाही.’’
‘‘का बरे?’’
‘‘मला स्नेहाची नजर आहे.’’
‘‘तर मग मी तुला निवडतो; पण बाळ, तुझ्या सीनियर्सना कधी दुखावू नको. प्रेमाने जिंक. अवघड वळण आहे.’’ केवढा त्या उद्योगपतींचा दूरदर्शीपणा!
पुढे एक दिवस पोदार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका १९९९ मध्ये मला एका ‘पालकसभे’साठी बोलवायला आल्या. मी रीतसर परवानगी घेऊन गेले. ते माझे ‘सुसंवादन’ इतके आवडले पोदारांना की रात्री मला फोन आला. ‘‘मी गणेश पोदार बोलत आहे. मी तुला माझ्या शाळेत प्राचार्य म्हणून बोलावतोय. शाळा- ज्युनिअर कॉलेज देतो ताब्यात. ये, निकाल ‘वर’ काढ. बस्. आज आहे त्यापेक्षा तीन हजार अधिक पगार, गाडी, ड्रायव्हर, केबिन.. सारा थाट! ये फक्त.’’
आणि मी ‘पोदार’ची प्राचार्य झाले. माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण. ज्यासाठी मी वाट बघितली होती नि बाप्पाने मला ते अलगद हाती दिले होते. गणेश पोदारांची मी फार लाडकी होते. अतूट विश्वास! एक दिवस आपली विशेष कागदपत्रे ज्या पेटीत आहेत त्याच्या चाव्या त्यांनी माझ्या हाती सोपवल्या. ‘‘जप.’’ श्रीमती सरोज पोदार नि गणेश पोदार यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला पात्र होण्याचा मी अतोनात प्रयत्न केला. शाळेचा निकाल उंचावला. सर खूश होते; पण शिक्षकांना कामाची सवय लागेपर्यंत वेळ गेला. नाराजी सोसली मी त्यांची; पण उंचावलेला निकाल माझ्या निवृत्तीनंतरही त्यांनी जिद्दीने कायम ठेवला. मी कृतज्ञ आहे. त्यांचे चिरंजीव पवन पोदार माझी कष्टाळू जीवनपद्धती बारकाईने बघत होते. निवृत्तीनंतर त्यांनी मला ‘प्रेसिडेंट वूमन कॅपिटल’ हे फार महत्त्वाचे पद बहाल केले. मजवर प्रेम, अधिकार, स्वातंत्र्य यांचा वर्षांव केला नि मीही ‘पोदार विद्या संकुल’साठी माझी जान ओतली.
२००५. ऑक्टोबर महिना. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला सकाळी नऊला दहा मिनिटांसाठी परिचयपत्रासह भेटायला बोलाविले. कशासाठी? काय हो कल्पना! मी गेले ‘वर्षां’वर.
‘‘भाषाशुद्धीचे तुमचे विविध प्रयोग मी नुकतेच विविध वृत्तपत्रांतून वाचले. मला ते भावले. विश्वकोशाचे अध्यक्षपद एक स्त्रीला मला द्यायचे आहे. काम अडून-पडून आहे. शास्त्रीबुवांचा प्रकल्प झटून काम करून पूर्ण करू शकाल?’’
‘‘विचार करून, माहिती काढून उत्तर दिल्यास चालेल?’’
‘‘अवधी?’’
‘‘आठ दिवस.’’
‘‘दिला.’’
मी तेव्हा ‘बालभारती’चे इयत्ता पाचवीचे पुस्तक करीत होते. श्रीमंत होनराव हे वाईचे चित्रकार मजसोबत होते. विश्वकोशाची त्यांना बारकाईने माहिती होती. त्यांनी मला सांगितली.
मला आठवडय़ाने परत दहा मिनिटे मिळाली.
‘‘सर, तिथली मानव्य विभाग, विज्ञान विभाग यांची मुख्य पदे रिक्त आहेत. प्रमुख संपादक एकटय़ाने काय करणार?’’
‘‘ती मी भरली असे समजा.’’
‘‘मग मी पद घेते. तुमच्या विश्वासास पात्र ठरेन, झटून काम करेन.’’
‘‘गुड.’’
संपली मुलाखत. मग काहीच घडले नाही. माझी नेमणूक झाल्याचे मला वर्तमानपत्रांतूनच समजले अन् इतके दिवस लेखिका, मुख्याध्यापिका, मानव संसाधन विभागाची अध्यक्षा म्हणून मिळालेल्या लौकिकावर टीकास्त्राने काळा बोळा फिरला.
क्रमशः…
लेखिका – डॉ. विजया वाड
संग्राहिका – सौ. उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈