सुश्री प्रभा हर्षे

??

☆ मी…???… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

मी— १ मुलगी, १ बहिण, १ मैत्रीण, १ पत्नी, १ सून, १ जाऊ, १ नणंद, १ आई, १ सासू , १ आजी, १ पणजी,….

सर्व काही झाले… पण “ मी “ चं व्हायचं राहून गेलं… आयुष्य संपत आलं… अन् आता वाटतयं स्वतःसाठी जगायचंच राहिलं। 

कळत नव्हतं तोपर्यंत आईने आजीने नटवलं… नंतर दादा अन् बाबांनी बंधन घातलं… वयात आल्यावर माझ्या प्रत्येक गोष्टींचे अर्थ निघू लागले… अन् नकळत माझे चारित्र्यच चर्चेत यायला लागले… माझ्या फिरण्या वागण्या बोलण्या हसण्या वर सोईस्कररित्या बंधन आले… एका मित्राची मैत्रीण होतानाही समाजाने आडवे घातले… 

अन् आता काय शिक्षण झाले म्हणून काका बाबा स्थळ बघायला लागले…नोकरीचा प्रश्न मांडायला गेले तर म्हणे नोकरी आता कशी करणार …सासरच्यांना विचारुनच करावी लागणार… बाजारात वस्तू दाखविल्याप्रमाणे १० वेळा माझाही दाखविण्याचा कार्यक्रम झाला … प्रश्नांचं भांडार अन् अपेक्षांचा ढीग माझ्यासमोर आला… त्याचा हसत हसत स्वीकारही केला -साथीदाराकडे बघून… नंतर त्याचे फोन, त्याची मर्जी सुरु झाली… मी स्वत्व अर्पण केल्यावर त्यानेही मला खूप आश्वासने दिली… नकळत मी एका ‘ संसार ‘ नावाच्या नव्या विश्वात ढकलले गेले …

अन् पुढचे आयुष्य जणू मृगजळच झाले … घर नवरा सासू सासरे यांच्यात गुंतले… छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत म्हणून बोलणे टोमणेही ऐकले… माहेरी नाही सांगितले, वाईट वाटेल म्हणून… हसतमुख राहिले नेहमी दुःख लपवून…अन् अचानक माझ्यावर कोडकौतुकाचा वर्षाव झाला सुरू… कारण माझ्यामुळे येणार होतं घरात एक लेकरु… मुलगा की मुलगी चर्चा झाली सुरू… अन् खरचं मलाही कळत नव्हते काय काय करु… विस्कटलेल्या मनाने पुन्हा एकदा उभारी घेतली…

अन् कोमेजलेल्या फांदीला पुन्हा नवी पालवी फुटली… नऊ महिने सरले… अन् त्या निष्पाप जिवाकडे बघून मी भरुन पावले… आई असे नवे नाव मला मिळाले… त्या छोटयाश्या नावासोबतच खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आली… आनंद मानत राहिले नेहमी मुलांच्या आनंदात… वेगळीच धांदल उडू लागली माझी घर सांभाळण्यात … 

आतापर्यंत साठवलेल्या स्वप्नांना गच्च गाठ मारली… अन् मुलांसाठी पै पै साठवली… शिक्षण झाले भरपूर,  तशी नोकरीही मिळाली दोन्ही मुलांना… आई वडिलांसह सोडून गेले देशाला… मधून मधून येत होते. भेटी गाठी घेत होते. … लग्न तुम्ही जमवा म्हणाले तेच काय कमी होते? … लग्न झाले दोघांचे तशी सासूही झाले… मुलांपेक्षा जास्त आता नातवांची वाट पाहत राहिले … उतारवयात आता त्यांच्याच आधार वाटू लागला … अन् दुधात साखर म्हणजे एक नातू  माझा भारतात सेटल झाला… पुन्हा एकदा मन माझे त्याच्यात रमले… आता त्याचे लग्न झाले … नातसुनेचे पाऊल घराला लागले … मन आनंदाने भरुन गेले… अन् कवळी बसवलेल्या बोळक्याला हसू आले…

अपेक्षांचा आलेख उंचावत होता… अन् मला पणतीचा चेहरा पहायचा होता … तीही इच्छा माझी पूर्ण झाली… घरात एक  गोंडस पणती आली… पुन्हा ए कदा मीही तिच्यासोबत बालपणात गेले…

अन् आता मात्र सर्वजण वाट पाहू लागले … माझ्या मरणाची… तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी मनात घर केलं…

अन् सगळं काही झालं असताना उगाच काही तरी बाकी असल्यासारखं वाटू लागलं…संपूर्ण आयुष्याचा आढावा मी घेतला आणि लक्षात आले की… ‘मी’ व्हायचंच  राहून गेलं … सर्वांची लाडकी झाले, पण स्वतःची झालेच नाही कधी …नेहमी दुसऱ्यांचा विचार केला– स्वतःच्याही  आधी…हे सर्व लक्षात यायला ९० वर्षांचा काळ लोटला होता …

पण आता मात्र माझ्या मनाने ठाम निर्णय घेतला होता… कपाट उघडून माझ्या आवडीचा स्लिवलेस ड्रेस घातला… मस्त मेकअप करुन तयार झाले मनसोक्त फिरायला … कुठे जायचयं असं काहीच ठरलं नव्हतं …देवाला मात्र सारं काही ठाऊक होतं … त्यानेही मस्त गेम खेळला माझ्याशी … पर्स घेऊन बाहेर आले तर यमराज उभा होता दाराशी … !!

— असे होण्याआधीच जीवनाचा खरा आनंद घ्या, स्वतःला देखील वेळ द्या, आणि आपणच आपले लाड करा.

 “ मी “ ला ओळखा.

लेखक : अनामिक

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments