डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ फसवणूक…. ??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
एक आजी ….वय वर्षे असावे कदाचित 90 वर्षे….
कुत्री मांजरं …. जनावरं असली तरी एकमेकांना ती चाटतात प्रेमाने…. पण काही घरांमध्ये म्हाताऱ्या…. आजारी…. आपल्या लोकांचा हात हातात घेणे “Below Dignity” समजतात….
खुरटलेलं झाड असेल तरी ते आपल्या निष्प्राण फांदीला धरून ठेवतं मरेपर्यंत….
डुक्कर गटारात लोळतं असेलही…. परंतु आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन रस्त्याने दिमाखात फिरत असतं… त्याला जणू हेच दाखवायचं असतं डुक्कर असलो, तरी आम्ही आई बापाला सांभाळतो !
जनावरं जिथं आपल्या आई बापाला सांभाळून प्रेम करतात…. तिथं माणसाचा जन्म मिळालेली काही मंडळी आपल्या आई बापाला विसरून जातात….
अशीच ही एका सुखवस्तू घरातली आजी….
पायताण जुनं किंवा खराब झालं तर फेकून देतात…. तिच्यापासून आपल्याला काहीच फायदा नसतो….
अशीच मुलाबाळांनी फायदा असेपर्यंत वापरून…. जीर्ण झालेली एक आजी उकिरड्यावर फेकून दिली…. पायताण समजून….!
रस्त्यावर ही आजी मला भेटली तेव्हा म्हणाली, “ मला काहीच दिसत नाही रे बाबा….”
तिच्या डोळ्यावर चष्मा होता…. मी तो चष्मा हातात घेऊन नीट पाहिला, त्याला दोन्ही काचा नव्हत्या….
ती फक्त फ्रेम घालत होती….
मी तिला म्हणालो, “ म्हातारे चष्म्याला काचच नाही, दिसंल कसं तुला ? “
ती हसत म्हणाली, ‘आस्सा होय मला वाटलं… माझे डोळे कामातनं गेलेत … आत्ता कळलं माझे डोळे चांगले आहेत….चष्मा खराब झालाय… “
वाईटातून ही चांगलं शोधणारी ही आजी….
मी म्हणालो, “ चल डोळे तपासून चष्मा करून देतो…”
ती म्हणाली, “नको …. चष्मा दिलास तरी आता कोणाला बघू बाबा …? “
तरीही हट्टाने मी तिला मोटरसायकलवर बसवलं…. मोटर सायकल वर लहान मुलीला “पप्पा” जसा कमरेभोवती विळखा घालून बसायला सांगतो, त्याप्रमाणे मी तिला माझ्या कमरेला विळखा घालून मोटर सायकलवर बसायला सांगितलं…. फार मोठ्या मुश्किलीने ती बसली….
डोळे तपासून आलो…. चष्मा करायला टाकला….!
चष्मा तयार झाल्यानंतर मी तो तिच्या डोळ्यावर अडकवला….
चष्मा घालून तिने इकडे तिकडे टकामका पाहिलं….
तिला दिसायला लागलं होतं…. ती हरखली….
तिने बोचकयातून एक पिशवी काढली…. त्या पिशवीतून तिने बरीचशी चिल्लर काढली….
मला तिने पैसे मोजायला सांगितले. मी सगळी चिल्लर मोजली. एकूण रुपये 192 होते….
मला काही कळेना…. मी शून्य नजरेने तिच्याकडे पहात विचारलं….. “ हे काय ? “
ती म्हणाली, “ मागल्या महिन्यात नातवाचा वाढदिवस होता, त्याला काहीतरी घ्यायचं म्हणून पैसे साठवत होते… किती पैसे साठले ते मला माहित नाही…. तू मोज… आता नातू तर येणार नाही…. पण हे सगळे पैसे तू घे..”
मी म्हणालो, “अगं आज ना उद्या येईल ना नातू तुझा… मला नको देऊस हे पैसे…! “
डोळ्याला पदर लावून ती म्हणाली, “ हो मी पण हाच विचार करते आहे गेल्या दहा वर्षापासून ….. येईल माझा नातू कधीतरी…. जो दहा वर्ष आला नाही तो आता इथून पुढे काय येणार ?”– ती डोळ्याला पदर लावून रडत म्हणाली….
“आता तूच माझा पोरगा आणि नातू आहेस आता हे सगळे पैसे तू घेऊन जा….”
हे पैसे ती गेले चार महिने साठवीत होती…. नातू येईल या आशेवर….. पण….. नातू आलाच नाही…
यानंतर मी माझ्याकडच्या पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि आजीच्या हातावर टेकवत म्हणालो, “ आयला म्हातारे, तुला सांगायलाच विसरलो बघ. पण तुझा नातू मला मागच्या महिन्यात भेटून गेला आणि म्हणाला….” माझ्या आजीला हे एक हजार रुपये द्या…. मला तिची खूप आठवण येते…. पण मी तिला भेटू शकत नाही…. मला ती खूप आवडते आणि मला तिची खूप आठवण येते हा निरोप तिला नक्की द्या …..”
आजीने या पाचशेच्या दोन्ही नोटा घेतल्या आणि चिल्लर सुद्धा…. आणि कपाळाला लावून ती रडायला लागली….. मी म्हणालो, “ आता रडतेस कशाला म्हातारे ? नातवाने तुला गिफ्ट दिलंय ना ? आता तरी तू आनंदी रहा की…. पुढे कधीतरी येऊन भेटणारच आहे असं मला म्हणाला तो…. “
आजीने रडतच हात जोडले आणि मला खूण करून जवळ बोलावले….
आणि कानात म्हणाली, “ सगळ्या जगाने फसवलं मला….. आता तू सुद्धा फसवलंस….माझा नातू मरून दहा वर्षे झाली आहेत डाक्टर … !”
अंगावर आलेले ते शहारे मी अजूनही घेऊन फिरतो आहे अश्वत्थाम्यासारखे….. !!!
(यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझा एके ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार झाला…. सर्व वातावरण प्रसन्न आणि भारावलेले होते…. पण माझ्या डोक्यातून सकाळचा प्रसंग जात नव्हता…..
माझं भाषण आटोपून मी माझ्या खुर्चीत बसलो आणि मला मिळालेल्या श्रीफळाकडे सहज पाहिलं, मला तोही हिरमुसल्या सारखा वाटला…! निर्जीव गोष्टींना भावना असतात मग सजीवांना का असू नयेत… ??? )
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈