? मनमंजुषेतून ?

☆  मोदक… लेखिका – सुश्री शुभदा पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

30 रुपयाला एक मोदक? काय मोदकात सोनं वगैरे घालतात की काय? काय ही लूट? तीस रुपयाला अख्खा नारळ मिळतो, त्यात अकरा मोदक सहज बनतात. अशा विचारांची आमची पिढी. नारळाची किंमत तीस रुपये असली तरी बाकीचे पैसे कौशल्याचे आहेत. मोदक बनवणं येऱ्या गबाळ्याचं काम नाही.

श्रावण महिन्यात खाण्यापिण्याची चंगळ असायची.  त्यांचा मुकुटमणी म्हणजे मोदक. श्रावण अखेरीस माळ्यावरून मोदकपात्र काढलं जायचं. हे वजनदार तांब्याचं. मग चिंचेने घासून मस्त लखलखित करायचं. त्या महिन्याच्या वाण्याच्या यादीत आंबेमोहर (जुना) तांदूळ असायचा. हा जुनाच असला पाहिजे, नाहीतर मोदक फसणार. गणेश चतुर्थीच्या आधी चार दिवस हे तांदूळ धुवून आजोबांच्या मऊसुत धोतरावर वाळत पडणार. फक्त आजीच त्यांच्यावरून अधून मधून हात फिरवणार. बाकी कोणी तिकडे जायचं नाही. गिरणीत दळायला द्यायचे; तर  कोणत्या तरी इतर धान्याचे पीठ त्यात मिसळेल म्हणून ते घरीच दळायचे .

जातं धुवा, त्याचा खुंटा शोधा, पीठ गोळा करायची झाडणी शोधा, असा सगळा सरंजाम पूर्ण झाला की आई ते तांदूळ दळणार. आम्ही खरंतर जातं ओढायला मदत करायला उत्सुक असायचो पण तिथे धसमुसळेपणा चालत नाही. विशिष्ट लईत जातं ओढलं तरच तांदळाची पिठी हवी तशी बारीक पडते. चला मोदकासाठी तांदळाची पिठी तयार झाली.

तेव्हा फ्रीज नव्हते त्यामुळे आदल्या दिवशी अर्धी तयारी वगैरे प्रकार नाही. आम्ही अंथरुणात असतानाच नारळ फोडण्याचे आवाज ऐकायला यायचे. हे काम पुरुषांचं .दहा नारळ फोडले तरी खोबरं सहा-सात नारळाचंच पडायचं. कारण ते पांढराशुभ्र असलं पाहिजे, बाकी करवंटी जवळचं खोबरं इतर कामासाठी. आजीच सोवळ्याने चून बनवणार. चून म्हणजे गूळ खोबऱ्याचं सारण. सारण कडक झालं तर मोदक फाटतो .सारण पातळ झालं तर मोदकातून गुळाचा पाक गळतो. त्यामुळे चून जमणं महत्त्वाचं. झोपेत असताना घरभर या चुनाचा सुगंध दरवळायचा. शेवटी त्यात वेलची टाकली की सोने पे सुहागा. खरोखरच जमून आलेलं सारण सोन्याच्या रंगाचे दिसतं. 

या वेळेपर्यंत तीन-चार काकवांच्या (काकूचं अनेक वचन) आंघोळी आटपलेल्या असतात . आजीकडून मोदकाची उकड होईपर्यंत त्या पाटावर बसून युद्धाला सज्ज होतात. आजीची  गादी यांना नंतर चालवायची असते. कशी करते सासू? मोदकाची उकड बघताना यांच्या तोंडाचे पट्टे चालू असतात. ” गेल्यावर्षीचे मोदक छान झाले होते. आता यावर्षीचे कसे होतात बाई देव जाणे वगैरे.” उकळत्या पाण्याच्या आधणात आजी रवाळ तूप सोडते. आता हा वेगळा सुगंध. थोडं मीठ. पाणी चांगलं खळखळ नाचायला लागलं की अधीरतेने तांदळाची पिठी यात उडी घेते .आता एकदम ताकदीने आणि लगबगीने पुढचं काम. वेगाने ढवळण्याचं. हुश्श्श झालं एकदाचं. ही उकड चांगली जमली की अर्ध काम फत्ते. या क्षणी सगळे आवाज बंद झालेले असतात. वारा वाहायचा थांबतो. संपूर्ण जगच ‘स्टॅच्यू’ अवस्थेत. फक्त उकड- बस्स. आजीच्या चेहऱ्यावर विजय स्मित. सगळ्या काकवांचे जीव भांड्यात. पाच मिनिटाचं मौन सुटतं .

परातीत उकड मळण्याचं काम मोठ्या काकूकडे. काही चुकार पीठ तसंच राहिलेलं असतं. जड, पितळी तांब्याने त्यांना दटावावं लागतं. गरम असतानाच हे करायचं नाही तर  एकदा का थंड झालं की त्यात लवचिकता आणता येत नाही. काकू हे काम मस्त करते. घरातल्या मोठ्या मुली उत्सुकतेने बघत असतात. निरीक्षण चालू असतं.

मग आजी किती आकाराचा उकडीचा गोळा घ्यायचा. त्यात किती सारण भरायचं ते ठरवून देते .उकडीच्या गोळ्याला वाटीचा आकार देणे कौशल्याचं काम आहे. बघणाऱ्यांना तर सोपं वाटतं पण करायला गेलं तर कठीण. वाटी न बनता ताटली बनते. कडा फाटतात. पाकळ्या चिकटत नाहीत. जेमतेम पाच नाहीतर सात  पाकळ्यातच मोदक संपतो. असं काहीसं होतं. हे प्रकरण जमलं तर जमलं नाही तर अंत पाहतं. काहीजण वाटी बनवताना तेल तर काहीजण पीठ वापरतात .हळूहळू या सर्वांना एकत्र करायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं की मोदक झाला तयार.

जिला मोदक जमतात ती  कितीतरी वेळ  स्वतःचीच पाठ  थोपटून घेते. मोदक पातळ कळीदार देखणा झाला पाहिजे. दिसायला पांढराशुभ्र तरी पारदर्शक. आतलं सोनेरी सारण दिसलं पाहिजे. खायला मऊ लुसलुशीत .ही सगळी कमाल असते हस्तकौशल्याची. पुरुष हे काम करू शकत नाहीत कारण यासाठी पाहिजेत नाजूक बोटं.

आता मोदकपात्रात चाळणीवर ठेवायची हळदीची पानं . त्यावर ठेवायचे भरलेले मोदक आणि पंधरा मिनिटे उकडायचे. घरभर आंबेमोहोराचा, गुळ खोबरं वेलचीचा, हळदीच्या पानांचा सुगंध पसरतो. मखरातला गणपती पण काही क्षणासाठी चलबिचल होतो. कधी कधी त्याच दिवशी हरतालिका असते आणि मोदक करणाऱ्या बायकांना फक्त या सुगंधावरच समाधान मानावं लागतं. सगळे मोदक होत आले, आता आरतीला हरकत नाही असा आदेश यायची खोटी, भराभरा आवेशात आरत्या सुरू होतात. प्रकरण हातघाईवर येतं. तयार होणारे मोदक आणि आरती यांची जणू स्पर्धाच. 

नैवेद्य दाखवला जातो, पानं घेतली जातात. पानात गरम गरम वाफाळते , सारणाने गच्च भरलेले मऊ मऊ मोदक वाढले जातात. ते फोडून त्यावर रवाळ सुगंधी तूप. आहाहा, सगळे श्रम सार्थकी लागतात.

देवा तुझ्यामुळे आम्हाला असे मोदक खायला मिळतात. त्यासाठीच तर जगतो आपण. करणारे आणि खाणारे दोघेही तृप्त. आता एका नारळाचे, एक वाटी पिठाचे मोदक चिक्कार होतात. कोणाचं डायटिंग, कोणाचा डायबिटीस, कोणाचं पित्त चाळवतं, कोणाची नावड (यांना चायनीज डपलिंग, मोमो चालतात) त्यामुळे त्यातलेही दोन उरतात. पुढच्या वर्षी विकतचे आणू असं ठरवलं जातं.

माझी या मोदक प्रकरणातून सुटका झाली कारण सासरी सगळ्यांना तळणीचे मोदक चालतात- नव्हे आवडतात. ते एकदमच सोपे.  मी साध्या पोळीच्या कणकेचेच करते. कसे माहित नाही ते दुसऱ्या दिवसापर्यंत खुसखुशीत आवरणाचे राहतात. चिवट होत नाहीत की मऊ पडत नाहीत. पुरी लाटायची डाव्या हाताच्या पाचही बोटांच्या खळग्यात पकडायची, त्यात चमच्याने सारण भरायचं, पाचही बोट जवळ आणायची. झाला मोदक तयार . (धन्य ती सून, धन्य ते सासर .नशीबानेच असं सासर मिळतं)

मोदकाचेही आता प्रकार आलेत. खवा मोदक ,आंबा मोदक, ड्रायफ्रूट मोदक, रवा मोदक, पेढा मोदक, चॉकलेट मोदक,गुलकंद मोदक, इत्यादी. त्यातला सर्वात भन्नाट प्रकार म्हणजे ‘चिंगम’ मोदक .कोणावर सूड उगवायचा असेल तर त्यांच्याकडे हे ‘चिंगम’ मोदक न्यावेत.

मोदक  कसलेही असले तरी मोदकाची चव फक्त गणेशोत्सवातच. पुरणपोळी, खीर, गुलाबजाम,जिलबी जशी कोणत्याही सणाला चालतात, तसं मोदकांचं नाही. कोणी पाडव्याला किंवा होळीला मोदक करणार नाहीत आणि केलेच तरी त्याची चवही लागणार नाही. गणपती आणि मोदक  यांचे काही खास लागेबंधे आहेत हे नक्की.

लेखिका – सुश्री शुभदा पाटकर

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments