डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
नुकत्याच भिकेच्या डोहातून बाहेर काढलेल्या एका आजीचं आता कसं करावं ? काय करावं ? हा विचार डोक्यात सुरू होता… ! अशातच वाढदिवसानिमित्त गौरी धुमाळ या ताईंचा मला शुभेच्छा देण्यासाठी फोन आला.
गौरीताई पौड भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वृद्धाश्रम चालवतात.
सहजच मी या आजीबद्दल गौरीताईंशी बोललो. त्या सहजपणे म्हणाल्या “ द्या माझ्याकडे पाठवून दादा त्यांना…! “
…. त्या जितक्या सहजपणे आणि दिलदारपणे हे वाक्य बोलल्या, तितक्या सहजपणे सध्या हा वृद्धाश्रम त्या चालवू शकत नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे.
गौरीताई रस्त्यावर फिरत असतात…. निराधार आणि बेवारस पडलेल्या आजी-आजोबांना त्या रस्त्यावर आधी जेवू घालतात आणि त्यांना आपल्या आश्रमात कायमचा आसरा देतात. असे साधारण वीस ते बावीस आजी आजोबा सध्या त्या सांभाळत आहेत.
एका फोटोमध्ये गरीब लोकांना भरपेट खाऊ घालताना त्या मला दिसल्या… मी त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं…. यावर त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, “ दोन-तीन वर्षांपूर्वीचा फोटो आहे तो …. या दोन-तीन वर्षांत माझे हे आजी आजोबा असे भरपेट जेवल्याचे मला आठवत नाही. रोजचं दोन वेळचं जेवण हीच आमच्यासाठी चैन आहे. अनेक बिलं थकली आहेत… कधी कधी वाटतं जग सोडून जावं… पण पुन्हा या आजी-आजोबांचा विचार येतो…. त्यांच्या चेहऱ्यावरचं करुण हास्य बघून दरवेळी मी माघारी फिरते….” —- हे बोलताना गौरी ताईंचा बांध फुटतो…!
या ताईंना हा वृद्धाश्रम चालवण्यासाठी खरं तर कोणाचीच साथ नाही, सरकारी अनुदान नाही, जे काही थोडेफार डोनेशन मिळत आहे, त्यावर इतक्या लोकांचा संसार चालणं केवळ अशक्य आहे.
आंबा खाऊन झाल्यावर त्याची कोय जितक्या सहजपणे रस्त्यावर फेकून देतात …. तितक्या सहजपणे आपल्या आई आणि बापाला रस्त्यावर सोडणारी मुले- मुली -सुना – नातवंड आम्ही रोज पाहतो….
दुसऱ्याच्या आईबापाला स्वतःच्या मायेच्या पदराखाली घेणारी ही ताई मला खरोखरी “माऊली” वाटते.
परंतु आज हीच माऊली व्याकूळ झाली आहे…. परिस्थितीपुढे हरली नाही…. पण हतबल नक्कीच झाली आहे… !
अशा आई-वडील, आजी – आजोबा यांना आपला मदतीचा हात गौरीताईच्या माध्यमातून देता येईल.
नळ दुरुस्त करणारा कितीही कुशल असला तरी डोळ्यातले अश्रू थांबवायला आपलं माणूसच असावं लागतं…
गौरीताई यांच्या माध्यमातून आपणही या अंताला पोहोचलेल्या आजी-आजोबांचं ” आपलं माणूस ” होऊया का ?
गौरीताई धुमाळ यांच्याशी 74988 09495 या नंबरवर संपर्क साधता येईल…!
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈