सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ नवरात्र आणि रत्नागिरीच्या किल्ल्यावरील भगवती देवी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
बालपणीच्या काही आठवणी या कायमच्या मनामध्ये रुतून राहतात. आज पेठ किल्ल्यावरील भगवती मंदिराचा फोटो पाहिला आणि रत्नागिरीच्या आठवणी जाग्या झाल्या. नवरात्र सुरू झाले की हमखास भगवती देवीची यात्रा आठवते. या देवीचे मंदिर ज्या किल्ल्यावर आहे. त्याचे ऐतिहासिक नाव जरी ‘रत्नदुर्ग’ असले तरी आमच्या लेखी तो ‘पेठ किल्ला’ आहे. एरवी शांत निवांत असलेल्या त्या किल्ल्यावर वर्दळ दिसे ती नवरात्रातच! त्या किल्ल्याच्या एका टोकावर दीपग्रह होते.तिथून समुद्राचे दर्शन होई.समुद्रातील दीपग्रह, त्यावरील पडाव, मोठ्या बोटी आणि निळा आसमंत पाहताना खूपच छान वाटत असे. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर भगवती देवीचे मंदिर होते. या ठिकाणी यात्रेनिमित्त लहानपणी जाणे होत असे.
गाभूळलेल्या चिंचेसारख्या आंबट गोड आठवणी ! शाळेत असताना नवरात्रात भगवतीच्या यात्रेला जाणे हा एक कार्यक्रम असे. पूर्वी वाहने कमी होती आणि रस्ता ही साधा होता. किल्ल्यावर चढून जायचे म्हणजे बराच वेळ लागत असे. नवरात्रात सकाळी लवकर उठून घरातील मोठ्या मंडळींबरोबर चालत जाऊन भगवती देवीचे दर्शन आणि तेथील जत्रा अनुभवात होतो. जरा मोठे झाल्यावर मैत्रिणींबरोबर जाण्यात अधिक मजा येई. जाताना वाटेत काकड्या घेणे, कोरडी भेळ घेणे आणि गप्पा मारत हसत खेळत किल्ला चढणे अशी मजा असे.
त्यावेळची एक आठवण म्हणजे बुढ्ढी के बाल ! गुलाबी रंगाचे ‘बुढ्ढी के बाल’ एका मोठ्या काचेच्या पेटीत घेऊन तो बुढ्ढी के बाल वाला फिरत असे, पण घरचे लोक ते चांगले नसते म्हणून घेऊ देत नसत आणि ते देत नसत म्हणून जास्त अप्रूप वाटत असे. किल्ल्यावर एक सिनेमावाला चौकोनी खोके समोर घेऊन उभा असे आणि तो सिनेमातील काही फिल्म दाखवत फिरत असे. अर्थात तिथेही आम्ही कधी गेलो नाही ! आम्ही फक्त मंदिरात दर्शन आणि भेळेची गाडी या दोनच गोष्टी पाहिल्या होत्या.
किल्ला चढताना वाटेत भागेश्वराचे मंदिर होते. त्याचा जिर्णोद्धार भागोजी कीर यांनी केला होता. थांबण्याचा पहिला टप्पा तिथेच असे. ते मंदिर आधुनिक पद्धतीने छान बांधलेले होते. तिथून पुढे मोठा चढ चढून देवीच्या मंदिरापर्यंत जाता येई. रत्नदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व होते. पण गावापासून लांब असल्याने फक्त नवरात्रातच आवर्जून जाणे होई. पावसाचे चार महिने संपल्यावर सगळीकडे भरभरून हिरवागार निसर्ग दिसत असे. जांभळी पिवळी रान फुले किल्ल्यावर पसरलेली दिसत. सूर्याची किरणे अजून तरी तापायला लागलेली नसत. त्यातच तिथल्या पावसाची एक गंमत असे. नवरात्राच्या पहिल्या एक-दोन दिवसात पाऊस पडला की तो माळेत सापडला असेच म्हणत. त्यामुळे नऊ दिवस आता रोज थोडा तरी पाऊस पडणारच असे म्हटले जाई. अर्थात पाऊस आता बेभरवशाचा झाला आहे. तो कधी कुठे येईल सांगता येत नाही. आम्हाला अर्थातच त्या रिमझिम पावसात भिजायला आवडत असे. किल्ल्यावर जत्रेमध्ये हौशे,नवसे आणि गवसे असे सगळ्या प्रकारचे लोक भगवतीला येत असत. गावची जत्रा असल्यामुळे खेळण्याचे स्टॉल्स, खाऊची दुकानं, नारळ, उदबत्ती, बत्तासे, साखरफुटाणे, यांची दुकाने अशी अनेक प्रकारची तात्पुरती दुकाने असत.
आम्ही जत्रेत फिरून थोडाफार खाऊ घेत असू. बरोबर आणलेले डबे खाल्ले जात ! बाहेर विकत घेऊन खाण्याचे ते दिवस नव्हते. सातव्या माळेच्या जत्रेचे विशेष महत्त्व असे. त्यादिवशी शाळा लवकर सुटायची, तोच मोठा आनंद असे. पुढे कॉलेजला गेल्यावर आनंदाचे विषय बदलले. किल्ल्यावर जाता येताना पिपाण्या वाजवणे, टिकटिकी घेणे, फुगे घेणे, दंगा करणे, यासारखे तरुणाईचे उद्योग चालू असत ! तेव्हा ती पण एक मोठी मजा होती. आज भगवती मंदिराचा फोटो व्हाट्सअप वर पाहिला आणि पुन्हा एकदा त्या जत्रेतील पाळण्यातून वर- खाली वेगाने माझे मन भूतकाळात फिरून आले.
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈