सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆

श्री बालाजीची सासू, मग सासरा, नवरा, मग दीर, नणंद, आई, बाबा, भाऊ ,बहीण, मैत्रिणी, सखा , मामा, मामी, मावशी, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, खापर पणजी, खापरपणजोबा….. 

कसले लाडू, कसल्या वड्या, कसल्या भाज्या, कसल्या उसळी, कसले मुरंबे, कसले चिवडे, कसल्या चकल्या, कसली शेव ,कसले वेफर्स? 

….. हादग्याची खिरापत ओळखण्यासाठी असा शॉर्टकट आम्ही मांडत असू. पण एखादी सुगरण सांगे नाऽऽऽऽही.

मग गोड की तिखट?… तळलेले की भाजलेले?… कुठली फळं आहेत का?…. बेकरीचे पदार्थ आहेत का?…  

अशा तहाच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. चुळबुळ चुळबुळ सुरु व्हायची. पण आता उत्कंठा शिगेला पोचल्यानंतर सगळ्याजणी हार मानायच्या.

“हरलो म्हणा, हरलो म्हणा”. विजयी मुद्रेने आणि उत्फुल्ल चेहऱ्याने यजमानीणबाई डबा घेऊन उभी असे. पण डब्याचं झाकण उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्फर्म करत असे.

१) लाह्याच्या पिठाचा उपमा कुणी म्हटलंय का?

२) फुटाणे कुणी म्हटलंय का?

३) गुलगुले कुणी म्हटलंय का?

४) शेंगोळी कुणी म्हटलंय का?

५) ढोकळा कुणी म्हटलंय का? 

किंवा एखादी गाणं म्हणायची….. ” हरलीस काय तू बाळे? गणगाची उसळ ही खुळे.”

मग आम्ही सगळ्या “खुळ्या”आनंदाने त्या खिरापतीला न्याय द्यायचो. डबा उघडला जायचा. सर्वांना खिरापत मिळायची. त्यावेळेला द्रोण, वाट्या, चमचे, डिश यांचे फॅड नव्हते. प्रत्येकीच्या तळहातावर चमचाभर खिरापत घातली जायची. तेवढ्यानेही आमचे समाधान व्हायचे. सगळेच मध्यमवर्गीय. घरात एकटा मिळवता आणि सात आठ  खाणारी तोंडे. तुटपुंज्या पगारात भागवताना नाकी नऊ येत. पण तरीही हादग्याची खिरापत केली जायचीच. सगळीकडे खिरापत ” परवडणेबलच  ” असायची. 

श्री बालाजीची सासू याचा अर्थ खालील प्रमाणे….. 

श्री = श्रीखंड,

बा = बासुंदी, बालुशाही

ला = लाडू, लापशी, लाह्या

जी = जिलेबी

चि = चिवडा, चिरोटे

सा = साटोरी, सांजा, साळीच्या लाह्या

सू = सुतरफेणी, सुधारस, सुकामेवा … वगैरे 

त्याचप्रमाणे श्री बालाजीच्या इतर नात्यांवरून पदार्थ ओळखायचे….. 

उदा. भाऊ.. भा= भातवड्या (तळलेल्या किंवा भाजलेल्या),भात, भाकरी…… अक्षरशः फोडणीचा भात ,भाकरी यांना सुद्धा खिरापतीचा मान असायचा. कुणीच कुणाला नावं ठेवत नसे. ओळखण्याचा आनंद आणि हादग्याचा प्रसाद म्हणून गट्टम करायचा.

ऊ = उंडे, उपासाचे पदार्थ. एका केळ्याचे, रताळ्याचे, काकडीचे, छोट्या पेरूचे दहा तुकडे करून एक एक तुकडा हातावर ठेवला जायचा…….. खिरापत कोणतीही असो.  ओळखण्याच्या आनंदानेच पोट भरून जात असे.

मग आमचा घोळका पुढच्या घराकडे निघायचा.

उगारला आम्ही चाळीतले सगळे मध्यमवर्गीय..  घरोघरी असा हादगा साजरा करत असू. भिंतीवर एक खिळा मारून हादग्याचा कागद लावत असू. त्या रंगीत चित्रात समोरासमोर तोंड करून दोन हत्ती उभे असायचे. दोघांच्या सोंडेत माळा धरलेल्या असायच्या. त्याला सोळा फळांची माळ घातली जायची, त्यात भाज्या देखील असायच्या.  

१६ फळं उगारसारख्या खेडेगावात मिळणं मुश्किल. बंगल्यातल्या मुलींच्या घरात फळझाडे भरपूर असायची. बिन दिक्कत आम्ही तोडून आणत असू. हातातली काचेची फुटकी बांगडी विस्तवावर धरून ठेवली की ती वाकडी व्हायची. मग त्यात शेतातली ताजी भाजी म्हणजे वांगी, दोडका, कारली, मिरची, काकडी, भेंडी, ढबू मिरची अशा काही भाज्या  त्यात बसवायच्या. हत्तींना रोज ताज्या फुलांचा हार घातला जायचा. त्यासाठी दोन्ही बाजूला खिळे मारलेले असायचे. घरोघरी हादगा रंगायचा. आमंत्रणाची गरजच नसायची. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचेच. फेर धरायचा. मध्ये एक पाट ठेवून त्यावर हत्तीचे चित्र अंबारीसकट काढायचे. हळद, कुंकू, फुलं वाहून सगळ्यांनी पारंपारिक गाणी म्हणायची. पहिले दिवशी एक ,दुसरे दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने १६ व्या दिवशी १६ गाणी म्हणायची. मग खिरापत ओळखायची. हादगा समाप्तीचा मोठा समारंभ असायचा. हादग्याच्या सगळ्या मुली, शिवाय त्यांच्या आयांना देखील आमंत्रण असायचे. घागरीत  पातेल्यात खिरापत केली जायची. सर्वांनी पोटभर खावे अशा इच्छेने आग्रह करून वाढले जायचे. ती चव, ती तृप्ती वर्षभर पुरायची. मग पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सगळा खेळ रंगायचा.

आता सर्वत्र आर्थिक सुबत्ता आली. पण वेळेअभावी एकच दिवस हादगा किंवा भोंडला खेळला जातो. पण खिरापत ओळखण्याची मजा आजही वेगळा आनंद देऊन जाते. आता घरोघरी चढाओढीने पदार्थ केले जातात. गुगलवर एका क्लिकवर अनेक अनोख्या खिरापतींची रेसिपी मिळते.  लहानपणीची “श्री बालाजीची सासू” आता सुधारक पद्धतीने आकर्षक डिशमध्ये मिळते. आम्हा महिलांना तोच आनंद पुन्हा मिळतो.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments