सौ कल्याणी केळकर बापट
मनमंजुषेतून
☆ नाती जुळण्याआधीच सूर बिघडतांना… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
मध्यंतरी एका वाचनप्रेमी व्यक्तीने एक विषय दिला. त्यांना ह्या विषयावर एका कार्यक्रमात बोलायचे होते. तेव्हा काही मुद्दे सुचतं असतील तर सांगा असा त्यांचा मेसेज आला. विषय होता, -” नाती जुळण्याआधीच सूर बिघडतांना “…
विषय खूप गहन होता पण आजच्या काळात हा अनुभव सर्रास दिसायला लागणं हे एक सुदृढ कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हानिकारक लक्षण होतं. हा विषय मनात आल्यावर तऱ्हेतऱ्हेचे विचार मनात उमटायला लागले.
लहानपणी आपल्या खूप भन्नाट कल्पना असतात. तेव्हा वाटायचं.. आज बी पेरली वा रोप लावले तर लगेचच त्याचा वृक्ष तयार होतो. तेव्हा आजोबांनी खूप छान समजावलं होतं. बी रुजल्यानंतर कोंब फुटून वाढीला सुरुवात होते. ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी काळजी घेऊन, वेळ देऊन मगच कुठे ते रोपटं बाळसं धरायला लागतं आणि त्याचा वृक्ष होईपर्यंत बराच काळ, खूप सा-या संकटांचा सामना करून, टक्केटोणपे खाल्यानंतर कुठे तो वृक्ष तयार होतो.
सगळ्यांचं आता हळूहळू वयं वाढलं तसे अनुभव गाठीशी जमा झालेत, उन्हाळे पावसाळे बघून झालेत व बहुतेक सगळ्यांनाच अनेक दिव्य कसोट्यांना पार करावं लागलं आहे, तेव्हा कुठे ही प्रत्येकाची संसाराची नौका जरा स्थिरस्थावर झालीयं हे प्रत्येकाला जाणवलं. नात्यांचंही पण वृक्षासारखचं असतं. ते नातं रुजू द्यावं लागतं, फुलू,बहरू द्यावं लागतं,ते जपावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परस्परांना समजून घ्यावं लागतं,काही मिळवितांना काही सोडावं सुद्धा लागतं, तेव्हा कुठे ते नातं चांगलं टिकलं, मुरलं असं आपण म्हणू शकतो.
दुर्दैवाने आजच्या नवीन पिढीजवळ वाट बघण्यासाठी वेळ नसतो, संयम नसतो, त्याग हा शब्द डिक्शनरीमधून खोडून टाकलेला असतो आणि त्यामुळे हे रुजण्याच्या उद्देशाने निर्माण झालेलं नवीन नातं बहरण्याऐवजी कोमेजत जातं. आणि वेळीच सावरलं नाही तर पार निर्माल्य होतं. अर्थात हे आजकाल वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणावरूनच लक्षात येतं.
नवीन नात्यांना आकार देतांना एक गोष्ट पक्की… कुठल्याही दोन व्यक्तींचे शंभर टक्के सूर जुळणं शक्यच नसतं. कारण प्रत्येक जीव हा वेगवेगळी अनुवंशिकता, परिस्थिती, दृष्टिकोन व मानसिकता ह्यातून घडलेला असतो. वैवाहिक सूर जुळवितांना दोघांनाही स्वतःचे सूर जुळविण्यासोबतच बाकी इतर नातीसुद्धा सांभाळावीच लागतात. नवीन पिढी खरोखरच खूप हुशार, जिद्दी आणि ठाम मतांची आहे. त्यामुळे त्यांनी थोडी तडजोड केली, थोडासा स्वार्थ बाजूला सारला, तर हे संकट संपूर्ण नेस्तनाबूत होऊन नवीन मुलं आपल्या बौद्धिक प्रगतीच्या जोरावर जास्त उत्तम प्रकारे संसार करु शकतील. त्यामुळे लग्न करतांना प्रत्येकाने हे वैवाहिक शिवधनुष्य योग्य रितीने कसे पेलता येईल ह्याचा आधी जरूर विचार करून, आपली स्वतःची मानसिकता बदलवून, एक निराळा दृष्टिकोन समोर ठेऊन, ह्या संसारात पडण्याची तयारी करावी. प्रत्येकाने दुसऱ्याकडे टक लावून बघण्याआधी वा परीक्षा बघण्याआधी स्वतःकडे पारखून बघून पहिल्यांदा स्वपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याची क्षमता जाणण्याआधी स्वतःची कुवत प्रामाणिकपणे अभ्यासावी. एक नक्की… खरोखरच सहजीवन जगून त्याचा आनंद लुटायचा असेल तर मग प्रत्येकाने दोन पावलं स्वतः आधी मागे यायला शिकावचं लागेल.
एक सगळ्यातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सूर नीट जुळण्याआधीच नवीन जीव जन्माला घालण्याची घाई अथवा धाडस करुच नये. नाहीतर येणाऱ्या जीवावर तो एक मोठा अन्याय ठरेल हे नक्की. नवीन जीवाची परवड करण्याचा प्रमाद तरी आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
कदाचित ब-याच जणांच्या मते तडजोड हा मूर्खपणा असेल. तरीही एक नक्की की, तडजोडीने कदाचित आपल्याला सुख नाही लाभत, पण आपण न केलेल्या तडजोडीमुळे कित्येक आपल्याशी जोडलेल्या व्यक्ती ह्या दुःखी होऊ शकतात. म्हणून सुखी जरी नाही म्हणता आलं, तरी साध्यासरळ संसारासाठी ” तडजोड ” हा एक उत्तम मार्ग ठरु शकतो. आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या तडजोडीनंतर एक दिवस हा तुमचाच असतो आणि त्या दिवसानंतर हसतमुखाने घरच्यांनी मान्य केलेले बाकीचे उर्वरित पण दिवस तुमचेच येतात हे नक्की…. असो हा विषयच न संपणारा विषय आहे. तेव्हा तूर्तास आजच्यासाठी येथेच थांबते.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈