श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ मन एक गुरू त्राता ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

कधी वाटले, पुन्हा एकदा –

घ्यावा वेध, अपुल्याच मनाचा –

होतो जैसा, तसाच आहे –

किंवा बदल घडे का साचा ॥

 

वाचावी उलटुनिया पाने –

अपुल्या जीवनगाथेची –

निरखावी आपुलीच प्रतीमा –

तटस्थ बुद्धीने साची ॥

 

मूल्यांकन आपुलेच आपण –

कसे करावे समजेना –

करून तुलना दुसर्‍याशी मग –

जाणावे, उमगले मना ॥

 

गुणवैगुण्ये आणि परिस्थिती –

लाभली मज जी दैववशात् –

जोखावी तोलुन दुसर्‍याशी –

ज्यास लाभली भाग्यवशात् ॥

 

बुद्धी क्षमता कार्यचतुरता –

त्याची माझी तोडीस तोड –

सौख्ये मजला कमी न मिळती  

परि त्याची चाले घोडेदौड ॥

 

तरीही कौतुक मनात त्याचे  –

हेवा नाही तिळमात्र –

परंतु काटा वैषम्याचा –

मनात सलतो दिनरात्र ॥

 

तुलना करता कुणी खालती –

तसेच वरचढ दिसती कुणी –

वरची पायरी कुणी गाठता –

न्यूनगंड का रुजे मनी ॥

 

विचार चुकीचा मलाच कळले –

अन कळले की विचारण्याला  –

गुरू न कोणी अंतर्मनसा 

मार्ग योग्य तो दाखविण्याला  ॥

 

सूर मारला नि:शंकपणे –

खोल मनाच्या डोहात –

वेगाने गाठला तळ जसा –

मीन पोहतो दर्यात ॥

 

उघड्या नेत्री धुंडाळुनिया –

कोनकोपरा अंतरिचा –

शोध घेतला गूढ मनाचा –

उत्कटतेने बिनवाचा ॥

 

दूर दिसे देव्हारा त्यातच –

दिसले मजला आंतरमन – 

समाधिस्थ योगिसे बैसले –

घालुन चक्री पद्मासन॥

 

मी काही बोलणार त्याच्या –

आधिच त्याने खुणाविले –

करोनिया स्मितहास्य तयाने –

निकटी मजला बैसविले ॥

 

“जाणून होतो येणारच तू” –

कथिता त्याने दिग्मुढ मी –

“झाला भ्रम बुद्धीस तुझ्या जो –

निवारितो मी एक क्षणी” ॥

 

आंतरमन मग सांगू लागले –

“तन मन बुद्धीची शुचिता –

प्रामाणिक राहून स्वत:शी –

जपणे रे आपुली स्वत:” ॥

 

“आत्मपरीक्षण करून घेण्या –

विचार सुचला तुला भला –

उत्तर मिळण्या परी तुवा जो –

मार्ग निवडला तो चुकला” ॥

 

“मूल्य जाणण्या स्वत: स्वत:चे –

तुलना तर करण्यास हवी –

परंतु दुसर्‍यासवे करुनिया –

वाट न धरि खोटी फसवी “ ॥

 

“तुलना करणे असेल तर मग –

फक्त करावी स्वत: स्वत:ची –

नैतिक आणि सनदशीर ती –

गाठील सज्जनतेची उंची ॥

 

“कालच्याहुनी अधिक चांगला –

आहे का मी आज पहावे –

सत् प्रत्यय भूषीत सर्व गुण –

जमतिल तितुके मिळवावे” ॥

 

बोलुन इतुके लुप्त जाहले –

आंतरमन अदृश्यात –

मी ही परतलो मनडोहातुन –

पिऊन उपदेशाचे अमृत ॥

 

अपुली बुद्धी, नशीब अपुले –

अपुल्या निष्ठा, अपुले संचित –

मिळकत माझी कां तोलावी –

व्यर्थ दुज्याच्या तराजुत ॥

 

कधीच नाही नंतर केली –

तुलना दुसर्‍या वा तिसर्‍याशी –

माझा मीच यशस्वी झालो –

प्रामाणिक राहून स्वत:शी ॥

 

वैषम्यासम न्यूनगंड अन् –

भाव नकारात्मक मनिचे –

कसे वितळले गळून गेले –

भाव सकारात्मक सजले ॥

 

रचना : सुहास सोहोनी, रत्नागिरी

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments