सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ देवा तू करतोस ते योग्यच आहे… सौ.शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

आज फ्रीज उघडला तर काय काय त्यात भरलेले. महालक्ष्मी साठी केलेले पुरण ,ओल्या नारळाचे उरलेले सारण, परवा बाप्पांच्या विसर्जनासाठी केलेली वाटली डाळ, असे बरेच उरलेले ठेवलेले.

बाप्पा आले पण येताना काही आणले नाही,अगदी दहा दिवस लागणार माहित असूनही, कपडे नाही,औषधे नाही,अंथरायला नाही, पांघरायला नाही, छत्री,रेनकोट ,अगदी साधा रुमालही नाही.

त्यांना माहीत होत खाली भौतिक सुखाचा सतत विचार करणाऱ्यांनी त्यांची चोख व्यवस्था केली आहे. नसती केली तरी बाप्पा कोणत्याही परिस्थितीत अगदी आनंदात आहेतच.

ते जातांना माझ्याच मनाची घालमेल, की शिदोरी द्यायची बाप्पांना. पुन्हा २१ मोदक केले, डाळ केली. नैवेद्याच्या वाटीत नैवेद्य ठेवला. तेवढाही नेला नाही. पण आले तेव्हा जसे आनंदी होते, प्रसन्न होते, तसेच जातांना होते. डोळ्यातून आशिर्वादाची,समाधानाची झलक दिसत होती.

महालक्ष्मी येण्याआधी तेच झाले. किती ती तयारी. घराची स्वच्छता,आरास करण्यासाठी बाजाराच्या चकरा. महालक्ष्मीसाठी साड्या घेतांना मला आवडल्या म्हणून बाजूला काढलेल्या अजून दोन तीन साड्या. तिच्यासाठी म्हणून दोन आणल्या खऱ्या, पण त्यातही एक मला होतीच….. मग फुलोरा, पुरण, त्या १६ भाज्या,चटण्या, कोशिंबिरी.

आधीच्या खूप पसाऱ्यातून, आधीच्या  कुळाचारातून ,रीतीरीवाजातून, माझ्या मनाच्या घालमेलीनंतर मीच कमी कमी केलेले ,थोडे सुटसुटीत होईल असे पदार्थ, नैवेद्य, त्यात माझा ओतलेला सुगरणपणा……. हे सगळं सगळं करून खूप थकायला झाले. पण त्या महालक्ष्मी आणि त्यांच्या बाळांनी जाताना काहीही नेले नाही, त्या पिटुकल्यांनी जाताना आई जवळ काहीही हट्ट केला नाही. त्याही जाताना भरभरून आशीर्वाद देऊन गेल्या….. कुंकवाच्या करंड्यात मला भासतील असे दोन चिमटीच्या खुणा ठेवून गेल्या. दोन्ही सणांनी खूप खूप आनंद दिला. 

पण आता हा उरलेला मागचा पसारा बघता सहज मनात विचार आला, मला जर कोणी दहा दिवसात किंवा तीनच दिवसात सगळं पटापट आवरून आता चला, बास आता इथले वास्तव्य ,असे जर म्हणाले तर माझे कसे आवरेल?

…… बापरे! हा विचार नुसता मनात आला आणि सर्व ब्रम्हांडच आले डोळ्यासमोर….. 

नुसते थोडा वेळ बाहेर जायचे म्हंटले तरी पाऊस येईल का?—कपडे बाहेर आहेत का?—अन्न झाकलेय का?—

मी बाहेर गेल्यावर गॅसवाला येईल का?—मोबाईल घेतलाय का?——बापरे बाप किती विचार डोक्यात.

साधे  एक दिवस गावाला जायचे म्हंटले तर  मी १० साड्या पलंगभर पसरवून ठेवते. कोणत्या दोन घ्याव्यात ह्यावर माझेच माझे एकमत होत नाही. काही साड्या जाड,जड, फुगणाऱ्या, काही चुरगळणाऱ्या, काही ओल्या झाल्या तर खराब होतील का? असे ढीगभर विचार डोक्यात—-

——मग कायमचे जायचे असेल, त्यात बरोबर काहीच न्यायचे नाही ,आणि दोन, तीन, फारतर दहा दिवसात सगळाच पसारा आवरायचं म्हंटले तर कसे होणार?

परवा त्या सायरस मिस्त्री नावाच्या टाटा कंपनीच्या मोठ्या व्यक्तीला अपघात झाला. केवढा पसारा,केवढे साम्राज्य असेल त्यांचे? किती कोटींची गुंतवणूक, किती कोटींची उलाढाल…  कसं आणि कोणी आवरायचं हे सगळं. त्यांनी जे ठरवले असेल ते तसेच राहिले की मनात….. 

खूप वेळा एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.

मग कधी कधी वाटते की ह्या पॉलिसीज, इन्शुरन्स, ही संपत्ती, हे खोऱ्याने चोरून लपवून ठेवलेले पैसे, काळे धन, लॉकर्स, शेती, जमिनी, कारखाने, नाव, पद, प्रतिष्ठा, इगो,ह्या सगळ्या सगळ्याला खरंच काय अर्थ आहे?—-

—-तरी माणूस धावतोच आहे, धावतोच आहे ,तोंडाला फेस येईपर्यंत पळतोच आहे ,खोटी खोटी स्वप्न बघतोच आहे, झगमगाटी दुनियेमध्ये रमतोच आहे. कसलाच भरवसा नाही तरी तीन तीन महिन्यांचे रिचार्ज मारतोच आहे.

गाड्या ,फ्लॅट,बुक करतोच आहे—-

—- का ? कशासाठी?

दरवर्षी येणाऱ्या आणि बुद्धीची देवता असणाऱ्या बाप्पाकडून काहीच शिकत नाही. उलट त्या बाप्पांनाच पुन्हा पुन्हा ह्या येण्याजण्याच्या फेऱ्यात अडकवतोय—-

“ गणपती बाप्पा मोरया — पुढच्या वर्षी लवकर या.” –

बाप्पा ही येतात तेही काहीच न घेता, जाताना काहीच न नेता. आणतात फक्त आनंद..देतात फक्त आनंद.

आपणच अडकलो आहोत ह्या चक्रव्यूहात— अडकण्याचे सगळे मार्ग आपण माहित करून घेतलेत. बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नकोय.

ह्या जीवाचे तंतर काही समजत नाही—

आला सास गेला सास, जिवा तुझं रे तंतर..

अरे जगणं मरण एका सासाच अंतर!

देव कुठे? देव कुठे,आभायाच्या आरपार!

देव कुठे, देव कुठे तुझ्या बुबाया मधी र !

हा आपल्याच बुबुळामधील देव, आपल्याच बुबुळामधील आपल्या प्रेमाचा माणूस, आपल्याला शेवटपर्यंत दिसत नाही.

देव येतात ,देव जातात, आशीर्वाद देतात ,आनंद देतात. प्रत्येक वर्षी तेच ते सांगण्यासाठी येतात. पण तरीही आपल्याला काहीही समजत नाही. देवांच्याकडून, निसर्गाकडून आपल्याला काही शिकवण घ्यायचीच नाही. ते दोघेही नुसते देतच असतात. कसलीच अपेक्षा न ठेवता– पण मुळात आपल्याला समजूनच घ्यायचे नाही.

आपण तर आपल्या आईवडिलांच्याकडून ,आणि आईवडील मुलांच्या कडून अपेक्षा ठेवतात.

एक साडी कुणाला दिली तर तिने चार डबे घासून द्यावे अशीही आपली अपेक्षा असतेच.

गणपती बाप्पा तू बुध्दीची देवता.

लहानपणी रोज आई म्हणून घ्यायची ते आजही आठवतंय— ‘ की देवा मला चांगली बुध्दी दे.’—आता कुणी  हे असे मागणे फारसे  मागताना दिसतच नाही.

मागण्या पण काळानुरूप बदलल्या आहेत. गणपतीकडे तरी तेच मागायचे लोक.

तो येताना बुद्धी आणत असेल वाटायला सोबत… पण कुणी मागितली तर ?

असो. माणसाच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे त्याने काही प्यादी अजून त्याच्या हातात ठेवली आहेत.

त्याला माहित आहे की ह्या आधाशी माणसाला नेण्याची पूर्व कल्पना दिली, तर काय काय बांधून वर नेईल हा.

तो सगळा विचार करूनच त्याची गणितं संपली की तो काहीच विचारत नाही.–बोलावणे आले की नेतोच.

नाहीतर हा माणसाचा जमवलेला पसारा तीन दिवसात, दहा दिवसात काय, तर कधीच न आवरता येणारा आहे.

तो फक्त ह्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतो.  बाकी काही नाही.

देवा तू करतोस ते योग्यच आहे.

लेखिका : सौ.शुभांगी देशपांडे

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments